मागील लेखात अकराव्या अध्यायाच्या १० व्या व ११ व्या श्लोकांच्या विस्तृत विवेचनाच्या सुरवातीच्या भागात पोहोचलो होतो. तिथून आता पुढे काय झाले ते बघूया.
कृष्णाने दाखवलेल्या आपल्या विश्वरूपात अर्जुनाला काय दिसले? सर्वांत आधी त्याला देवाची महाभयंकर तोंडे दिसली. जणू काही प्रलय-रात्रीची उधळलेली सैन्ये. जणू काही भय-भीतींचे रचलेले प्रचंड किल्ले. जणू काही काळाग्नीचे उघडलेले कुंड, अशी अति अद्भुत, भयंकर व अघोर तोंडे त्याने पाहिली. तशीच अलंकारित शांत व सौम्य तोंडेही त्याने पुष्कळ बघितली. पण ज्ञान-दृष्टीने नीट भान ठेवून विचार करूनही त्याला त्या तोंडांचा शेवट लागेनासा झाला तेव्हा अर्जुन कौतुकाने देवाचे डोळे पाहू लागला. जणू काही वेगवेगळ्या रंगांची नित्य नवी कमल-वने फुलून विकसित व्हावीत; सूर्याच्या जणू शोभिवंत पंक्ती असाव्यात अशी नेत्र-कांती; काळ्याकुट्ट दाट मेघांमधे जणू काही प्रलयाची विद्युत चमकावी तसे अग्निवर्ण त्याने त्या डोळ्यांच्या भुवयांच्या तळवटी बघितले. अशी एकेक नानाविध अनेक अद्भुत आश्चर्ये त्याने त्या अगाध विश्वरूपात पाहिली.
आता देवाचे हात, मुकुट कुठे आहे ते तरी बघूया म्हणून त्याने उत्साहाने इच्छा प्रकट केली. अर्जुनाचे भाग्य काय विचारता. त्याचे मनोरथ कृष्णाकडून पूर्ण होणार नाहीत हे कधी शक्य तरी आहे का? आणि त्या देवांच्या भात्यामधे काय वायबाण, फुसके बाण असतील? ब्रह्म्याच्या वाचेमधले अक्षरांचे साचे मिथ्या कसे असू शकतील? म्हणून तर तो पार्थ तिथे "स-आदि-अंत" विश्वरूप प्रत्यक्ष बघत होता. असे ते विश्वरूप ज्याचा अंत पार वेदांनाही कळला नाही. त्या विश्वरूपाचे सर्वांग इथे अर्जुनाचे डोळे त्या रूपाची चरणापासून मुकुटापर्यंत थोरवी पाहत, निरखत होते. अनेक प्रकारच्या रत्नांनी अलंकृत असे शोभिवंत ते दिसत होते. संजय म्हणतो की परब्रह्म साकार होऊन स्वरूपाची भूषणे ल्यालेय आणि त्या भूषणांचे वर्णन करायला माझ्याकडे उपमान सापडत नाही. ज्याच्यामुळे सूर्य-चंद्रादि तारामंडळांना चमकण्यासाठी तेज मिळते त्याची दिव्य कांती, त्याच्या महातेजाची जीवनकला अर्जुनासमोर प्रकटपणे उलगडत होती. मानवी बुद्धीला अगोचर असलेला अशा भव्य-दिव्य तेजाचा शृंगार स्वतः धारण करून प्रत्यक्ष निर्गुण परब्रह्म त्याच्यासमोर नटले होते.
देवाधिदेवाने दिव्य दृष्टी देताच हे रूप-वैभव पार्थाच्या प्रत्ययास आले होते. मग तो धैर्यवान अर्जुन त्या विश्वरूपाचा सरळ सुंदर हात कुठे आहे ते बघू लागला तेव्हा त्याला तिथे काळाग्नीच्याही ज्वाळा छेदून टाकतील अशी झळाळणारी तीक्ष्ण शस्त्रे धारण केलेले देवाचे असंख्य हात दिसले. जणू नक्षत्रे भाजून निघून त्यांचे फुटाणे उडू लागावेत, अशी त्या शस्त्रांच्या किरणांची तीक्ष्णता होती. त्यांना पाहून जणू प्रत्यक्ष अग्नीनेही भयभीत होऊन समुद्रात लपायला जावे. जणू काळ्याकुट्ट विषाच्या घनदाट लाटा उसळून याव्यात; जणू कल्पांतीच्या लखलखणाऱ्या विजांचे गहन रान उगवून यावे असे ते महा-देवाच्या हातांचे दृश्य होते.
घाबरून तिथून दृष्टी मागे घेऊन मग अर्जुनाने ती देवाच्या कंठ-मुकुटाकडे वळवली. तेव्हा त्याला याचपासून खरोखर कल्पतरू जन्म घेत असावेत, असे वाटले. श्रांत झालेल्या रमेचा विश्रांतीचा तो दिव्य पद्म-ठेवा. महा-सिद्धीच्या मूळ पीठांसारखी सुनिर्मळ ताजी फुलेच जणू काही. देवाधिदेव अत्यंत प्रेमोल्हासाने त्यांचा गंध घेत असल्याचे अर्जुनाला दिसले. त्याच्या शिरावरील मुकुटावर पुष्पगुच्छांसहित नाना पूजाबंध शोभत होते. त्याच्या गळ्यात अलौकिक अशा असंख्य दिव्य पुष्पमाला शोभत होत्या. जणू मेरू पर्वताला सोन्याने मढवावे किंवा स्वर्गाने सूर्याचे तेज पांघरावे, कर्पूर-चंदनाची छान सुगंधी उटी घेऊन तिने शंकराचे सर्वच चर्चावे किंवा कैलास पर्वताला संपूर्ण पाऱ्याचा अमाप लेप चढवावा किंवा क्षीरसागरास क्षीरोदक पांघरावयास द्यावे किंवा चंद्राच्या घड्या उलगडून त्यांनी आकाशाला गुंडाळावे; अशा प्रकारची शुभ्र चंदनाची उटी अर्जुनाने देवाच्या सर्वांगावर लावलेली बघितली. ज्या सुगंधाच्या योगे आत्मप्रकाशाला कांती चढते, ज्याच्या योगे ब्रह्मानंदालाही शांती लाभते, स्वतः सुगंधाने भरलेली असलेल्या पृथ्वीलाही जो जिवंत करतो, ज्याची उटी देव आपण निर्लेप परब्रह्म असूनही स्वतःला लावतो, मदन स्वतः अवयवरहित असूनही जे चंदन सर्वांगाला लावतो, त्या चंदनाच्या उटीचा सुगंध काय वर्णावा?
असा एकेक दिव्य साज बघून तो कपिध्वज अर्जुन भांबावून गेला आणि अशा भांबावलेल्या स्थितीत तो देव तिथे उभा आहे, बसलेला आहे की निजलेला आहे, हेही त्याला कळेना. डोळे उघडून चारही दिशांना बघतोय तो त्याला देवाचे तेच अथांग रूप दिसत आहे. नको ते बघायला म्हणून जेव्हा किरिटी पार्थाने डोळेच मिटून घेतले तेव्हा आतमध्येही त्याला तेच विश्वरूप सगळीकडे पसरलेले दिसले. विश्वरूपाची ती असंख्यात मुखे अर्जुनाच्या दृष्टीपुढे येऊ लागली, म्हणून तो पाठमोरा झाला. तरी तिथेही ती त्याला सोडीनात तसेच ते हात, तशीच ती तोंडे, तसेच ते पाय, सगळे तसेच डोळे उघडले तरी तेच, बंद केले तरी तेच. कृष्ण त्याला आपल्या कृपेची थोरवी दाखवत होता. त्याचे पाहणे व न पाहणे सगळेच त्याने व्यापून टाकले होते, म्हणून अर्जुन एका आश्चर्याच्या पुरातून बाहेर निघाला की चमत्कारांच्या दुसऱ्या महासागरात बुडायला लागला. अशा रीतीने श्रीकृष्ण-श्रीकांत देवाने निज-विश्वरूप अर्जुनाला कौशल्यपूर्णतेने दाखवत त्याला स्वतःला सुद्धा त्यात व्यापून घेतले. सगळेच आपण होऊन तो नारायण सर्वव्यापी नटला. देवाने दिलेली दृष्टी "दिव्याच्या वा सूर्याच्या प्रकाशात पहायला समर्थ व जी मिटून घेताच दिसायच पूर्णतः बंद" अशा स्वरूपाची नव्हती. म्हणून तो अर्जुन जसा प्रकाशात पाहू शकत होता, तसाच अंधारातही पाहू शकत होता आणि डोळे कितीही जरी मिटून घेतले तरी त्याला सगळे व्यवस्थित दिसत होते.
"जे नाना अलंकारांनी शोभले आहे, ते तुम्हाला काय सांगू? ज्याला सगळीकडून तोंडेच तोंडे आहेत असे देवाचे विश्वरूप अर्जुन बघत आहे,” असे तो संजय हस्तिनापुरात धृतराष्ट्राला सांगू लागला. (क्रमशः)
मिलिंद कारखानीस, (लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.) मो. ९४२३८८९७६३


