१७ वर्षीय माया राजेश्वरनचा ऐतिहासिक पराक्रम

Story: क्रीडारंग - टेनिस |
12th October, 11:05 pm
१७ वर्षीय माया राजेश्वरनचा ऐतिहासिक पराक्रम

भारतीय टेनिस जगतात एका नव्या ताऱ्याचा उदय झाला असून, कोइम्बतूरच्या अवघ्या १७ वर्षीय माया राजेश्वरन रेवती हिने इतिहास रचला आहे. पोर्तुगाल येथील लागोस येथे पार पडलेल्या ‘आयटीएफ डब्लू ३५’ टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मायाने स्पेनच्या २८ वर्षीय सेलिया सर्व्हिनो रुईझचा ६-४, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. या ऐतिहासिक विजयासह माया व्यावसायिक महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी भारतातील सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत तिने युक्रेनच्या येलिझावेटा कोटलियारच्या साथीने दुहेरीचेही विजेतेपद मिळवून दुहेरी मुकुट आपल्या नावे केला.

मायाच्या या ऐतिहासिक विजयाने भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झाच्या २२ वर्षांपूर्वीच्या पराक्रमाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. सानियाने २००४ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी लागोस (नायजेरिया) येथे आपले पहिले विजेतेपद जिंकले होते. मायानेही ११ ऑक्टोबर रोजी वयाच्या १७ व्या वर्षी लागोस (पोर्तुगाल) येथे हे विजेतेपद मिळवले. सानियाच्या त्या विजयानंतर तब्बल २२ वर्षांनी असा पराक्रम करणारी माया पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

जागतिक क्रमवारीत १०३८ व्या क्रमांकावर असलेल्या मायाने या स्पर्धेत पात्रता फेरीपासून सुरुवात केली होती. संपूर्ण स्पर्धेत तिने एकही सेट गमावला नाही. मुख्य ड्रॉच्या पहिल्याच फेरीत तिने अव्वल मानांकित जुस्टिना मिकुलस्कीतेला पराभूत केले. या सामन्यात पहिल्या सेटमध्ये ०-५ ने पिछाडीवर असतानाही मायाने हार मानली नाही आणि चकमदार पुनरागमन करत विजय मिळवला.

अंतिम सामन्यात पहिला सेट जिंकल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाबद्दल सांगताना माया म्हणाली, “मी स्वतःवर जास्त दबाव घेत असल्याचे मला जाणवले. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी मी सकाळी ऐकलेल्या एका गाण्याची धून मनातल्या मनात गुणगुणायला सुरुवात केली. यामुळे मला मन शांत ठेवण्यास मदत झाली. मॅच पॉईंटच्या वेळीही मी त्याला एक सामान्य पॉईंट मानूनच खेळले.”

कारकिर्दीच्या सुरुवातीला स्पेनमधील ‘राफेल नदाल अकॅडमी’मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर, माया सध्या फ्रान्समधील कॅन्स येथील ‘एलिट टेनिस सेंटर’मध्ये सराव करत आहे. जिथे मिरा अंद्रेवा आणि डॅनिल मेदवेदेवसारख्या दिग्गजांनी प्रशिक्षण घेतले आहे. याआधी २०२५ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी तिने मुंबई ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारून सर्वांचे लक्ष वेधले होते. “ही तर फक्त सुरुवात आहे. या विजयामुळे माझा आत्मविश्वास वाढला असून, मी उच्च स्तरावर खेळू शकते याची खात्री पटली आहे,” असा विश्वास मायाने व्यक्त केला.