उत्तर जिल्हा इस्पितळाला ‘पार्किंग’चा विळखा

Story: अंतरंग |
12 hours ago
उत्तर जिल्हा इस्पितळाला ‘पार्किंग’चा विळखा

म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ हे उत्तर गोवा तसेच महाराष्ट्र राज्यातील सिंधदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख आरोग्य सेवा केंद्र आहे. या इस्पितळात उपचार घेण्यासाठी दररोज शेकडो नागरिक येतात. शिवाय इस्पितळातील आपत्कालीन कक्ष दिवस-रात्र व्यस्त केंद्र मानले जाते. सध्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी इस्पितळातील वाहन पार्किंग व्यवस्था अपुरी ठरत आहे. यामुळे लोकांना मुख्य रस्त्यावर वाहने उभी करावी लागत आहेत.

या अवैध पार्किंगमुळे पेडे ते म्हापसा या मुख्य रस्त्यावरील वाहन वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. इस्पितळाच्या आवारात वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने इस्पितळासमोरील रस्त्यावर ‘नो पार्किंग’च्या जागी ही वाहने खुलेआम पार्क केली जातात. यामुळे पेडे ते कोर्ट जंक्शन दरम्यानच्या रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण होण्यासोबतच सध्या हे म्हापसा शहरातील वाहतूक कोंडीचे नवीन ठिकाण म्हणून उदयास येत आहे.

उत्तर गोव्यासह शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने म्हापसा जिल्हा इस्पितळात येतात. या रुग्णांना घेऊन आलेली चारचाकी तसेच दुचाकींनी जागा तुडूंब भरून जाते. त्यामुळे लोकांना मुख्य रस्त्यावर नाईलाजाने वाहने पार्क करावी लागतात; यामध्ये विशेषतः चारचाकी ज्यात खासगी रुग्णवाहिकांचाही समावेश 

असतो.

पेडे जंक्शनवरून म्हापसा शहरात ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वाहनस्वारांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यात जिल्हा इस्पितळामुळे वाहनांची अजून भर पडली आहे. याशिवाय पेडणे व डिचोली तालुक्यातील प्रवासी बसेस आणि बस स्थानक ते इस्पितळादरम्यानच्या कदंब बसेस या रस्त्यावरूनच धावतात.

रस्त्यावर पार्क केलेल्या या वाहनांमुळे अर्धा रस्ता अडवल जातो. ज्यामुळे प्रवासी बसेस तसेच इतर चारचाकी वाहने रस्त्यावरून सहज पुढे जाऊ शकत नसल्याने या संपूर्ण रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. नंतर ही कोंडी सुटायला बराच वेळ लागतो आणि इस्पितळात ये-जा करणार्‍या रुग्णवाहिकाही या कोंडीत अडकून पडतात.  

या ठिकाणी ‘नो पार्किंग झोन’ असे दिशादर्शक फलक उभारलेले आहेत, तरीही लोक तेथे वाहने पार्क करतात. या अवैध वाहन पार्किंगमुळे सकाळच्या वेळेला वाहनस्वार, प्रवासी तसेच रुग्णसेवेला मोठा अडथळा होत असतो. म्हापसा आयटीआय पर्वरीला स्थलांतरित केल्यामुळे ती जागा विनावापर पडून आहे. ती जागा या वाहन पार्किंगसाठी वापरल्यास ही वाहतूक कोंडी तसेच पार्किंगची समस्या सुटू शकेल.