निसर्गाचे रौद्र रूप आणि आपली जबाबदारी

Story: अंतरंग - गोवा |
11th October, 08:28 pm
निसर्गाचे रौद्र रूप आणि आपली जबाबदारी

अतिवृष्टी, अनावृष्टी, भूकंप आणि जलप्रलयाच्या वाढत्या संकटांनी मानवजातीसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा केला आहे. पनामाच्या दक्षिण किनारपट्टीजवळ नुकताच ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप होऊन अनेक इमारती, घरे उद्ध्वस्त झाली. भूकंपानंतर ४० हून अधिक धक्के जाणवले. नेपाळमध्ये आलेल्या जलप्रलयाने माजवलेला हाहाकार आपण पाहिला.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातही यंदा नैऋत्य मौसमी पावसात (मान्सून) ३१.७ टक्के पावसाची मोठी तूट नोंदवली गेली असून, हा गेल्या ४७ वर्षांतील पावसाचा सर्वात मोठा तुटवडा मानला जात आहे. पाण्याविना शेती, बागायती सुकू लागल्या आहेत. शेजारच्या महाराष्ट्र राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी  २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. गाव असो, राज्य असो, देश असो किंवा संपूर्ण जग... आज सर्वत्र निसर्गाच्या अशा बदलत्या रूपाचा अनुभव येत आहे. कुठे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत होत आहे, तर कुठे पाण्याच्या थेंबासाठी माणसाला वणवण भटकावे लागत आहे. कुठे भूकंपाच्या धक्क्यांनी इमारती जमीनदोस्त होत आहेत, तर कुठे महापुराच्या पाण्यात घरे, शेती आणि संसार वाहून जात आहेत. वाढते तापमान, वणवे, चक्रीवादळे आणि हवामानातील अनिश्चित बदल यांमुळे संपूर्ण सृष्टी जणू होरपळून निघत आहे. हा केवळ नैसर्गिक आपत्तींचा प्रश्न नसून मानवाच्या अस्तित्वापुढे उभे राहिलेले गंभीर आव्हान आहे.

निसर्गाचे रौद्र रूप यापूर्वीही पाहायला मिळाले आहे. मात्र, आज हवामानातील बदलांचा वेग, आपत्तींची तीव्रता आणि त्यातून होणारे नुकसान याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. निसर्गाच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आपण केवळ भौतिक विकासाच्या मागे धावत राहिलो, तर भविष्यात आपल्याला त्याची किंमत मोजावी लागणार. निसर्गाचा इशारा ओळखण्याची हीच वेळ आहे. केवळ आपत्ती आल्यानंतर मदतकार्य करणे पुरेसे नाही, तर आपत्तींची तीव्रता कमी करण्यासाठी आजपासूनच ठोस पावले उचलली पाहिजेत. सरकार, प्रशासन आणि नागरिक या सर्वांची त्यात महत्त्वाची भूमिका आहे. निसर्गावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा निसर्गाशी समतोल राखून जगणे अधिक शहाणपणाचे आहे. कारण निसर्गाचे रक्षण म्हणजे केवळ झाडे, नद्या आणि पर्वतांचे रक्षण नव्हे, तर आपल्या पुढील पिढ्यांच्या भविष्याचे रक्षण होय. निसर्गाला आपण जपले, तरच निसर्ग आपल्याला जगवेल. आपल्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, परंतु कल्पना करा- पाऊस पडलाच नाही, तर पाणी कुठून मिळणार? शेती पिकली नाही तर अन्न कुठून मिळणार? निसर्गाचे संतुलन असेच वेगाने बिघडत चालले आणि नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढत गेले तर ही परिस्थिती दूर नाही. गोव्यात मोठ्या प्रमाणात पावसाची तूट नोंदवली गेल्याने सरकारी पातळीवर सध्या पाण्याचे नियोजन करणे सुरू झाले आहे; मात्र, एवढेच पुरेसे नाही, तर एक सजग नागरिक म्हणून पाणी जपून वापरणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पाण्याचा एक थेंबही वाया जाणार नाही, याकडे सर्वांनी कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. निसर्गाने जे काही आपल्याला दिले ते ओरबाडून न घेता जपून वापरणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. नैसर्गिक आपत्तींच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांकडे गांभीर्याने न पाहिल्यास विनाश अटळ असल्याचे शास्त्रज्ञ आपल्याला वेळोवेळी सुचवत आहेत. ते गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. निसर्ग देवो भव!