राज्यात पाऊस; उष्णतेपासून दिलासा

अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा, टर्फ, तसेच अन्य विविध वातावरणीय कारणांमुळे सोमवारी राज्यात पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर राज्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी पडझडीच्या घटनांची नोंद झाली, तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला.


19th October, 11:20 pm
राज्यात पाऊस; उष्णतेपासून दिलासा

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा, टर्फ, तसेच अन्य विविध वातावरणीय कारणांमुळे सोमवारी राज्यात पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर राज्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी पडझडीच्या घटनांची नोंद झाली, तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी होऊन काहीसा दिलासा मिळाला. हवामान खात्याने २० आणि २१ ऑक्टोबर रोजी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
पावसामुळे सध्या सुरू असलेल्या भात कापणीवर परिणाम झाला. राज्यात २२ ते २५ ऑक्टोबर दरम्यान वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. पावसामुळे राज्यातील कमाल तापमानात घट होत आहे. मात्र किमान तापमानातील वाढ कायम आहे. सोमवारी पणजीत ३४ अंश, तर मुरगावमध्ये ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पणजीतील किमान तापमान २६.४ अंश होते. हे ऑक्टोबर महिन्यातील सहावे सर्वाधिक किमान तापमान ठरले. सोमवारी मुरगावमधील किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहिले.
पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३४ अंश व किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. राज्यात १ ते १९ ऑक्टोबर दरम्यान सरासरी ०.६९ इंच पावसाची नोंद झाली. यंदा ऑक्टोबर महिन्यातील पावसाचे प्रमाण ८५ टक्क्यांनी कमी आहे. याआधी हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, ऑक्टोबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली होती.

हेही वाचा
सर्व पहा