एका मृत्यूने वाढवले जैवसुरक्षेचे प्रश्न

Story: विश्वरंग |
06th October, 11:26 pm
एका मृत्यूने वाढवले जैवसुरक्षेचे प्रश्न

रशियातील सायबेरियात एका तरुण प्रयोगशाळा कर्मचाऱ्याच्या मृत्यूने अचानक ‘प्लेग’ची भीती निर्माण केली आहे. इर्कुत्स्क येथील अँटी-प्लेग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या २८ वर्षीय दार्या शिपिलोवा यांचा २ ऑक्टोबरला गंभीर न्यूमोनियानंतर मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सुमारे २०० जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले असून काही रुग्णालयांमध्ये खबरदारीचे निर्बंध लावण्यात आले. मात्र इथून पुढेच या प्रकरणाने वेगळे आणि अधिक गंभीर रूप धारण केले आहे.

शिपिलोवा यांचा मृत्यू ज्या संस्थेत त्या काम करत होत्या, त्यामुळे संशय अधिक गडद झाला आहे. काही रशियन माध्यमांनी प्रयोगशाळेत प्लेगचे जिवाणू असलेली टेस्ट ट्यूब फुटल्याचा दावा केला आहे. मात्र हा दावा अधिकृतपणे सिद्ध झालेला नाही. रशियाची आरोग्य निरीक्षण संस्था स्पष्टपणे सांगते की शिपिलोवा यांना ‘अज्ञात कारणांच्या न्यूमोनिया’चा त्रास होता आणि त्यांच्या कामाशी संबंधित कोणत्याही सूक्ष्मजीवाचा पुरावा नमुन्यांमध्ये आढळलेला नाही. संस्थेने प्रयोगशाळेत रोगकारक जिवाणूंची दुर्घटना झाल्याचेही नाकारले आहे

मग, एवढ्या मोठ्या प्रमाणावर खबरदारी का? हाच सध्या सर्वांत अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. अमेरिकेतील जैवसुरक्षातज्ज्ञ केविन एसव्हेल्ट यांनी रशियन प्रतिसादातील विसंगतींकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, साध्या प्लेग संसर्गाची शक्यता असेल तर संपर्कात आलेल्या लोकांना प्रतिबंधात्मक अँटिबायोटिक्स देणे हा उपचाराचा सामान्य मार्ग असू शकतो. अशावेळी अनेक रुग्णालयांवर निर्बंध, सुरक्षा यंत्रणांचा सहभाग आणि अत्यंत कडक खबरदारी यामुळे संशय निर्माण होतो. मात्र एसव्हेल्ट यांनीही हे निश्चितपणे एखाद्या जैविक शस्त्राशी संबंधित असल्याचे म्हटलेले नाही; त्यांनी हे अतिप्रतिक्रिया किंवा चुकीची माहिती असण्याची शक्यता खुली ठेवली आहे.

इथेच ‘बायो-वेपन’चा मुद्दा धोकादायक ठरतो. प्रयोगशाळेतील मृत्यू आणि मोठी सुरक्षा कारवाई दिसताच जैविक शस्त्राचा निष्कर्ष काढणे शास्त्रीयदृष्ट्या योग्य नाही. प्लेगची पुष्टी करण्यासाठी प्रयोगशाळा तपासणी आवश्यक असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार येर्सेनिया पेस्टीस जिवाणू रक्त, थुंकी किंवा संक्रमित लिम्फ नोडमधून घेतलेल्या नमुन्यात ओळखता येतो. केवळ न्यूमोनिया झाला, रुग्ण प्रयोगशाळेत काम करत होता किंवा संपर्कातील लोकांना निरीक्षणाखाली ठेवले आहे, यावरून प्लेग सिद्ध होत नाही.

याचबरोबर पारदर्शकतेचाही प्रश्न महत्त्वाचा आहे. रशियाने नेमके कोणते नमुने तपासले, कोणते जिवाणू आढळले आणि प्रयोगशाळेतील परिस्थिती काय होती, याची स्पष्ट माहिती वेळेवर समोर आली तर अफवांना आळा बसेल. उलट माहिती अपुरी राहिली, तर प्रत्येक खबरदारीच्या पावलामागे काहीतरी लपवले जात असल्याचा संशय निर्माण होतो.