‘आपला माणूस’

मिळालेल्या पुरस्कारांची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणारे आणि संकटसमयी मित्रांच्या मदतीला धावून जाणारे नाना माणूस म्हणून खूप वेगळे होते. त्यांच्या कणखर व कठोर स्वभावाला एक हळवी किनारही होती. गरिबी अनुभवून त्यावर मात करत पुढे आलेले नाना खूप मोठे कलाकार आणि त्याहूनही मोठे 'माणूस' बनले; पण आपला भूतकाळ ते कधीच विसरले नाहीत.

Story: संपादकीय |
08th October, 11:41 pm
‘आपला माणूस’

‘‘लहान गोष्टींकडे पाहण्याची मला सवयच राहिली नव्हती. प्रत्येक गोष्टीकडे भव्यतेने पाहण्याची सवय लागली. त्यातूनच मला वाटायचे की आपण समुद्रासारखे विशाल बनले पाहिजे,” कधीकाळी गरिबीच्या शापामुळे आणि घरच्या ओढवलेल्या वाईट परिस्थितीमुळे १३ व्या वर्षापासून काम करणाऱ्या विश्वनाथ पाटेकर यांचे हे शब्द; अर्थात नाना पाटेकर. लहानपणी मावशीच्या घरी असताना रत्नागिरीचा समुद्र पाहून त्यांना समुद्रासारखे विशाल जगण्याचे वेड लागले. वडिलांची व्यवसायात फसवणूक झाल्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच घरची बेताची परिस्थिती पाहिली. फूटपाथवर झोपून दिवस काढण्याची वेळही त्यांच्यावर आली होती. त्यांनी चित्रपटांचे पोस्टर रंगवण्याचे कामही केले. भुकेला उत्तर म्हणून शिक्षण आणि काम असा दिनक्रम त्यांनी स्वीकारला. परिस्थितीत होरपळून निघालेले नाना स्वकष्टाने आयुष्यात खरोखरच समुद्रासारखे विशाल जगले. त्यांच्या दमदार अभिनयामुळे मध्यमवर्गीय आणि गरिबांनाही ते आपलेसे वाटू लागले. आज सोशल मीडियाच्या काळात ‘मीम्स’मध्ये नानांच्याच चित्रपटांतील दृश्ये वापरली जातात, हे विशेष. 

गोव्यावर नितांत प्रेम असलेल्या नानांनी मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री असताना २०१२ मध्ये किनारी भागात एका मोठ्या कंपनीच्या फ्रँचायझी आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता, पण दुर्दैवाने वाद निर्माण झाल्यामुळे तो प्रस्ताव नंतर बारगळला. किनारी क्षेत्रात घर बांधण्यावरूनही नानांना गोव्यात अडचणी आल्या. मात्र, पणजी परिसरात त्यांचा पूर्वीपासूनच फ्लॅट होता; त्यामुळे कामातून वेळ काढून ते गोव्यातच राहायला यायचे. गोव्यात स्व. पंडित प्रसाद सावकार यांच्या कुटुंबाशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. नानांचे गोव्यात अनेक चांगले मित्रही होते; त्यामुळे त्यांना गोवा आपलाच वाटायचा. शेवटी त्यांनी अखेरचा श्वासही गोव्यातच घेतला.

नानांचा अभिनय हा वेगळाच विषय. सुलभा देशपांडे यांनी एकदा त्यांना नाटकात काम करण्याची संधी दिली आणि तिथून नानांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर १९७८ मध्ये ‘गमन’ चित्रपटात त्यांनी एक लहानशी भूमिका केली होती, तिथून त्यांचा पडद्यावरचा प्रवास सुरू झाला. नानांच्या आवाजात वेगळी जादू आणि लय असल्यामुळे त्यांचे संवाद प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहायचे. चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार त्यांच्या आवाजाच्या वैशिष्ट्यामुळे ओळखले जातात. त्यात सर्वांत महत्त्वाचे नाव म्हणजे नाना पाटेकर. प्राण, ओम पुरी, राजकुमार, अमिताभ बच्चन, नसिरुद्दीन शाह असे अनेक कलावंत त्यांच्या आवाजामुळे ओळखले जातात. नानांचा आवाज हटके असल्यामुळे त्यांच्या आवाजाची सर्वाधिक मिमिक्री केली जाते. त्यामुळे नाना जरी आज आपल्यात नसले, तरी त्यांचा आवाज कायम चिरंतन राहील. वाचन, संगीत, समाजकार्य आणि सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा माणूस म्हणून नाना पाटेकर कधीच विसरले जाणार नाहीत. आपल्या स्पष्टवक्त्या स्वभावामुळे त्यांनी अनेक वादही ओढवून घेतले. मध्यंतरी ‘मी-टू’ चळवळीदरम्यान एका अभिनेत्रीने त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता, पण पुराव्याअभावी नंतर नाना त्यातून निर्दोष सुटले. प्रत्यक्ष राजकारणात नसले, तरी राजकीय नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध अनेकदा वादाचे ठरले. या संबंधांमुळे त्यांच्यावर टीकाही झाली, पण वैयक्तिक संबंधांचा वापर करून ते नेत्यांकडे जनतेचे प्रश्न हक्काने व थेटपणे मांडत असत; ज्याचा बऱ्याचदा सर्वसामान्यांना फायदाच झाला. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करणे असो वा पाण्याचा प्रश्न सोडवणे असो, जी कामे सरकारने करायला हवी होती, ती नाना आणि मकरंद अनासपुरे यांच्या संस्थेने केली. मिळालेल्या पुरस्कारांची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणारे आणि संकटसमयी मित्रांच्या मदतीला धावून जाणारे नाना माणूस म्हणून खूप वेगळे होते. त्यांच्या कणखर व कठोर स्वभावाला एक हळवी किनारही होती. गरिबी अनुभवून त्यावर मात करत पुढे आलेले नाना खूप मोठे कलाकार आणि त्याहूनही मोठे 'माणूस' बनले; पण आपला भूतकाळ ते कधीच विसरले नाहीत. अनेक कलाकारांकडे मुबलक पैसा आला की ते महागड्या गाड्या, अलिशान घरे किंवा खासगी जेट खरेदी करतात. नानांचे विश्व मात्र वेगळे होते. “आपण समाजाचे काही देणे लागतो” ही भावना त्यांनी कायम जपली आणि त्याच भावनेतून असंख्य लोकांना मदत केली. आज जरी ते देहाने आपल्यात नसले, तरी आपल्या कर्तृत्वाच्या आणि कार्याच्या रूपाने ते समाजात सदैव अमर राहतील.