आंदोलन आणि अदृष्य शक्तींचा भ्रम

ज्या चुका होत आहेत, त्या सुधारण्यासाठी मोहन भागवत यांनी सरकारी व्यवस्थेला काही सूचना केल्या, तर त्याचा फायदा देशालाच होईल आणि पश्चिमेकडून काही शक्ती भारताला लक्ष्य करत असतील, तर त्यावरही दिल्लीत असलेल्या सरकारला भागवत यांनी सावध करायला हवे.

Story: संपादकीय |
21st October, 09:47 pm
आंदोलन आणि अदृष्य शक्तींचा भ्रम

भारतात सुरू झालेले कॉक्रोच जनता पार्टी किंवा विरोधी पक्षांकडून सुरू असलेले आंदोलन आणि फ्रान्समध्ये सुरू असलेले आंदोलन या दोघांचे मुद्दे पाहिले, तर त्यात साम्य आहे. आणि देशांमध्ये शिक्षण, रोजगार आणि महागाई या विषयांवरून आंदोलने होत असतील, तर त्याचे आश्चर्य वाटायला नको. यापूर्वी श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ यासारख्या देशांमध्ये अशाच विषयांवरून आंदोलने पेटलेली आहेत. पण या देशांमध्ये कोणीतरी अदृश्य शक्ती हे सारे घडवून आणत आहे, असे म्हणणे म्हणजे विनोदच ठरेल. लोक आपल्या हक्कांसाठी आणि भविष्यासाठी लढा देत असतील, तर त्याचा संबंध कोणीतरी असंतोष निर्माण करू पाहत आहे, याच्याशी जोडणे म्हणजे निव्वळ वेडेपणाच ठरणार आहे. तसा संबंध लावण्याचा नवा प्रकार आता कुठे सुरू होत आहे. आता तोच कित्ता काहीजण गिरवतील. कारण खुद्द संघप्रमुखांनी हे पिल्लू सोडले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरात झालेल्या विजयादशमीच्या कार्यक्रमात संघप्रमुख मोहन भागवत यांनी काही देशांतील आंदोलनांचा दाखला देत भारताला लक्ष्य करण्याचे काही जागतिक शक्तींचे प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. पश्चिमेकडून आलेल्या काही प्रवृत्ती व्यवस्था, संस्कृती आणि मांगल्य नष्ट करू पाहत आहेत, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या या पश्चिमेकडून आलेल्या प्रवृत्ती म्हणजे नेमक्या कोणत्या हे त्यांनी उघडपणे सांगितले नसले, तरी त्यामागेही विरोधकांच्या आंदोलनाला डिवचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे स्पष्ट दिसते.

भागवत यांनी भारताची सातत्याने होत असलेली प्रगती काही जागतिक शक्तींना पाहवत नाही, असा उल्लेख करून फ्रान्स, अल्बानिया, नेपाळ आणि बांगलादेश या देशांमधील आंदोलनांचा उल्लेख केला. भागवत यांनी मागच्या काही काळात केलेली विधाने ही ते ‘जेन-झी’च्या समर्थनात असल्याचे भासवत होती. मात्र, आता त्यांनी पलटवार करत आंदोलनांमागे पश्चिमेकडून आलेल्या काही प्रवृत्ती असल्याचे म्हटले आहे. भागवत यांच्या विधानांमागे निश्चितच काहीतरी गुपित दडलेले असावे, अन्यथा एवढ्या मोठ्या संस्थेचे प्रमुख अशा पद्धतीने भाष्य करणार नाहीत. इतिहासात डोकावले, तर भारतात अनेक समूह हे पश्चिमेकडून आल्याच्या नोंदी आहेत. मग त्यात वृत्ती कमी आणि प्रवृत्ती जास्त होत्या. मात्र, देशातील व्यवस्था बिघडवण्यासाठी अशा प्रवृत्ती भारतात आल्याचे भागवत यांचे विधान विचार करायला लावण्यासारखे आहे.

भागवत यांच्या मते सत्ताबदलामुळे परिस्थिती बदलत नाही आणि नव्या पिढीला कर्तृत्वाची जाणीव झाल्याचेही ते म्हणतात. असे म्हणत असताना देशातील आंदोलनांना पश्चिमेकडून पाठबळ मिळत असावे, असा त्यांचा युक्तिवाद विरोधाभास निर्माण करणारा आहे. कारण या आंदोलनात आज देशातील तरुण पिढीच पुढे येत आहे. ज्या पद्धतीने भागवत यांनी देशातील आंदोलनांबाबत चिंता व्यक्त केली आहे, ते पाहता संघाने या आंदोलनांचा विषय बराच गांभीर्याने घेतला आहे. ही आंदोलने का होतात, त्यावर संघाचे मंथन सुरू असावे. त्यातूनच असे सविस्तर व अभ्यासपूर्ण विचार त्यांनी मांडले असावेत. संघाने जर आंदोलनांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असेल, तर सध्या फ्रान्समध्ये शिक्षणव्यवस्थेतील बदल आणि रोजगार या विषयांवरून जी आंदोलने होत आहेत, तशीच पार्श्वभूमी इथेही आहे. त्यामुळे हे विषय चांगल्या प्रकारे हाताळण्याचा सल्ला त्यांनी दिल्लीतील लोकांना दिला, तर बरेच प्रश्न सुटतील. ‘नीट’सारख्या परीक्षेचे पेपर फुटणे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी आत्महत्या करणे, ही बाब देशातील युवकांना व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी रस्त्यावर उतरण्यासाठी पुरेशी आहे. अशा आंदोलनांचा अर्थ भागवत यांनी पश्चिमेतील शक्ती युवकांना भडकावत आहेत असा काढला असेल, तर निश्चितच भागवत यांनीच आपल्या विधानावर विचार करायला हवा. अशी आंदोलने ही या काळाची गरज आहेत, त्यांना नाव देण्यापेक्षा ही व्यवस्था बदलण्यासाठी संघाने आणि भागवत यांनी सत्ताधाऱ्यांना काय सूचना केल्या, त्या जर जाहीरपणे सांगता आल्या, तर ते सर्वांसाठी अधिक सोयीचे ठरेल. आंदोलने निश्चितच शांततापूर्ण व्हावीत, पण सध्यातरी कुठलेच आंदोलन हे हिंसक पद्धतीने केल्याचे दिसलेले नाही. त्यामुळे ज्या चुका होत आहेत, त्या सुधारण्यासाठी भागवत यांनी सरकारी व्यवस्थेला काही सूचना केल्या, तर त्याचा फायदा देशालाच होईल आणि पश्चिमेकडून काही शक्ती भारताला लक्ष्य करत असतील, तर त्यावरही दिल्लीत असलेल्या सरकारला भागवत यांनी सावध करायला हवे.