कदंबातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणार : मुख्यमंत्री; मिळणार वार्षिक पगारवाढ

यापुढे कदंबमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढ देण्यात येणार आहे. कंत्राटाचा कालावधी संपल्यावर नियमानुसार सर्व कर्मचाऱ्यांना कायम केले जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्या देखील येणाऱ्या काळात पूर्ण केल्या जातील. यामुळे कर्मचाऱ्यांनी संप करू नये असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
कदंबातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणार : मुख्यमंत्री;  मिळणार वार्षिक पगारवाढ

पणजी: यापुढे कदंबमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढ देण्यात येणार आहे. कंत्राटाचा कालावधी संपल्यावर नियमानुसार सर्व कर्मचाऱ्यांना कायम केले जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्या देखील येणाऱ्या काळात पूर्ण केल्या जातील. यामुळे कर्मचाऱ्यांनी संप करू नये असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant)  यांनी केले.

मंगळवारी कदंब महामंडळाच्या (KTC) ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो, आमदार उल्हास तुयेकर, व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या असतील तर त्यांनी सरकारसोबत बोलणी करावी. चर्चा करून प्रश्न सुटू शकतात. त्यासाठी संपावर जाण्याची गरज नाही. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या या आधीच मान्य झाल्या आहेत.

वाहकांना सात वर्षाच्या कंत्राटावर घेतलेले आहे. याआधी त्यांना सात वर्षे ठरलेला मासिक पगार मिळत होता. यापुढे त्यांना वार्षिक पगारवाढ दिली जाईल. कंत्राट संपल्यानंतर त्यांना विशिष्ट सूत्रानुसार कायम केले जाईल. याशिवाय त्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे ईपीएफ सुविधाही देण्यात येणार आहे. 

ते म्हणाले, पोलीस किंवा अग्नीशामक दलातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना अतिरिक्त विमा दिला जातो. हा लाभ आता कदंब कर्मचाऱ्यांना देखील लागू होणार आहे. कदंब  कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या इतर सर्व सुविधांसह १६ लाख रुपयांचा जीवन विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

लोकांचा कदंब चालक, वाहकांवर विश्वास आहे. अन्य राज्यातील लोक देखील त्यांच्या बसपेक्षा कदंब बसने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. कदंब कर्मचाऱ्यांनी लोकांमधील हा विश्वास कायम ठेवणे आवश्यक आहे. 

कदंब महामंडळ लोकांच्या सेवेसाठी काम करत आहे. आम्ही आणि खाजगी बस सेवांसोबत स्पर्धा करत नाही. खाजगी बस चालकांना फायदा व्हावा यासाठी माझी बस योजना सुरू केली आहे. यामध्ये महिन्याच्या नफ्यासह २० हजार रुपये अतिरिक्त रक्कम दिली जाते. खाजगी बस चालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

मागील काही वर्षात कदंबने तंत्रज्ञानाच्या आधारे विविध नवीन गोष्टी सुरू केल्या आहेत. ऑनलाइन तिकीट,  स्मार्ट कार्ड , मोबाईल ॲप अशा सेवा सुरू केल्या आहेत. या सेवा यशस्वी करण्यासाठी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

१ नोव्हेंबरपासून मासिक पासवर २० टक्के सवलत

१ नोव्हेंबर पासून कदंब मासिक पासवर २० टक्के तर वार्षिक पासवर ३० टक्के सवलत दिली जाईल. पासवर नमूद केलेल्या एकूण दिवसांसाठी पास वापरता येईल. सर्व बस स्थानकावर मासिक पास देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. पुढील वर्षी म्हापसा, पणजी, मडगाव कदंब बसस्थानकांचे नूतनीकरण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा