आंतरराष्ट्रीय कायद्याचे महत्त्व अधोरेखित करणे, मानवी हक्कांचे संरक्षण करणे आणि युद्धगुन्हे तसेच नरसंहारासारख्या गंभीर अपराधांसाठी जबाबदार व्यक्तींना न्यायालयासमोर उभे करण्याच्या प्रयत्नांतील योगदानाबद्दल भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकेतील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ नवनेथेम उर्फ नवी पिल्ले यांना २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. ९ ऑक्टोबर रोजी नॉर्वेजियन नोबेल समितीने या पुरस्काराची घोषणा केली. नवी पिल्ले यांचा जीवनप्रवास हा वर्णभेदाविरुद्धच्या संघर्षापासून आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. नवी पिल्ले यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील भारतीय तमिळ वंशाच्या कुटुंबात झाला. त्यांच्या बालपणी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाचे धोरण अस्तित्वात होते. या व्यवस्थेत कृष्णवर्णीय आणि इतर वांशिक समुदायांना अनेक प्रकारच्या भेदभावाला सामोरे जावे लागत होते. या सामाजिक परिस्थितीचा त्यांच्या विचारांवर खोल परिणाम झाला. कायद्याचे शिक्षण घेऊन त्यांनी वकिली सुरू केली आणि अन्यायग्रस्त व्यक्तींच्या हक्कांसाठी लढण्याचा मार्ग निवडला. १९६७ मध्ये त्या नाताल प्रांतात स्वतःची कायदेविषयक वकिली सुरू करणाऱ्या पहिल्या महिल्या ठरल्या. पुढे त्यांनी वर्णभेदविरोधी कार्यकर्त्यांचे प्रतिनिधित्व केले आणि राजकीय कैद्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. नवी पिल्ले यांच्या कार्याचा पाया दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी संघर्षात आहे, असे म्हणता येईल. वकिली करताना त्यांनी दाखवलेली संवेदनशीलता पाहून १९९५ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या उच्च न्यायालयात ज्यावेळी त्यांची नियुक्ती झाली, त्यावेळी त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला न्यायाधीश ठरल्या. दक्षिण आफ्रिकेतील लोकशाही संक्रमणाच्या काळात ही नियुक्ती महत्त्वाची होती. नवी पिल्ले यांच्या कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक म्हणजे रवांडातील नरसंहाराच्या खटल्यांमधील त्यांची भूमिका मानली जाते. १९९४ मध्ये आफ्रिकेतील रवांडा या देशात भीषण नरसंहार झाला. या हिंसाचारात मोठ्या प्रमाणावर नागरिक मारले गेले. त्यानंतर या गुन्ह्यांसाठी जबाबदार व्यक्तींवर खटले चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली. पिल्ले यांनी १९९५ मध्ये या न्यायाधिकरणात न्यायाधीश म्हणून काम सुरू केले. पुढे त्या त्याच्या अध्यक्षही झाल्या. लैंगिक हिंसा आणि बलात्कार हे विशिष्ट परिस्थितींमध्ये नरसंहाराचे कृत्य ठरू शकतात, या आंतरराष्ट्रीय कायद्यातील महत्त्वपूर्ण तत्त्वाच्या स्थापनेत त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. युद्धकाळातील महिलांवरील लैंगिक अत्याचारांना केवळ दुय्यम स्वरूपाचे गुन्हे न मानता, विशिष्ट परिस्थितीत मानवतेविरुद्धचे गंभीर अपराध किंवा नरसंहाराचा भाग म्हणून पाहण्याचा मार्ग अधिक स्पष्ट झाला.
रवांडातील न्यायाधिकरणातील कामानंतर नवी पिल्ले यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले. नवी पिल्ले यांनी न्यायाधीश म्हणून केलेले काम आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विकासातील योगदान यांची नोबेल समितीने विशेष दखल घेतली. २००८ ते २०१४ या काळात नवी पिल्ले यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क उच्चायुक्त म्हणून काम केले. ही संयुक्त राष्ट्रसंघातील मानवी हक्कांच्या संरक्षणासाठीची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. मानवी हक्क हे केवळ एखाद्या देशाचे अंतर्गत प्रकरण नसून आंतरराष्ट्रीय समुदायाचीही जबाबदारी आहे, हा विचार त्यांच्या कार्यात महत्त्वाचा राहिला. २०२१ ते २०२५ या काळात त्यांनी व्यापलेल्या पॅलेस्टिनी प्रदेशांबाबत, पूर्व जेरुसलेमसह आणि इस्रायलसंबंधी संयुक्त राष्ट्रांच्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चौकशी आयोगाचे अध्यक्षपद भूषवले.
नोबेल समितीने पिल्ले यांच्या एकूण कारकिर्दीतील आंतरराष्ट्रीय कायद्याचे समर्थन, गंभीर गुन्ह्यांसाठी उत्तरदायित्व निश्चित करण्याचे प्रयत्न आणि न्यायसंस्थांचे बळकटीकरण या व्यापक योगदानांचा गौरव केला. नोबेल समितीने नवी पिल्ले यांना हा पुरस्कार देताना शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायदा यांच्यातील संबंध अधोरेखित केला. यामागील प्रमुख विचार असा आहे की, शांतता म्हणजे केवळ युद्ध थांबणे नव्हे. ती टिकवण्यासाठी न्याय, मानवी प्रतिष्ठा, कायद्याचे राज्य आणि गुन्हेगारांना जबाबदार धरण्याची व्यवस्था आवश्यक आहे. नोबेल समितीच्या मते, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या संस्थांवर राजकीय दबाव वाढत असताना त्यांचे स्वातंत्र्य आणि अधिकार टिकवणे हे शांततापूर्ण जागतिक व्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे. नवी पिल्ले यांचे भारतीय तमिळ वंशाशी असलेले नाते निश्चितच उल्लेखनीय आहे. त्यांच्या कुटुंबाची मुळे भारताशी संबंधित असली, तरी त्यांचा जन्म, शिक्षण, सामाजिक संघर्ष आणि व्यावसायिक कारकीर्द दक्षिण आफ्रिकेत घडली. नवी पिल्ले यांच्या कार्याचा हा वारसा शांततेसाठी काम करणाऱ्या जागतिक समुदायासाठीही महत्त्वाचा आहे. शांतता टिकवायची असेल, तर न्यायाची प्रतिष्ठा जपावी लागते हा नवी पिल्ले यांच्या कार्याचा सर्वांत महत्त्वाचा संदेश आहे.


