गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
यंदा गोव्यात झेंडूचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सुगीचे (सोन्याचे) दिवस येणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा झेंडूच्या लागवडीत दीडपट वाढ झाली आहे. किनारपट्टी भागात पूर्वी झेंडूची शेती होत नव्हती, तिथेही आता झेंडूच्या बागा फुलू लागल्या आहेत. यंदा शेतकऱ्यांना झेंडूचे चांगले दर मिळत आहेत, अशी माहिती कृषी संचालक चंद्रहास नाईक देसाई यांनी दिली.
दसरा आणि दिवाळी या सणांच्या दिवसात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. पूर्वी झेंडूची फुले कर्नाटक, महाराष्ट्रातून येत असत. गोव्यातील झेंडूला योग्य भाव मिळत नव्हता. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी झेंडू लागवडीकडे पाठ फिरवली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली कृषी खात्याने ‘स्वयंपूर्ण गोवा’ मोहिमेअंतर्गत झेंडू शेतीला प्रोत्साहन देण्यात आले. गोमंतकीयांना इतर राज्यांतील झेंडूवर अवलंबून राहण्याऐवजी गोव्यातील शेतकऱ्यांकडूनच झेंडू खरेदी करता यावा, यावर सरकारने भर दिला.
बाजारात जाण्यापूर्वीच झेंडू त्याच भागातील गावांमध्ये किंवा वाड्यांवर विकला जातो. शेतकऱ्यांनी स्थानिक विक्रेते, दुकानदार किंवा वाहतूकदारांशी ओळख करून ठेवलेली असते. एकदा पीक तयार झाले की, शेतकरी त्यांना ही फुले विकतात आणि त्यानंतर ते व्यापारी फुले बाजारात विकण्यासाठी घेऊन जातात. आता पुढील २० ते २५ दिवस म्हणजेच तुळशीच्या लग्नापर्यंत झेंडूचा हंगाम सुरूच राहील, असेही कृषी संचालक चंद्रहास नाईक देसाई यांनी सांगितले.

शेतातच फुलांची विक्री आणि चांगला भाव
दसरा आणि दिवाळी या सणांच्या दिवसांत शेतकऱ्यांना झेंडूसाठी प्रति किलो ९० ते १०० रुपये इतका दर मिळतो, तर इतर दिवसांत झेंडूचा दर प्रतिकिलो ६० ते ७० रुपये एवढा स्थिर असतो. या शेतकऱ्यांना स्वतःची फुले घेऊन बाजारात जावे लागत नाही. त्यांच्या शेतातच फुलांची विक्री होते आणि त्यांना चांगला भाव मिळतो, असे कृषी संचालक चंद्रहास नाईक देसाई यांनी सांगितले.
किनारपट्टी तालुक्यांत यंदा प्रथमच झेंडूची लागवड
कृषी संचालक चंद्रहास देसाई म्हणाले, गेल्या वर्षी ७५ ते ८० हेक्टर भागात झेंडूची लागवड झाली होती. यंदा ही लागवड १२० ते १३० हेक्टरपर्यंत पोहोचली आहे. सध्याची उत्पादनाची स्थिती पाहता, प्रति हेक्टर ६ हजार टन इतके झेंडूचे उत्पादन मिळू शकते. सांगे, केपे, सत्तरी, धारबांदोडा या पश्चिम घाट क्षेत्रातील तालुक्यांमध्ये सर्वांत जास्त झेंडूची लागवड झाली. तसेच किनारपट्टीच्या भागातही नव्याने लागवड सुरू झाली आहे. सासष्टी आणि बार्देशसारख्या किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये कधीच झेंडूची लागवड होत नव्हती, तिथेही यंदा प्रथमच झेंडूच्या बागा फुलल्या आहेत, अशी माहिती कृषी संचालक चंद्रहास नाईक देसाई यांनी दिली.


