दिवि सूर्य सहस्त्रस्य भवेद्युगपदुत्थिता।
यदि भा: सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मन: ।।१२।।
सरळ अर्थ : आकाशात सहस्त्रावधी सूर्यांचा एकदम उदय झाला असता जो प्रकाश प्रकट होईल, तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रभेची बरोबरी क्वचितच करील.
विस्तृत विवेचन : या अध्यायातील ९व्या श्लोकापासून ते १४व्या श्लोकापर्यंतचे ६ श्लोक संजयाच्या तोंडचे आहेत. सध्याच्या १२व्या श्लोकात तो म्हणत आहे की त्याच्या (म्हणजे त्या विश्वरूपाच्या) अंगकांतीची अपूर्वता निरुपम होती. असे म्हणतात की कल्पांताच्या वेळी बारा सूर्यांचे तेज एकत्रित होते. तसे ते हजार सूर्य जरी एकाच वेळी प्रकटले तरी त्यांचे तेज या विश्वरूपाच्या अंगकांतीसमोर फिके पडेल एवढा त्या अंगकांतीचा महिमा आहे. काळाग्नीची सामुग्री घेऊन सर्वही विजांचा मेळावा करून त्यात दहा महातेजांचा समुदाय जरी मिसळला, तरीही ते सगळे मिळून सुद्धा या विश्वरूपाच्या अंगकांतीच्या तेजाशी काही अंशीच तुळेल. पूर्ण तुलना होणारच नाही हे निश्चित. असे व अशा प्रकारे भगवंताच्या कांतीचे तेज फाकत आहे आणि केवळ महर्षी व्यास महाराजांच्या कृपेने हे दिव्य तेज आज मला इथे बघायला मिळत आहे.
तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा।
अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा।।१३।।
सरळ अर्थ : असे आश्चर्यकारक रूप पाहत असता पांडुपुत्र अर्जुनाने त्या वेळी अनेक प्रकारे विभागलेले संपूर्ण जगत् त्या देवाधिदेव श्रीकृष्ण भगवंतांच्या शरीरात एकत्रित असलेले पाहिले.
विस्तृत विवेचन : या आधी आलेल्या वर्णनाव्यतिरिक्त अर्जुनाला भगवंतांच्या त्या विश्वमय रूपात आणखी बरेच काही दिसले. आपल्या विस्ताराने असलेले जग त्याने तिथे पाहिले. महासागरात एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी जसे लहान लहान असंख्य बुडबुडे दृष्टीस पडतात; किंवा आकाशात जसा गंधर्वनगरे असल्याचा भास होतो
(गंधर्वनगरी म्हणजे काल्पनिक अथवा मिथ्या गोष्ट; आकाशातील ढगांच्या आकृतींवर होणारा नगरादिकांचा भास; हवेत प्रकाशकिरणांच्या वक्रगतीने उत्पन्न झालेला भूलोकावरील शहरे, बागा इत्यादि पदार्थांचा देखावा) किंवा जमिनीवर जशी ठिकठिकाणी वारूळे बघायला मिळतात, किंवा मेरू पर्वतावर जणू काही अनेक बारीक बारीक परमाणू बसलेले दिसावेत; तसे अर्जुनाने तेव्हा श्रीकृष्णाच्या त्या विश्वरूप स्वरूपात सगळे जग सामावलेले बघितले.
तत: स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजय: ।
प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत।।१४।।
सरळ अर्थ : आणि त्यानंतर तो आश्चर्याने चकित होऊन हर्षाने रोमांच उभे राहिलेला अर्जुन विश्वरूप परमात्म्याला श्रध्दाभक्तिसहित शिरसा प्रणाम करून हात जोडून बोलू लागला.
विस्तृत विवेचन : तशी त्यावेळी अर्जुनाची स्थिती काय झाली पाहा. "ते वेगळे विश्व आणि वेगळा आपण स्वतः" हे दुजेपण सुरवातीला काही क्षण टिकले खरे, पण मग तेही संपूर्ण आटून गेले आणि एकाएकी त्याचे मन मावळले. अंतरांत ब्रह्मानंद जागृत झाल्यामुळे बाहेरील अवयव गळून पडले. पायांपासून डोक्यापर्यंत सगळी काया रोमांचित झाली. सुरवातीच्या पावसाचे पाणी डोंगरांवरून ओघळून गेल्यानंतर जसे त्या डोंगरांवर सगळीकडे अति सुकुमार असे तृणांकुर उगवलेले दिसतात, तसे तेव्हा पार्थाच्या शरीरी सगळीकडे रोमांच उभे राहिले. चंद्रकिरणांचा स्पर्श होताक्षणी जसा सोमकान्त मणि द्रवतो तसे पार्थाचे संपूर्ण शरीर स्वेद-बिंदूंनी डबडबून आले. कमळाच्या कळीमधे भुंगा अडकल्यानंतर ती जशी पाण्यात हलते तशी अंतरात आनंदाच्या लाटा उसळायला लागल्यावर अर्जुनाची देहाकृती थरथरा कांपायला लागली. कापूरकेळीच्या गाभाऱ्यात कापूर दाटल्यावर जशी त्याची सोपटे सुटून त्यातून कर्पुराचे कण ओघळायला लागतात, तसे अर्जुनाचे नयनकमल भरून येऊन त्यातून आनंदाश्रू ओघळायला लागले.
चंद्रोदय होताच जसा समुद्र उचंबळायला लागतो तसा स्वानंदाचा भर येऊन पार्थ वारंवार उचंबळायला लागला. अशी अष्टसात्विक भावांची प्रत्यक्ष परस्पर चढाओढ लागली आणि त्यात पार्थाला पूर्ण ब्रह्मानंदसाम्राज्याचे पद प्राप्त झाले. त्याला अद्वैतसुखाचा असा साक्षात्कार प्रत्यक्ष भोगायला लावून कृष्णाने त्याच्यावरील आपल्या कृपादृष्टिक्षेपाने देव-भक्तपण वेगळे राखून ठेवले होते. त्यायोगे मग तो अर्जुन जिथे बसला होता तिथूनच हात जोडून एक दीर्घ नि:श्वास सोडून कृष्णाकडे निरखून बघायला लागला आणि नतमस्तक होऊन म्हणाला –
पश्यामि देवांस्तव देव देहे
सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान्।
ब्रह्माणमीशं कमलासनस्थ–
मृषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान्।।१५।।
सरळ अर्थ : हे देवा, तुझ्या शरीरात सर्व देवांना तसेच अनेक भूतांचे समुदायांना व कमळाच्या आसनावर बसलेल्या ब्रह्मदेवाला तसेच महादेवाला व सर्व ऋषींना त्याचप्रमाणे दिव्य सर्पांना मी पाहतो आहे.
विस्तृत विवेचन : हे प्रभो, तुझा जयजयकार असो. तुझी माझ्यावर थोर कृपा आहे. हे सर्वेश्वरा, मी अगदी सामान्यजन असूनही आज तुझे अद्भुत असे विश्वरूप बघतोय. त्यामुळे साहजिकच माझ्या जीवाला संतोष झाला. हे कृपेच्या सागरा, तू चांगले केलेस. मंदर पर्वताच्या आश्रयाने जशी ठायीठायी हिंस्त्र श्वापदांची अरण्ये आहेत, तसे तुझ्या देही इंद्रलोकासारख्या अनेक लोकांची गर्दी दिसत आहे.
आकाशी अंतराळात जसे नाना ग्रह-गण एकत्र दिसून येतात किंवा मोठ्या झाडावर जशी पाखरांची लहान लहान घरटी दिसतात, तसा तुझ्या देही देवगणांसमवेत पुरता स्वर्ग व्यवस्थित दिसतो. हे देवा पंचमहाभूतांची अनेक पंचके मी तुझ्या देही बघतोय आणि भूत-सृष्टीतील एक-एक प्राण्याचे सकल समुदायही मी तुझ्या ठायी बघत आहे. ब्रह्मदेव, सत्यलोक व कैलासही तिथे मला दिसत आहे, तिथे एके ठिकाणी पार्वतीमातेसहित शंभू भोलानाथही दिसत आहे आणि हे हृषीकेशा, तुझ्या शरीरात मला तू सुध्दा दिसत आहेस. (क्रमशः)

- मिलिंद कारखानीस, (लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.) मो. ९४२३८८९७६३


