वन्यप्राण्यांकडून माणसांवर हल्ले आणि वन्यप्राणी लोकवस्तीत येण्याचे प्रकार गोव्यात अधूनमधून होत असतात. माकड आणि रानडुक्कर वगळता गोव्यात सर्वाधिक लोकवस्तीत येतात ते बिबटे आणि गवे. गेल्याच वर्षी मुख्य वनपालांनी डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेला पत्र लिहून वन्यप्राणी अभयारण्य आणि वनक्षेत्राबाहेर का येतात, याचा अभ्यास करून उपाय सुचवण्याबाबत विनंती केली होती. कारण गव्याकडून हल्ल्यात जीव गमावल्याचेही प्रकार गोव्यात घडले आहेत. गुरांवर बिबट्यांचे हल्ले हे नवे नाहीत. मात्र माणसांवरही काही ठिकाणी बिबट्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः रस्त्यांवरून जाताना अचानक बिबट्यांनी दुचाकींवर हल्ले केल्याचे प्रकार गोव्यात वारंवार घडलेले आहेत. वन्यप्राण्यांनी हल्ले केल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. गेल्या वर्षीच्या नोंदीप्रमाणे दोघेजण जखमी झाल्याचीही वन खात्याकडे माहिती आहे. त्याशिवाय गुरांना वन्यप्राण्यांनी ठार मारल्याचेही प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. माणसांवरील चार आणि पाळीव प्राण्यांवरील ११० अशा एकूण ११४ हल्ल्यांच्या घटनांची नोंद आहे. या घटनांमधील नुकसानभरपाईपोटी सरकारने सुमारे ४० लाख रुपये खर्च केले आहेत.
गेल्या वर्षीच्या या तपशीलात गव्याच्या हल्ल्यात बेतोडा - फोंडा येथील एकाचा मृत्यू, तर रानडुकराच्या हल्ल्यात वारखंड-पेडणे येथे एकाच्या मृत्यूची नोंद आहे. त्यानंतरही गेल्या वर्षभरात अनेक हल्ले झालेले आहेत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्ती दगावल्यास किंवा जखमी झाल्यास त्यांना आर्थिक मदतीची मर्यादा सरकारने वाढवली आहे. यापूर्वी मृत्यू झाल्यास १० लाखांची मदत होती, ती आता १५ लाख रुपये इतकी केली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्यांना ७.५ लाख रुपयांची मदत तसेच गंभीर जखमी झाल्यास २ लाख रुपयांची मदत तसेच सौम्य जखमी झाल्यास ५० हजार रुपयांची मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही मदत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या किंवा जखमी झालेल्या व्यक्तींसाठी आहे. मात्र वन्यप्राणी लोकवस्तीत येऊ नयेत यासाठी सरकारकडे ठोस उपाययोजना नाही. त्यावर उपाय करण्याची गोव्याला गरज आहे.
दररोज गोव्याच्या कुठल्या ना कुठल्या भागात एखादा वन्यप्राणी गाव किंवा शहरात आलेला असतो. गवे, बिबटे, अस्वल, रानडुक्कर, सांबर, घोरपड, साळींदर, कोल्हे असे अनेक प्रकारचे प्राणी लोकवस्तीत येतात. तसेच मध्येच महाराष्ट्रातून पेडण्याच्या भागात हत्तींचा शिरकाव होतो. माकडांकडून गोव्यातील बागायतींचे नुकसान तर रोजचेच झाले आहे. गेल्या काही वर्षांत अशा घटना जास्त घडत आहेत. वन्यप्राण्यांचे माणसांवरील हल्लेही अधूनमधून समोर येतात. त्यामुळेच गोव्यात वन्यप्राण्यांना लोकवस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी सरकारकडून काही उपाय व्हायला हवेत. गव्यांचा उपद्रव इतका वाढला आहे की काही ठिकाणी रात्री बाहेर पडणेही जोखमीचे झाले आहे. त्यामुळे गव्यांच्या संवर्धनासाठी अभयारण्यांच्या क्षेत्रातच एखादा प्रकल्प राबवणे शक्य आहे का, त्याची चाचपणी करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. लोकवस्तीत येणाऱ्या गव्यांना ठेवण्यासाठी बोंडलाचा विस्तार किंवा बोंडलासारखाच एखादा प्रकल्प राबवण्यावर सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा. सत्तरीच्या काही भागात जीव मुठीत घेऊनच फिरावे लागते. गवे आणि अस्वल नेहमीच लोकवस्तीत किंवा लोकवस्तीजवळ दिसत असतात. पेडण्यात तर बिबट्यांचा धुमाकूळच सुरू असतो. फोंडा, धारबांदोडा भागात गव्यांच्या हल्ल्यांचे प्रकार सातत्याने घडलेले आहेत. वन खात्याने या गोष्टींचा अभ्यास करून वन्यप्राण्यांना लोकवस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी वनक्षेत्रात काही प्रकल्प राबवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. वनक्षेत्रात फळझाडांची लागवड करणे, पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करणे किंवा नव्याने उभारणे, नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू करणे आणि गावांभोवती कुंपण उभारणे यांसारख्या उपाययोजना वन खात्याने राबवण्याची गरज आहे. त्यासाठीच कुठल्या गावात प्राण्यांचा जास्त उपद्रव आहे, त्याचा शोध घ्यावा लागेल. गेल्या काही वर्षांपासून वन्यप्राण्यांचे हल्ले होत आहेत, प्राणी लोकवस्तीत येत आहेत आणि शेती-बागायतींचे नुकसान करत आहेत; मात्र त्यांच्या बंदोबस्तासाठी गोव्याच्या वन खात्याने अद्याप कोणतीही ठोस योजना राबवलेली नाही.


