विधानसभा निवडणूक जवळ आली की दरवेळी भाजप आणि मगोमध्ये तणाव निर्माण होतो. उंदरा-मांजराचा खेळ सुरू होतो. गेल्या दोन निवडणुकांत हेच चित्र सर्वांनी अनुभवले आहे. सरकार स्थापनेवेळी भाजपसोबत राहायचे आणि निवडणूक जवळ आल्यानंतर जागा वाटपावरून भाजपसोबत दोन हात करायचे. पुन्हा निकाल लागल्यानंतर सर्वात पहिला पाठिंबा कोण देत असेल, तर तोही मगोच असतो. या दोन्ही पक्षातील राजकारणाला निवडणूक जवळ आल्यानंतरच कलाटणी मिळते आणि निकालानंतर त्यांचा समेटही होतो. दोनवेळा त्यांना भाजपने आपल्या सरकारमधून अपमानित करून बेदखल केले होते. पण त्यानंतर झालेल्या निवडणुकांच्या निकालानंतर मगो पुन्हा भाजपच्या सरकारमध्ये आला. मगोचे नेते सुदिन ढवळीकर हे त्यामुळेच गेली काही वर्षे सातत्याने सरकारमध्ये मंत्री असतात आणि काही महत्त्वाची खातीही त्यांच्याकडे असतात. त्या काळात ते आपल्या पदाचा वापर करून मगोसाठी कुठे जागा मजबूत करता येतील तिथे उमेदवार हेरून भाजपसमोर आव्हान उभे करतात. निवडणूक जवळ आली की भाजप आणि मगोमध्ये यावरूनच तणाव तयार होतो आणि दोन्ही पक्ष जनतेला दाखवण्यासाठी का असेना, एकमेकांशी वैर घेतात. हे त्यांचे वैर काही दिवसांपुरते असते. घटस्फोटाचा अर्ज मागे घेऊन, नवरा-बायको जसे लगेच एकत्र येतात; तसेच निकालानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येतात. यावेळीही तसेच काहीसे चित्र आहे.
निवडणूक जवळ आल्यामुळे भाजप आणि मगोमध्ये सध्या जागा वाटपावरून अपेक्षित धुसफूस सुरू झाली आहे. मगोने मडकईसह प्रियोळ, फोंडा, शिरोडा आणि मांद्रे अशा मतदारसंघांवर दावा केल्यामुळे भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. फोंडा, शिरोडा आणि प्रियोळ हे मतदारसंघ भाजपकडे आहेत. मांद्रे भाजपचाच बालेकिल्ला, पण तो मागच्या निवडणुकीत मगोकडे गेला. शिरोड्यातील आमदार सुभाष शिरोडकर हे सध्या मंत्री आहेत. रवी नाईक यांच्या निधनामुळे फोंड्यातील जागा रिक्त असली, तरी ती जागा भाजप सोडण्याची शक्यता नाही. प्रियोळमध्ये भाजपचा आमदार आहे. त्यामुळे मगोच्या अटी मान्य करणे भाजपला परवडणारे नाही. अर्थात अट मान्य केली, तर भाजपच्या थेट तीन-चार आमदारांची उमेदवारी जाईल. रवी नाईक आणि केतन भाटीकर हे दोन्ही नेते आज हयात नाहीत, त्यामुळे फोंड्यात सुदिन ढवळीकर डाव टाकत आहेत. दीपक ढवळीकर यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी शिरोडा किंवा प्रियोळ मतदारसंघ मिळावा, असा मगोचा प्रयत्न आहे. मडकईत सुदिन यांचे पुत्र मिथील ढवळीकर यांचे लाँचिंग ठरलेले आहे. कुटुंबप्रेमामुळे फोंडा तालुक्यातील काही जागा मिळाव्यात, असा ढवळीकरांचा आग्रह. युती तुटली, तर या जागा स्वबळावर मिळवण्यासाठीही मगोने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे आता भाजपसोबत जागा वाटपावरून मतभेद झाले, तर लगेच भाजप ढवळीकरांना सरकारमधून बाहेरचा मार्ग दाखवू शकतो. तसे झाले, तर स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी ढवळीकर कुटुंब मडकई, शिरोडा आणि फोंडा अशा तीन मतदारसंघांवर दावा करतील. शिवाय डिचोली, मांद्रे आणि पेडणे या मतदारसंघांतही उमेदवार उभे करून ते भाजपला अडथळा निर्माण करतील. एवढे करूनही शेवटी निकालानंतर मगो भाजपची गरज पूर्ण करेल, यात शंका नाही. त्यामुळेच भाजपच्या दिल्लीतील नेत्यांशी आपली सलगी असल्याचे संकेत ढवळीकर बंधू पुन्हा-पुन्हा आपल्या बोलण्यातून देत आहेत. एका बाजूने त्यांना कुटुंबातील तीन सदस्यांना विधानसभेवर निवडून आणायचे आहे, तर दुसऱ्या बाजूने मगोचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी राज्यात काही जागा लढवून मतांची टक्केवारीही शाबूत ठेवायची आहे. मगोच्या नेत्यांचे डावपेच पाहिले, तर भाजप-मगोची युती तुटण्याचीच जास्त शक्यता आहे. कारण भाजपसोबत युतीत राहून ते मागत असलेल्या जागा भाजप त्यांना उघडपणे देऊ शकत नाही. पण यात पडद्यामागून काही गोष्टी घडण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. युती तोडून मगोने हव्या त्या जागा लढायच्या आणि भाजपला मदत होईल अशा काही ठिकाणी मते फोडण्यासाठी उमेदवार उभे करायचे, असाही डाव खेळला जाऊ शकतो.
गेल्या २०-२५ वर्षांत मगो पक्षाचा सर्वाधिक फायदा हा ढवळीकर कुटुंबालाच झाला आहे. मगो पक्षाचे अस्तित्व राहावे याहीपेक्षा मगोच्या उमेदवारीवर ढवळीकर कुटुंबातील लोक निवडून यावेत, यासाठी मगो पक्षाची आजच्या घडीला जास्त धडपड दिसते. त्यासाठीच मडकईनंतर आता फोंडा, प्रियोळ आणि शिरोडा या मतदारसंघांवर मगोचा दावा आहे.


