विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-मगो युतीचा निर्णय घेणार केंद्रीय नेेतृत्व : मुख्यमंत्री

प्राथमिक चर्चा सुरू; २०२७ मध्ये बहुमताने विजयी होणार : गोव्यात २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगो) यांच्यात युतीसंदर्भातील प्राथमिक चर्चा सुरू झाल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
55 mins ago
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-मगो युतीचा निर्णय घेणार केंद्रीय नेेतृत्व : मुख्यमंत्री

पणजी : गोव्यात २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगो) (BJP-MGP) यांच्यात युतीसंदर्भातील प्राथमिक चर्चा सुरू झाल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी दिली. युतीबाबतचे उर्वरित निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी भाजप-मगो युतीसंदर्भात विचारले असता; मुख्यमंत्री सावंत यांनी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू झाल्याचे सांगितले. युतीसंदर्भातील पुढील प्रक्रिया आणि अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्वाच्या स्तरावर घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-मगो युती नक्की होणार असून,  मोठे बहुमत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. २०२७ च्या निवडणुकीत ही युती मोठ्या जनादेशासह विजयी होईल, असा दावा त्यांनी केला.

गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून युती आणि निवडणूक रणनीतीबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत भाजप आणि मगो यांच्यातील प्राथमिक चर्चांना महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, युतीचे अंतिम स्वरूप आणि त्यासंबंधीचे निर्णय केंद्रीय नेतृत्वाच्या भूमिकेवर अवलंबून असतील असे गोव्यातील नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पणजीतील बंगल्यावर भाजपचे नेते आणि मगो पक्षाचे नेते यांची बैठक झाली होती. या बैठकीत मगोने मडकई, मांद्रेसह फोंडा आणि शिरोडा हे मतदारसंघ मागितले. मात्र, गोव्यातील नेत्यांनी फोंडा आणि शिरोडा मतदारसंघांत भाजपचे आमदार गेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्याने हे मतदारसंघ देणे शक्य नसल्याचे सांगितले.

त्यानंतर यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा भेट घेऊन त्यांच्याशी हा विषय मांडणार असल्याचे मगोचे राज्य अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले होते. 

हेही वाचा
सर्व पहा