सद्गुरू : कर्म निर्माण करण्याची भीती हे सर्वात वाईट कर्म आहे. कर्म हा काही तुमचा शत्रू नाही; हे समजून घेतले पाहिजे. तुम्ही इथे जिवंत आहात ते केवळ तुमच्या कर्मामुळे. कर्म हा तुमचा शत्रू नाही. सध्या तुमच्या भौतिक शरीराच्या अस्तित्वाचा आधार तुमचे कर्म आहे. जर तुमचे सर्व कर्म तात्काळ काढून टाकले गेले, तर याच क्षणी तुम्ही तुमचे शरीर सोडून जाल. हे तुमचा प्लग ओढून काढण्यासारखे आहे. या क्षणी तुम्ही तुमचे कर्म नष्ट करा आणि याच क्षणी तुम्ही तुमचे शरीर सोडून जाल. तुम्ही तुमच्या शरीराला यापुढे धरून ठेवू शकत नाही. तर कर्म हा एक डिंक आहे; कर्म म्हणजे ते आहे, ज्याने तुमच्या शरीराला एकत्र बांधून ठेवले आहे.
सर्व आध्यात्मिक प्रक्रियांद्वारे आपण जे करण्याचा प्रयत्न करत आहोत, ते म्हणजे आपण आपले सर्व कर्म ताबडतोब पुसून टाकत नाही आहोत. आपण जे काही करतो, त्या प्रक्रियेत आपल्याला एक विशिष्ट जागरूकता आणायची आहे. आता जर तुम्ही कारमध्ये बसलात, तर तुम्ही सीट बेल्ट लावता. सीट-बेल्ट ही एक चांगली गोष्ट आहे, ती तुमचा जीव वाचवू शकते. पण आता समजा तुम्ही सीट-बेल्ट अशा प्रकारे लावला आहे की, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तो उघडू शकत नाही. आता ती तुमची कैद आहे. जेव्हा तुम्ही कारमध्ये शिरता, तेव्हा तुम्ही दरवाजा बंद करता. ही एक चांगली गोष्ट आहे. पण समजा तुम्ही कारमध्ये बसलात आणि दरवाजा उघडता नाही आला, तर ते भयंकर आहे, नाही का? तर तुम्हाला फक्त दरवाज्याचे हँडल कुठे आहे हे जाणून घ्यायचे आहे. जर तुम्हाला हँडल कुठे आहे हे माहीत असेल, मग तुम्ही कर्माचा डोंगर जरी जमा केलात तरी काय समस्या आहे? जोपर्यंत तुमचा हात हँडलवर आहे, मग तुमच्याकडे कर्माचा डोंगर असला तरी, तुम्हाला काय अडचण आहे? कोणतीच अडचण नाही.
समस्या कर्मामुळे आलेली नाही, समस्या आली आहे ती तुम्ही त्यात अडकले गेल्यामुळे, त्यात गुंतून गेल्यामुळे. कर्माशिवाय तुमचे जीवन समृद्ध होत नाही. तुम्ही जीवनात किती कार्ये केली आहेत त्यावर तुमची सध्याची समृद्धी ठरते. जर तुम्ही काहीच केले नाही, तर तुमचे जीवन समृद्ध असेल का?
तर कर्म हा काही तुमचा शत्रू नाही. एखादी गोष्ट नेमकी काय आहे याबाबतची अनभिज्ञताच तुमचा शत्रू आहे. तेव्हा नवीन कर्म वा जुने कर्म याची भीती बाळगण्याची गरजच काय? नवीन किंवा जुन्या कर्माची भीती बाळगण्याची गरज नाही. हँडल कुठे आहे हे शोधून काढणे इतकेच तुम्हाला करायचे आहे.
नशिबावर विसंबून राहू नका
आश्रमात, आम्ही डोंगराच्या पायथ्याशी नारळाची बाग वाढवत आहोत. आम्ही विशिष्ट प्रमाणात सामुग्री टाकत आहोत आणि ती खूप चांगली वाढत आहे. आम्ही ही नारळाची बाग विकत घेण्यापूर्वी, त्यावर दुसरे कोणीतरी राहत होते. नारळाच्या बागेची काळजी घेणे हे त्यांचे पूर्णवेळ काम होते आणि प्रत्येक झाडाला सुमारे सत्तर नारळ येत होते. आम्ही यामध्ये आता थोड्याच काळापासून आहोत, आणि आमचा सगळा वेळ नारळाच्या बागेत जातही नाही – हे आम्ही करत असलेल्या छोट्या-मोठ्या गोष्टींपैकी एक आहे. पण आम्हाला आत्ताच प्रति झाड शंभरपेक्षा जास्त नारळ मिळत आहेत. आता आधीच्या मालकाने येऊन हे जर पाहिले, तर त्याला वाटेल की ते आमचे नशीब चांगले आहे.
दुसरा माणूस कदाचित दहापट जास्त काम करत असेल, पण डोंगराच्या माथ्यावर नारळाची बाग वाढवण्याचा प्रयत्न करत असेल. त्याला एकही नारळ मिळणार नाही. त्यामुळे तुम्हीही तेवढेच प्रयत्न करत असाल, पण कुठल्या परिस्थितीत, कुठल्या प्रकारच्या वातावरणात, तुमच्या आजूबाजूला काय वास्तव आहे, या सगळ्याचा विचार करायला हवा.
जर तुम्ही हुशार असाल, तर तुम्ही डोंगराच्या माथ्यावर नारळाची बाग वाढवण्याचा प्रयत्न करणार नाही; तुम्ही तिथे असे काहीतरी वाढवाल ज्याचा मी कधी विचारही केला नसेल. जर तुम्ही डोंगराच्या माथ्यावर असताना नारळाच्या बागेचा विचार करत असाल, तर तुम्ही दहापट जास्त प्रयत्न केले तरीही मला जे मिळते ते तुम्हाला मिळणार नाही, कारण तुम्ही वेगळ्या परिस्थितीत आणि वेगळ्या वास्तवात आहात. परिस्थितींमध्ये नेहमीच मैदान आणि पर्वतासारखा मोठा फरक नसेल. तिच्यात सूक्ष्म फरक असू शकतो. जर तुम्हाला ते समजले नाही, तर तुम्हाला वेड लागेल, पण यश मिळणार नाही. आयुष्य असेच असते.
त्यामुळे नशिबावर विसंबून राहू नका. योगायोगाने काही गोष्टी घडतात. पण जर तुम्ही संधीची वाट पाहत बसाल, तर तुम्ही तुमच्या चितेवर असाल तेव्हाच तुमच्यासोबत चांगल्या गोष्टी घडतील, कारण त्यासाठी वेळ लागू शकतो. अगदी क्वांटम सिद्धांत सुद्धा म्हणतो की तुम्ही प्रयत्न केल्यास, तुम्ही एक अब्जापैकी एक वेळ भिंतीमधून चालून जाऊ शकता, कारण तेथे कणांचे स्पंदन होत असते आणि तुम्हाला ती फट सापडू शकते आणि प्रत्यक्षात भिंतीमधून चालून जाऊ शकता.
इतकेच की तुम्ही त्या एक अब्जव्या वेळेपर्यंत पोहोचण्यापूर्वी, तुमची कवटी फुटलेली असेल. जेव्हा तुम्ही योगायोगाने जगत असता, तेव्हा तुम्ही भीती आणि चिंतेमध्ये जगता. जेव्हा तुम्ही हेतू आणि क्षमतेच्या आधारे जगता, तेव्हा काय घडते किंवा घडत नाही हे महत्त्वाचे नसते. तुमच्यासोबत जे काही घडत असेल त्यावर तुमचे नियंत्रण तरी असेल. हे अधिक स्थिर जीवन आहे.



