माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा भाजप प्रवेश निश्चित

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा भाजप प्रवेश निश्चित

पणजी: माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश निश्चित झाला असून, राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत ते स्वगृही प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. तसेच दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांची सुद्धा पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक झाली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आगामी २७ व २८ रोजी गोवा भेटीवर येत असून, त्यांच्या उपस्थितीत राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या दौऱ्यादरम्यान गोव्याच्या राजकारणात अनेक नव्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या राष्ट्रीय प्रभारी डॉ. भारती पवार आणि सहसंघटन सरचिटणीस शिवप्रकाश यांनी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठका घेतल्या आहेत.

प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा झाली असून त्यांचा भाजपमध्ये पुनप्रवेश शक्य आहे. त्यांनी पक्षासाठी अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे ते पुन्हा पक्षात आल्यास आम्हाला अत्यंत आनंद होईल, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली आहे.

याबाबत बोलताना प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले की, मी बरीच वर्षे भाजपसाठी घाम गाळला आहे. पक्षाशी आपले जुने नाते असल्यानेच मागील निवडणूक अपक्ष म्हणून लढवली असली, तरी मी अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. आगामी दोन दिवसांत सर्वांना माझा पुढील राजकीय निर्णय स्पष्ट होईल.

दरम्यान, उत्पल पर्रीकर यांच्याबरोबर सुद्धा एक-दोन वेळा विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली आहे.

हेही वाचा
सर्व पहा