राजस्थानात धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय जीवनात खेजडी वृक्षाला महत्त्वाचे स्थान आहे. राजस्थानातील वाळवंटात प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष देत खेजडी वृक्ष केवळ तग धरत नाही, तर तिथल्या कष्टकरी जातीजमातींसाठी नानाविध गरजांच्या पूर्ततेसाठी टिकाऊ लाकूड जसे पुरवतो, तसेच त्याला लागणाऱ्या सांगरीच्या शेंगांची भाजी मोठ्या आवडीने खाल्ली जाते. त्यामुळे खेजडी वृक्षाला राजस्थानातला कल्पवृक्ष मानलेला आहे. त्यामुळेच राजस्थान सरकारने खेजडी वृक्षाला अधिकृतरित्या राज्यवृक्षाचा दर्जा प्रदान केलेला आहे.
अमृतादेवी बिश्नोई आणि त्यांच्या तीन मुली तसेच गावातील समविचारी अशा एकूण ३६३ जणांनी ११ सप्टेंबर १७३० रोजी
राजाज्ञेविरुद्ध बंड पुकारले. नवीन राजवाड्याच्या निर्मितीसाठी चुनाभट्टी पेटवण्यास खेजडी वृक्षांची लाकडे गरजेची असल्याने, ती तोडण्यासाठी मारवाडचे राजे अभयसिंह यांनी आदेश दिला होता. राजाज्ञा अंमलात आणण्यासाठी सैनिक जोधपूर - जाडन मार्गावर असणाऱ्या खेजार्ली गावात आले, त्यावेळी अमृतादेवी आणि त्यांच्या ३६३ साथीदारांनी “आमचे मस्तक त्यागू, पण जीवंत असेपर्यंत खेजडी वृक्ष तोडू देणार नाही,” असा निर्णय घेतला. खेजडी वृक्ष तोडण्यासाठी जेव्हा सैनिक पुढे सरसावले तेव्हा अमृतादेवी आणि त्यांच्या ध्येयवादी साथीदारांनी झाडांना मिठी मारली अन् “प्राण गेले तर बेहत्तर,” असे म्हणून झाडांच्या बुंध्यांना घट्ट पकडले. सैनिकांनी दयामाया न दाखवता ३६३ जणांची अतिशय निर्दयतेने हत्या केली. जगाच्या इतिहासात वृक्ष संरक्षणासाठी हौतात्म्य पत्करण्याची ही घटना अभूतपूर्व अशीच होती. अमृतादेवी आणि त्यांचे समविचारी साथीदार खेजडी वृक्षांच्या रक्षणासाठी निर्भयपणे मृत्यूला सामोरे गेले. आपल्या आदेशानुसार सैनिकांनी खेजडी वृक्ष तोडण्यासाठी अडथळे निर्माण करणाऱ्या अमृतादेवी आणि त्यांच्या साथीदारांची निर्दयपणे हत्या केल्याची वार्ता जेव्हा महाराज अभयसिंह यांना समजली, तेव्हा त्यांना अतीव वेदना झाल्या. त्यानंतर त्यांनी बिश्नोई जमातीचे वास्तव्य असलेल्या सर्व गावोगावीच्या खेजडी वृक्षांची तोड करण्यास कडक बंदी घातली. बिश्नोई समाजात ज्या कृष्ण मृगाला पवित्र मानून, त्याचे पारंपरिकरित्या रक्षण करण्यासाठी नियम केला होता, त्या कृष्ण मृगाच्या शिकारीवर कायदेशीररित्या बंदी घातली.
पंधराव्या शतकात जन्माला आलेल्या संत जंभेश्वर यांनी राजस्थानात वृक्षवेली आणि पशुपक्षी यांच्या संवर्धन आणि संरक्षणाला प्राधान्य देण्याबरोबर, भूतदया आणि मानवी मूल्यांच्या विचारधारेचा पुरस्कार करणाऱ्या बिश्नोई संप्रदायाची स्थापना केली होती. त्या संप्रदायाचे अनुयाची असणाऱ्या अमृतादेवी आणि त्यांच्या साथीदारांनी खेजडी वृक्षाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च आत्मबलिदान केले. पर्यावरण संरक्षणासाठी त्याग करणाऱ्या अमृतादेवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची स्मृती अखंड आणि अक्षय रहावी म्हणून खेजडगी गावात स्मृतीस्थळ उभारले. आज तेथे जंभेश्वर भगवान यांचे सुंदर मंदिर, अमृतादेवी यांचा पुतळा यांच्यासह कडुनिंब, खेजडी आदी वृक्षांनी समृद्ध पशुपक्षी यांना पूर्णपणे अभय प्रदान करणारे स्मृतीवन निर्माण केलेले आहे. आज राजस्थानातील पाली जिल्ह्यातील जाडन येथील आंतरराष्ट्रीय जैवविविधतेशी आध्यात्मिक एकात्मताविषयक परिषदेत सहभागी होऊन जोधपूरला परतत असताना, या ऐतिहासिक स्थळाचे दर्शन घेऊन पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी ऊर्जा घेण्याचा २२ ऑक्टोबर, २०२६ रोजी अपूर्व योग जुळून आला.
अमृतादेवी आणि त्यांच्या साथीदारांनी वृक्ष संरक्षणार्थ पत्करलेल्या हौतात्म्याची कथा अगणित लोकांसाठी शेकडो वर्षांपासून स्फूर्ती स्रोत ठरली. मृत्यूला सामोरे जाताना त्यांच्या ओठावरचे शेवटचे शब्द : “सिर साँठे रुख रहे तो भी सस्तो जाण” समस्त बिश्नोई संप्रदायासाठीच नव्हे, तर जगभरातल्या वृक्षप्रेमींसाठी प्रेरणेचा मंत्र ठरले.
खेजडी वृक्षांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी बिश्नोई समाजाने प्रत्येक झाडाला मिठी मारून जो त्याग केला तो केवळ राजस्थानासाठी नव्हे, तर भारतातील समस्त वृक्षप्रेमींसाठी संस्मरणीय घटना ठरली. हिमालयात वसलेल्या गढवाल प्रांतात जेव्हा तेथील वृक्ष तोडण्यासाठी गावात सरकारी कंत्राटदार आपल्या कामगारांसह आले, तेव्हा गौरादेवी आणि त्यांच्यासमवेत कार्य करणाऱ्या समविचारी महिलांनी अमृतादेवींप्रमाणे प्रत्येक झाडाला मिठी मारली आणि कुऱ्हाडीच्या घावापासून झाडांचे रक्षण केले. सुंदरलाल बहुगुणा, चंडीप्रसाद भट यांच्या विचारधारेने प्रभावित झालेल्या कार्यकर्त्यांनी अमृतादेवींच्या विचारधारेचे पुनरुज्जीवन केले. त्यांच्या प्रखर निर्धारामुळे शेवटी सरकारने प्रस्तावित वृक्षतोड रद्द करण्याचा निर्णय घेतला. हिमालयातील हे आंदोलन ‘चिपको’ नावाने अजरामर झाले. १७३० साली अमृतादेवी आणि त्यांच्या साथीदारांनी आत्मबलिदान केले, तर १९७३ साली झालेल्या ‘चिपको’ आंदोलनात गौरादेवी आणि त्यांच्याबरोबरच्या सहकारी महिलांनी त्याच निर्धाराने वृक्षतोड रोखून इतिहास निर्माण केला.
‘चिपको’ आंदोलन यशस्वी झाल्याने, त्यातून प्रेरणा घेऊन दक्षिण भारतातील केरळ राज्यातील स्थानिक जनता प्रस्तावित सायलंट व्हेली धरण आणि जलविद्युत प्रकल्पामुळे जगातील वैशिष्टयपूर्ण सदाहरित जंगलाचा ऱ्हास होणार म्हणून एकसंध झाली आणि तेथील प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याच्या कार्यात यशस्वी झाली.
अमृतादेवी आणि त्यांच्या ३६३ साथीदारांनी खेजडी वृक्षांच्या रक्षणासाठी जे आत्मबलिदान केले, ती घटना केवळ भारतातीलच नव्हे, तर वृक्षवेलींच्या रक्षणासाठी कार्यरत राहणाऱ्या पर्यावरण कार्यकर्त्यांना प्रेरणास्त्रोत ठरले. जोधपूर ते जाडन मार्गावर खेजार्ली गावात १७३० साली खेजडी वृक्षांच्या संरक्षणासाठी कार्यरत असताना हौतात्म्य पत्करलेल्या अमृतादेवी आणि त्यांच्या साथीदारांचा त्याग वर्तमान आणि आगामी काळातल्या पर्यावरण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी घटना ठरली.
राष्ट्रीय पातळीवरील मान्यता
२०१३ मध्ये भारत सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने ११ सप्टेंबर हा दिवस अधिकृतपणे राष्ट्रीय वन शहीद दिन म्हणून घोषित केला. त्या दिवसापासून दरवर्षी देशभरात स्मृतीदिन पाळला जातो. वन विभागातर्फे स्मरण सोहळे आयोजित होतात.
झाडं लावण्याचे उपक्रम, पर्यावरण जागृती रॅली, कार्यशाळा होतात. वनरक्षक शहीद स्मारकांवर श्रद्धांजली वाहिली जाते. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वनसंवर्धनाचे महत्त्व पटवून सांगितले जाते. भारतभरातील सरकारी संस्था, वन विभाग आणि पर्यावरणीय संघटना वन शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आयोजित करतात. वन आच्छादनाचे संरक्षण आणि भरपाई करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून अनेक समुदाय आणि संघटनांतर्फे वृक्षारोपण मोहीम राबवली जाते.
- राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५


