काडीमोड !

गोव्यात विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत, त्यात सासष्टीसारख्या तालुक्यातील राजकारण पूर्णपणे वेगळे आहे. या साऱ्या गोष्टींचा विचार करून ‘आप’ने गोव्यासाठी विरोधी पक्षांच्या आघाडीत सहभागी होणे हे त्यांच्याच फायद्याचे आहे. विजय सरदेसाई यांनी ‘आप’सोबतची युती तोडून आपला राजकीय फायदा जाणला आहे.

Story: संपादकीय |
06th October, 11:29 pm
काडीमोड !

गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षाची महिन्याभरापूर्वी झालेली युती आता संपुष्टात आली. युती तोडण्याबाबत गोवा फॉरवर्डने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पितृपक्ष संपल्यानंतर गोवा फॉरवर्ड निर्णय घेण्याची शक्यता होती, मात्र जेवढे दिवस हा निर्णय पुढे जातो तेवढे आपले नुकसान होईल याची जाणीव झाल्यामुळेच त्यांनी ‘आप’सोबतचे संबंध तोडले. या निर्णयानंतर एका रात्रीत गोव्यात लावलेले दोन्ही पक्षांच्या युतीचे होर्डिंग्सही हटवण्यात आले. या होर्डिंग्समधून काँग्रेस आणि भाजपवर टीका केली होती. पण हे पोस्टर विजय सरदेसाई यांना मान्य नव्हते. ही युती करताना सरदेसाई यांनी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना “गोव्यात सर्व विरोधी पक्षांची आघाडी करूया,” असे सांगितले होते. असे असतानाही ‘आप’ने आपल्या खर्चाने गोव्यात होर्डिंग्स लावले, ज्यात थेट काँग्रेस आणि भाजपला लक्ष्य करण्यात आले होते. भाजपला लक्ष्य करणे हे विरोधकांचे कामच आहे, मात्र काँग्रेसला त्यात गोवल्यामुळे सरदेसाई नाराज होते. या होर्डिंग्समुळे विजय सरदेसाई यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणून आघाडी स्थापन करण्याच्या हेतूला तडे गेले. ‘आप’सोबत जाण्यात कसलाच फायदा नाही, याची जाणीव सरदेसाई यांना नव्हती असे म्हणता येणार नाही. मग असा घाईघाईत निर्णय घेऊन ‘आप’सोबत संसार करण्याचा विचार सरदेसाई यांच्या मनात कसा आला, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. ते म्हणतात त्याप्रमाणे सर्व विरोधी पक्षांची आघाडी करण्याचा हेतू होता हे जर खरे असेल, तर आम आदमी पक्षाने उतावीळपणा केला असे म्हणावे लागेल. 

गोव्यात सद्यस्थितीत आम आदमी पक्षाला ही निवडणूक फारच जड जाऊ शकते असे स्पष्ट दिसत आहे. गेल्या निवडणुकीत ख्रिस्तीबहुल मतदारसंघांत केजरीवाल यांच्या प्रतिमेमुळे लोकांनी गोव्यात ‘आप’ला स्वीकारले होते. त्यानंतर जिल्हा पंचायत निवडणुकीत ‘आप’ला नाकारले. २०२० च्या जिल्हा पंचायत निवडणुकीपेक्षा २०२५ मधील जिल्हा पंचायत निवडणूक ‘आप’ला गोव्यात जड ठरली. त्यामुळे यावेळी विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला फार संधी आहे, असे सध्यातरी चित्र नाही. गेल्या सहा वर्षांत परिस्थिती फार बदलली आहे. मुळात या पक्षाला गोव्यात राजकीय वजन असलेले नेते सापडले नाहीत - मग ती २०२० मधील जिल्हा पंचायत असो किंवा विधानसभेची २०२२ मधील निवडणूक असो. केजरीवाल यांची त्यावेळी असलेली लोकप्रियता आज राहिलेली नाही. भाजपने त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावल्यामुळे केजरीवाल यांची प्रचंड बदनामी झाली. त्याचा परिणाम त्यांच्या लोकप्रियतेवर झाला. आता तर त्यांच्या काँग्रेसविरोधी धोरणामुळे गोव्यात ‘आप’कडून मतदारही दूर जात आहेत. त्यामुळे गोव्यात काँग्रेस-आप-गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी यांची युती झाली, तरच या पक्षांना लोक स्वीकारू शकतात. 

लोकसभेच्या निवडणुकीवेळी कॅप्टन विरियातो यांच्यामागे सर्वजण ज्या पद्धतीने उभे राहिले होते, त्याच पद्धतीने आता एकत्र आल्यास २०२७ च्या निवडणुकीत विरोधक किमान दुहेरी आकड्यापर्यंत मजल मारू शकतील. स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेल्यास एकेरी आकड्यात गुंडाळले जाऊ शकतात. केजरीवाल यांनी काँग्रेसविरोधी घेतलेली भूमिका बदलणे हे आम आदमी पक्षाच्या हिताचे आहे. काँग्रेसवर जेवढी टीका होईल, तेवढे ‘आप’चे नुकसान गोव्यात होणार आहे. काँग्रेसवर टीका करणे हे गोवा फॉरवर्डला परवडणारे नाही, याची जाणीव झाल्यामुळेच सरदेसाई यांनी ‘आप’सोबतचा संसार महिन्याभरात मोडला. आता सरदेसाई यांच्याकडे दुसरा पर्याय आहे तो काँग्रेसचा. काँग्रेससोबत आघाडी किंवा काँग्रेसमध्ये विलिनीकरण अशा प्रस्तावांवर त्यांना विचार करावा लागेल. टाळी एका हाताने वाजत नाही. त्यासाठी काँग्रेसनेही विरोधी पक्षांना एकत्र घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. काँग्रेस एकटी सत्ता मिळवू शकत नाही, हे त्यांनाही माहीत आहे. त्यामुळे जे काँग्रेससोबत येत आहेत त्यांच्याशी जुळवून घेऊन पुढे जाणे हाच काँग्रेससमोर पर्याय आहे. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी यांच्या सोबतीला आम आदमी पक्षाने यायला हवे. काँग्रेस-द्वेषामुळे सगळीकडे ‘आप’ने आपले नुकसान करून घेतले आहेच, आता गोव्यातही तेच होणार आहे. गोव्याचे राजकारण वेगळे. गोव्यात विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत, त्यात सासष्टीसारख्या तालुक्यातील राजकारण पूर्णपणे वेगळे आहे. या साऱ्या गोष्टींचा विचार करून ‘आप’ने गोव्यासाठी विरोधी पक्षांच्या आघाडीत सहभागी होणे हे त्यांच्याच फायद्याचे आहे. विजय सरदेसाई यांनी ‘आप’सोबतची युती तोडून आपला राजकीय फायदा जाणला आहे.