गोवन वार्ता। न्यूज डेस्क
मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवरील हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या कोटाहून तीन आरोपींना ताब्यात घेतले. तीनपैकी दोघे हरियाणाचे तर एक बिहारचा आहे. यापैकी एक २२ वर्षाचा, तर दोघे १८ वर्षांचे आहेत. तिघांनाही नंतर अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी जे आरोपी असतील त्यांनाही अटक करण्यात येईल आणि कारवाई केली जाईल. आरोपी हल्ल्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटे घटनास्थळी आले होते, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
डीसीपी राज तिलक रोशन यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आरोपींच्या मुसक्या कशा आवळल्या याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, रविवारी सायंकाळी जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफ व्यक्तीगत कामासाठी बाहेर गेले होते. त्यांच्या गाडीवर दोन पिस्तुलांमधून गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणारे दुचाकीवरून आले होते. एक दुचाकी चालवत होता, तर दोघांनी गोळीबार केला. हल्ला केल्यानंतर आरोपी दुचाकी अंधेरी रेल्वे स्टेशनला सोडून पळाले. मुंबईहून सुरतला ते बसने गेले होते. तिथून त्यांनी पुणे-जयपूर एक्सप्रेस पकडली. आम्ही आरोपी त्या ट्रेनमध्ये नेमक्या कोणत्या बोगीमध्ये आहेत याची अचूक माहिती काढली. ती माहिती आम्ही कोटा पोलिसांना दिली. त्या आधारावर त्यांनी तिथे आरोपींना पकडले. त्यांच्याकडून आम्ही त्यांना ताब्यात घेतले. आम्हाला दिल्ली पोलीस, गुजरात पोलीस आणि राजस्थान पोलीस यांचे सहकार्य लाभले. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास क्राईम ब्रँच करत आहे. हा तपास खंडणी विरोधी पथकाकडे आहे.
मुंबई पोलिसांच्या २० चमू रवाना
गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई गुन्हे शाखेच्या जवळपास २० टीम बनवल्या गेल्या. या टीमने तांत्रिक विश्लेषण आणि ग्राउंडवरच्या बेसिसवर आरोपींनी वापरलेली दुचाकी शोधून काढली. दुचाकी अंधेरी रेल्वे स्टेशनला मिळाली. इतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर माहिती मिळाली की, आरोपी पश्चिम रेल्वेच्या मार्गाने उत्तरेच्या दिशेला गेले आहेत, अशी माहिती डीसीपी रोशन यांनी दिली.
शस्त्रे, पैशांबाबत होणार कसून चौकशी
गोळीबार प्रकरणात हत्या करण्याचा प्रयत्न आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींना आम्ही ताब्यात घेतले आहे. सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक चौकशी सुरू आहे. पुढील चौकशीत आम्हाला त्यांनी शस्त्रे कुठून मिळवली, पैसे किती घेतले ती माहिती समोर येईल. पंडित म्हणून कुणी आहे, त्याची पोस्ट फिरते आहे. त्याची सत्यता आम्ही पडताळून पहात आहेात, असेही डीसीपी रोशन यांनी सांगितले.


