शांत आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून आंतरराष्ट्रीय ओळख असलेल्या गोव्यात मागील काही दिवसात गंभीर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, लैंगिक अत्याचार, अमली पदार्थांची तस्करी आणि ऑनलाईन सायबर फसवणूक अशा विविध गुन्ह्यांमुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर येत आहे. राज्यात पर्यटन मोसम सुरू झाला आहे. त्यामुळे गोव्यात विदेशी तसेच देशी पर्यटक भेट देणार आहेत. याचा फायदा घेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले गोव्यात येऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी यावर तत्काळ उपाययोजना आखली नाही, तर त्याचा थेट फटका पर्यटन व्यवसायाला बसणार आहे.
मागील दोन दिवसांपूर्वी कांपाल येथील कला अकादमीच्या आवारात संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर त्या व्यक्तीचा खून करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना अटक केली. त्यापूर्वी मध्यरात्री नागाळी-ताळगाव येथे चार कामगारांनी दोघांवर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांला अटक केली. काही दिवसापूर्वी मालिम-बेती येथे १० रुपयांचा मटका लावण्याच्या वादातून मटका बुकीने एका दुकानदारावर पेपर कटरने हल्ला केला होता. राज्यात अशा घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. अशा गुन्हेगारांना कायद्याचा तसेच पोलिसांचा कोणत्याही प्रकारचा भय राहिलेला नाही असे दिसून येत आहे. अशाच प्रकारच्या किरकोळ वादातून पर्यटकांवर आणि स्थानिक कामगारांवर जीवघेणे हल्ले होण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशा खुनाच्या प्रयत्नांच्या वाढत्या घटनांमुळे किनारपट्टी भागातील रात्रीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महिलांच्या सुरक्षेबाबतही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. हॉटेल्स, खासगी व्हिला आणि निर्जन समुद्रकिनाऱ्यांवर महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. पोलिसांनी अनेक प्रकरणांत संशयितांना अटक केली आहे. या घटनांमुळे गोव्याच्या पर्यटन प्रतिमेला मोठा धक्का बसत आहे.
दुसरीकडे, गोव्यातील 'ड्रग्ज'चे जाळे अजूनही पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईत गुन्हा शाखा आणि अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) लाखो रुपयांचे गांजा, कोकेन व इतर बंदी घातलेले ड्रग्ज जप्त करून आंतरराज्य तस्करांना जेरबंद केले. याशिवाय शेजारच्या राज्यातील पोलीस गोव्यात अमली पदार्थ तस्करीवर कारवाई करून संशयितांना अटक करतात. हल्लीच गोवा पोलिसाच्या अमली पदार्थविरोधी पथकात कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय समुद्रकिनाऱ्यांवरील पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचा वाढता वापर रोखण्यासाठी एएनसीसह राज्यातील सदर भागातील पोलिसांकडून विशेष गस्त घातली जात आहे.
पारंपरिक गुन्ह्यांबरोबरच गोव्यात सायबर गुन्हेगारांचे जाळेही वेगाने पसरले आहे. नुकतेच कांदोळी परिसरातील एका व्हिलामधून चालवले जाणारे आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेट इतर राज्यातील पोलिसांनी उघडकीस आणले. तसेच राज्यात ज्येष्ठ नागरिकांना 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून किंवा शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक होणाऱ्या घटनांत वाढ झाली आहे.
वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गोवा पोलिसांनी किनारपट्टी भागात नाकाबंदी, रात्रीची गस्त आणि हॉटेल कर्मचाऱ्यांची तपासणी मोहीम तीव्र करण्याची अत्यंत आवश्यक आहेत. सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी अनोळखी लिंक्स आणि संशयास्पद कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर विभागासह राज्यातील इतर पोलिसांकडून वेळोवेळी केले जात आहे. असे असताना वाढत्या घटनांना आळा घालून पर्यटनासाठी सुरक्षित वातावरण राखण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
शांतता आणि पर्यटनाचे नंदनवन असणाऱ्या गोव्याला या गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी केवळ गुन्ह्यांचा छडा लावणे पुरेसे नसून, संशयितांना कडक शिक्षा होणे आणि किनारपट्टीवर कडक गस्त ठेवणे काळाची गरज बनली आहे.


