पर्यटनाची भरारी भागीदारीवर आधारित का असावी?

पर्यटकांची प्रत्येक भारतभेट हा आपल्या संस्कृतीचा अनुभव देणारा प्रवास ठरावा आणि त्या प्रवासातून निर्माण होणारी समृद्धी आपल्या संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची सुनिश्चिती व्हावी, यासाठी आवश्यक असलेल्या भागीदारी अधिकाधिक उभारण्याची गरज आज आहे.

Story: विचारचक्र |
12th October, 11:06 pm
पर्यटनाची भरारी भागीदारीवर आधारित का असावी?

भारताला पर्यटनस्थळांची कमतरता कधीच भासलेली नाही. फक्त जगाला या ठिकाणांचा शोध घेण्यास, तिथे पोहोचण्यास, तिथला अनुभव घेण्यास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुन्हा तिथे भेट देण्यास प्रवृत्त करणाऱ्या संस्थात्मक कल्पकतेची उणीव काही वेळेस भासली आहे. 

आपला सांस्कृतिक वारसा अतुलनीय आहे. प्राचीन शहरे आणि चैतन्यमयी परंपरा, पवित्र स्थाने आणि वन्यजीवन, स्थापत्यकला आणि कारागिरी, खाद्यसंस्कृती आणि उत्सव, पर्वतराजी आणि समुद्रकिनारे... सर्वच विलक्षण आहे. तरीही पर्यटन केवळ वारशामुळे बहरत नाही. एखादे स्मारक म्हणजे फक्त पर्यटनस्थळ नाही, तर पर्यटनस्थळ हे एक परिसंस्था असते. त्या ठिकाणाकडे घेऊन जाणारा रस्ता, तिथे पोहोचण्यापूर्वी उत्सुकता निर्माण करणारी  तिथली गोष्ट, प्रवाशाला तिथे मिळणारे आदरातिथ्य, त्या स्थळाची अस्सलता जिवंत ठेवणारे कारागीर, तिथपर्यंत पोहोचणे सुकर करणारे तंत्रज्ञान आणि पर्यटनामुळे आर्थिक संधी निर्माण होणार की ते केवळ स्थानिकांच्या जीवनात हस्तक्षेप ठरणार, हे ठरवणारा स्थानिक समुदायाचा सहभाग - या सर्व घटकांतून पर्यटनस्थळाची खरी ओळख घडत असते. म्हणूनच, भारतीय पर्यटनाचा पुढील अध्याय केवळ पर्यटन स्थळांच्या संदर्भात नव्हे, तर भागीदारीच्या संदर्भात लिहिला गेला पाहिजे.

पर्यटनाची नवी व्यवस्था समांतर असायला हवी. सरकार, उद्योग, तंत्रज्ञान कंपन्या, सर्जनशील क्षेत्रातील व्यक्ती, गुंतवणूकदार, राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिक समुदाय या सर्वांनी एकत्र येऊन पर्यटनाचा अनुभव घडविण्यात सहनिर्माते व्हायला हवे. यातून विकासाकडे पाहण्याचा आपल्या दृष्टिकोनातील मूलभूत बदल प्रतिबिंबित होतो. 

आजच्या पर्यटकांना भारत केवळ पाहायचा नाही, तर तो जाणून घ्यायचा आहे, अनुभवायचा आहे. त्यांना इथल्या पदार्थांची चव चाखायची आहे, परंपरा समजून घ्यायच्या आहेत, घरांना भेट द्यायची आहे, कारागिरांना भेटायचे आहे आणि अल्पकाळाकरिता का होईना इथल्या चैतन्यमयी संस्कृतीचा भाग व्हायचे आहे. या बदलामुळे भारतासमोर एक असाधारण संधी निर्माण झाली आहे. परंतु, समन्वयाशिवाय संधीचे रूपांतर क्वचितच फलनिष्पत्तीमध्ये होते. म्हणूनच काळानुसार भूमिकेचे स्वरूप बदलते असले तरी सरकारची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. सर्व काही स्वतः करणे, ही सरकारची जबाबदारी नाही, तर अधिकाधिक गोष्टी शक्य होतील अशी परिस्थिती निर्माण करणे, ही कुठल्याही सरकारची जबाबदारी आहे. रस्ते, विमानतळ, रेल्वे, स्वच्छता, डिजिटल पायाभूत सुविधा, वारसा संवर्धन आणि नागरी सुविधा यातील सार्वजनिक गुंतवणूक पाया रचते. त्याच्या आधारावर खासगी क्षेत्राला अभिनवता आणि गुंतवणूक यांची जोड देता येते. राजकीय इच्छाशक्ती सातत्य आणि दिशा पुरवतात. उद्योगक्षेत्र भांडवल, व्यवस्थापकीय कौशल्य, तंत्रज्ञान आणि बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याच्या संधी उपलब्ध करून देते, तर स्थानिक समुदाय असे योगदान देतात, जे कोणतेही सरकार किंवा उद्योगसमूह कृत्रिमरीत्या निर्माण करू शकत नाही - ते म्हणजे त्या ठिकाणची अस्सल ओळख.

खरे आव्हान आहे ते या सर्व क्षमतांना एकत्र आणण्याचे. या दिशेने प्रयत्नांतर्गत पर्यटन मंत्रालय उद्योगांसोबतचा आपला सहभाग विस्तारत आहे. यामध्ये अकरा सामंजस्य करारांचा समावेश असून पाच जागतिक पर्यटन दिन २०२६ रोजी करण्यात आले आहेत. त्यांचे महत्त्व केवळ कागदोपत्री नाही. या माध्यमातून तंत्रज्ञान, वाहतूक, आदरातिथ्य, आशय निर्मिती, डिजिटल माध्यमांद्वारे पोहोच आणि स्थानिक उद्योजकता अशा विविध क्षेत्रांतील क्षमता एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. 

नेटफ्लिक्ससोबतचा सहयोग पर्यटनस्थळांच्या प्रचाराची ही नवी पद्धत दर्शवतो. या माध्यमातून भारताची संस्कृती, वन्यजीवन आणि पर्वतराजींचे सौंदर्य, जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचवले जात आहे. आयटीबी बर्लिन २०२६ मध्ये सादर 'फ्लेव्हर्स ऑफ इंडिया', तसेच लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये राबविण्यात आलेल्या प्रचारमोहिमा याचीच उदाहरणे आहेत. पर्यटनाच्या बाबतीत एखाद्या ठिकाणाची भौगोलिक ओळख होण्यापूर्वी त्या ठिकाणाविषयीचे कथानक जगभर पोहोचणे अधिकाधिक महत्त्वाचे ठरत आहे, हे यातून स्पष्ट होते. मात्र, एखाद्या ठिकाणचे कथानक पर्यटकांना अखेरीस तिथे प्रत्यक्ष भेट देण्यासाठी प्रवृत्त करणारी ठरली पाहिजे. आणि इथेच भागीदारीच्या नव्या स्वरूपाच्या महत्त्वाचे मर्म दडले आहे.

भारताचे पर्यटन क्षेत्र केवळ आकर्षक पर्यटनस्थळांच्या प्रचारापुरता मर्यादित न राहता, पर्यटकांसाठी वैशिष्ट्यपूर्ण अनुभवांची आखणी आणि निर्मिती करण्यावर भर देणारे, व्हायला हवे. या व्यवस्थेत हवाई संपर्क व्यवस्थेलाही तितकेच महत्त्व आहे. अलायन्स एअर, एअर इंडिया आणि इंडिगो यांच्यासोबतची भागीदारी ‘इन्क्रेडिबल इंडिया’ या मोहिमेचा विस्तार थेट हवाई प्रवास परिसंस्थेपर्यंत करते.

गुगल इंडियासोबतच्या सहयोगामध्ये क्षमता बांधणी आणि जागतिक पर्यटन मागणी व पर्यटकांचे कल समजून घेण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचा समावेश आहे.

र्यटन धोरणात महानगरांसोबतच गावेही महत्त्वपूर्ण झाली पाहिजेत. हॉटेलांइतकेच महत्त्व पर्यटकांसाठीच्या होम स्टेला मिळायला हवे, पर्यटनस्थळांइतकेच महत्त्व स्थानिक कारागिरांना आणि मोठ्या ऑपरेटरइतकेच महत्त्व स्थानिक उद्योजकाला मिळाले पाहिजे.

एअरबीएनबी, सोल ऑफ इंडिया आणि मेक माय ट्रिप यांसारख्या संस्थांसोबतच्या भागीदारीतून नेमकी हीच संधी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, संधीचे लोकशाहीकरण साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

एखाद्या पर्यटनस्थळी जेव्हा खूप मोठ्या संख्येने लोक भेट देतात, तेव्हा त्याचा लाभ नेमका कोणाला होतो? स्थानिक कारागिरांची कमाई वाढते का? युवांना स्थानिक पातळीवरच संधी उपलब्ध होतात का? महिला उद्योजकांना आपल्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध होते का? आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन करण्यासाठी स्थानिक समुदायाला प्रोत्साहन मिळते का? आणि पर्यटक केवळ छायाचित्र घेऊन परतण्याऐवजी त्या ठिकाणाची संस्कृती, परंपरा आणि जीवनपद्धती यांविषयी अधिक सखोल समज, जाणीव त्यांच्यात निर्माण होते का? या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील तर पर्यटन हे केवळ एक उद्योग म्हणून सीमित राहत नाही. सांस्कृतिक आत्मविश्वास आणि विकेंद्रित आर्थिक विकासाचे ते एक साधन ठरते. 

या दृष्टीने भारतातील तुलनेने अपरिचित पर्यटनस्थळे मोठी संधी उपलब्ध करून देतात. तंत्रज्ञानाच्या मदतीने ही ठिकाणे तरुण पिढीपर्यंत पोहोचू शकतात, वाहतूक सुविधांमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे सुलभ होऊ शकते, खासगी गुंतवणुकीतून आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होऊ शकतात आणि स्थानिक समुदायाच्या सहभागामुळे विकासाची प्रक्रिया त्या ठिकाणची अस्मिता जपून पुढे जाऊ शकते.

सामंजस्य करारावर स्वाक्षरी ही फक्त एक सुरुवात आहे. खरी भागीदारी तेव्हाच सुरू होते, जेव्हा करारातून एखादे उत्पादन किंवा सेवा प्रत्यक्षात येते, जेव्हा एखाद्या प्रचार अभियानामुळे पर्यटक त्या ठिकाणी भेट देतात, पर्यटकांच्या भेटीतून स्थानिकांना उत्पन्न मिळते आणि या उत्पन्नामुळे स्थानिक समुदायामध्ये त्या पर्यटनस्थळाबाबत आपलेपण निर्माण होते. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातील विविध संघटना आणि पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. 

पर्यटकांची प्रत्येक भारतभेट हा आपल्या संस्कृतीचा अनुभव देणारा प्रवास ठरावा आणि त्या प्रवासातून निर्माण होणारी समृद्धी आपल्या संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची सुनिश्चिती व्हावी, यासाठी आवश्यक असलेल्या भागीदारी अधिकाधिक उभारण्याची गरज आज आहे. 


गजेंद्रसिंह शेखावत, (लेखक केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री आहेत.)