परप्रांतीय कोंबड्यांचे 'फिटनेस'

वेगवेगळ्या राज्यांतून गोव्यात आणल्या जाणाऱ्या कोंबड्या गोव्यात स्वस्त देणे कसे परवडते, त्या राज्यांमध्ये आणि गोव्यातही समान दर कसा असू शकतो, हाही एक संशोधनाचा मुद्दा आहे. त्यामुळे गोव्यात आणल्या जाणाऱ्या कोंबड्यांबाबत काही खुलासे होण्याचीही गरज आहे.

Story: संपादकीय |
27th October, 11:45 pm
परप्रांतीय कोंबड्यांचे 'फिटनेस'

गोव्यात परराज्यातून आणल्या जाणाऱ्या कोंबड्यांना तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र सक्तीचे करणारा आदेश पशुसंवर्धन खात्याने जारी केला आहे. हा फक्त आदेश आहे. त्यासाठी खात्याकडे गोव्याच्या चेकनाक्यांवर किंवा रेल्वेतून येणारा माल तपासण्यासाठी विशेष यंत्रणा नाही. प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम, १९६० अंतर्गत प्राणी वाहतूक नियम आणि केंद्रीय मोटर वाहतूक कायदा यांचा आधार घेऊन गोव्यात प्राण्यांची आणि विशेषतः कोंबड्यांची सुरक्षित वाहतूक होणे गरजेचे आहे. तसेच, ज्या भागातून त्या गोव्यात आणल्या जात आहेत, तिथल्या सक्षम अधिकाऱ्यांकडून त्या आरोग्याने चांगल्या असल्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. गोव्याच्या पशुसंवर्धन खात्याच्या संचालकांनी हा आदेश जारी केला आहे. अर्थात ‘मुख्यमंत्री स्वयंपूर्ण गोवा पोल्ट्री विकास धोरण २०२५’ राबवण्यासाठी सुरक्षित, स्वच्छ पोल्ट्री गोव्यात असाव्यात अशा हेतूने हे नियम लागू केले आहेत. त्याची अंमलबजावणीही होईल असे अपेक्षित आहे. अशा प्रकारचे आदेश येतात, परंतु चेकनाक्यांवर काय सुरू आहे त्याची दुसरी बाजूही तेवढीच महत्त्वाची आहे. 

गोव्यातील चेक नाक्यांवर अस्वच्छ, सुरक्षित नसलेले, प्रमाणित नसलेले किती मांस, प्राणी, पक्षी आतापर्यंत पकडले? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तरही शून्य असेल. प्राणीप्रेमी सांगतात तेव्हाच मांस पकडले जाते. मात्र पोल्ट्रीच्या कोंबड्यांची कधीच तपासणी होत नाही. गोव्यात दिवसाला हजारो कोंबड्या लागतात. सर्व कोंबड्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातून गोव्यात आणल्या जातात. मात्र कुठल्याच चेकपोस्टवर अस्वच्छता किंवा खाण्यासाठी असुरक्षित असल्यामुळे कोंबड्या कधी जप्त झालेल्या नाहीत. चेकपोस्टवरील भ्रष्टाचार तर हल्ली वारंवार काही नागरिकांकडून व्हिडिओ काढून सोशल मीडियावर दाखवला जातो. ते पाहिल्यास तिथे काय सुरू आहे, ते लक्षात येते. त्यामुळे तिथून गोव्यात कुठल्याही प्रकारचे मांस किंवा प्राणी, पक्षी आयात होण्यास वाव आहे. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने तसा आदेश पशुसंवर्धन खात्याने जारी केला आहे, तशाच प्रकारे आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांना चेकपोस्टवर अचानक भेटी देऊन वाहनांची पाहणी करण्यासाठी तसेच कोंबड्या, प्राणी सुरक्षित आणि इतर नियम पाळून गोव्यात आयात होतात का, ते तपासण्याची गरज आहे.

पोल्ट्रीच्या कोंबड्या स्वस्त असल्यामुळे लोक त्यांना पसंती देतात. मात्र त्यांची आरोग्यविषयक तपासणी होत नाही. त्यांच्यामुळे गोव्यात संसर्गजन्य रोग पसरू शकतात, हेही लक्षात घ्यावे लागेल. तसेच ज्या पोल्ट्री येतात त्या खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत का, त्यांची पाहणी कधीच केल्याचे ऐकिवात नाही. गोव्याबाहेरून आणले जाणारे प्राणी, कोंबड्या यांची पशुवैद्यकीय तपासणी आणि जैवसुरक्षा तपासणी करणे आवश्यक आहे. पक्ष्यांमधील संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अशा प्रकारची तपासणी गोव्याच्या हद्दीतही व्हायला हवी. बेळगाव, कोल्हापूर, हुबळी भागातून गोव्यात थेट कोंबड्या आणल्या जातात, मात्र गोव्यात त्याची तपासणी होणे गरजेचे आहे. पोल्ट्रीच्या कोंबड्यांविषयी समाजात अनेक तर्क-वितर्क आहेत. ते दूर करण्यासाठी आणि खरोखरच त्या मानवी जीवितास धोका निर्माण करणाऱ्या नाहीत, हे स्पष्ट होण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने त्यांची तपासणी होणे गरजेचे आहे. पशुसंवर्धन खात्याने गोव्यात स्वयंपूर्ण पोल्ट्री व्यवसायाला चालना देताना आणि तो व्यवसाय वाढीस लावताना बाहेरून गोव्यात येणाऱ्या पोल्ट्रीची तपासणी सक्तीची केली, तर बरेच प्रश्न सुटणार आहेत. संचालकांनी काढलेल्या आदेशात वाहतुकीसंबंधित नियमांमध्ये कोंबड्यांची हाताळणी, वाहतूक तसेच त्यांची सुरक्षा या गोष्टींवर भर दिला आहे. पण सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असा की गोव्यात परराज्यांतून येणाऱ्या पोल्ट्री आरोग्यासाठी योग्य आहेत का, त्याची तपासणी करण्याचा. त्याकडे लक्ष दिले, तर पोल्ट्रीमध्ये गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. गोव्याला पोल्ट्री व्यवसायात स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकारने धोरण तयार केले आहे, त्या अंतर्गत गोव्यातील व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन गोव्यात कोंबड्यांचा व्यवसाय सुरू करावा, असा सरकारचा हेतू आहे. हा हेतू साध्य व्हावा आणि गोव्यात पोल्ट्रीचा व्यवसाय व्हावा असे सरकारला खरोखरच वाटत असेल, तर बाहेरून गोव्यात आणल्या जाणाऱ्या कोंबड्यांच्या स्वच्छतेसह आरोग्याच्या तपासणीवर भर देणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या राज्यांतून गोव्यात आणल्या जाणाऱ्या कोंबड्या गोव्यात स्वस्त देणे कसे परवडते, त्या राज्यांमध्ये आणि गोव्यातही समान दर कसा असू शकतो, हाही एक संशोधनाचा मुद्दा आहे. त्यामुळे गोव्यात आणल्या जाणाऱ्या कोंबड्यांबाबत काही खुलासे होण्याचीही गरज आहे.