कोल्हापूरची कुलस्वामिनी, लाखो-करोडो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा नवरात्रोत्सवातील पालखी प्रदक्षिणा सोहळा अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. 'उदं गं अंबे उदं!', 'अंबाबाईच्या नावानं चांगभलं!' आणि 'आदिमाया अंबाबाई... साऱ्या दुनियेची आई!' या गगनभेदी जयघोषांनी केवळ मंदिर परिसरच दुमदुमून जाते. सुगंधी फुलांनी सजवलेली देखणी पालखी, उत्सवमूर्तीवर होणारी सततची पुष्पवृष्टी, तोफेची घणघणाती सलामी, मानाच्या भाविणींच्या मुखातून पाझरणारी भावपूर्ण गौरवगीते. या प्रत्येक क्षणाने या ऐतिहासिक आणि लोभस परंपरेचे अप्रूप पुन्हा एकदा अधोरेखित केले. परंतु, या अलौकिक भक्तीच्या सोहळ्याला यंदा लागलेले एक गालबोट मात्र सुजाण समाजाला अंतर्मुख करायला लावणारे आहे.
गेल्या काही काळापासून सोशल मीडियावरील 'लाईक्स', 'व्ह्यूज' आणि प्रसिद्धीच्या आहारी गेलेली तरुण पिढी धार्मिक परंपरेच्या वेशीवर भरकटताना दिसत आहे. देवस्थाने, यात्रा आणि उत्सव ही मुळात आत्मिक शांती, साधना आणि अढळ श्रद्धेची पवित्र मंदिरे असतात. दुर्दैवाने, संस्कृतीचे भान नसलेले काही हुल्लडबाज या पावन सोहळ्यांकडे केवळ मनोरंजनाचे मैदान आणि 'व्हायरल' होण्याचे साधन म्हणून पाहू लागले आहेत. पालखी सोहळ्याच्या पवित्र वातावरणात 'इकडे बघा नारायणी, तिकडे बघा नारायणी' अशा अवमानकारक घोषणा देत हुल्लडबाजी करणे, धार्मिक सोहळ्याला एखाद्या स्टेडियम किंवा नाईट क्लबचे स्वरूप आणणे, हा प्रकार केवळ संतापजनकच आहे. अखिल ब्रह्मांडनायिनी आणि महाराष्ट्राची आदिशक्ती असलेल्या अंबाबाईच्या दरबारात चाललेली केवळ सोशल मीडियासाठी शोबाजी करणे भक्तांच्या श्रद्धा-भावना दुखावणारी आहे.
याच पार्श्वभूमीवर, यंदाच्या पालखी सोहळ्यात अशा हुल्लडबाज तरुणांना पोलिसांनी चांगलाच खाक्या दाखवला आहे. पालखी मार्गावर 'नारायणी नारायणी' असा अनुचित घोष करणाऱ्या तरुणांचा आवाज पोलिसांच्या कडक भूमिकेमुळे बंद झाला. पोलिसांनी अशा हुल्लडबाजांना फैलावर घेत शिस्त पाळण्यास भाग पाडले. नागरिकांमधून आणि समाजमाध्यमांवरूनही या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत असून, कोल्हापूरकरांनी आणि मंदिर प्रशासनाने अशा कृत्यांना ठामपणे मज्जाव घातला पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे. धर्म आणि संस्कृतीची आस्था जपण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन अशा गोष्टींना आळा घालणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या धार्मिक स्थळांचे पावित्र्य आणि पावित्र्याचा मान कायम राखता येईल.


