राहुल गांधींची भेट आणि काँग्रेससमोरील आव्हाने

गोव्यातील काँग्रेससमोर अशी अनेक आव्हाने आहेत; परंतु शेवटी एकट्या काँग्रेसला ही लढाई झेपेल असे दिसत नाही. त्यासाठी आप, गोवा फॉरवर्ड, आरजीपी आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर या सर्वांची मदत घ्यावी लागेल आणि ती मदत मागण्याचे मोठेपणही काँग्रेसने दाखवायला हवे.

Story: संपादकीय |
19th October, 09:39 pm
राहुल गांधींची भेट आणि काँग्रेससमोरील आव्हाने

काँग्रेसची ‘गोवा राखण यात्रा’ रविवारी संपली. यात्रेतून निवडणुकीसाठी आवश्यक असलेले वातावरण तयार करण्यात काँग्रेसला काही प्रमाणात यश आले असून, त्याचा फायदा काँग्रेसला काही भागांत होऊ शकतो. राहुल गांधी यांनी यात्रेच्या समारोपावेळी उपस्थिती लावून खरे तर गोवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना उपकृत केले; कारण राहुल गांधी आले नसते, तर गोवा काँग्रेसची बरीच नाचक्की झाली असती. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी ‘येणार येणार’ असे म्हणून दोनदा नियोजनात बदल करण्यात आला होता. तरीही गोवा काँग्रेसने धीर सोडला नाही. डी. के. शिवकुमार, के. सी. वेणुगोपाल आणि सचिन पायलट अशा काही बड्या नेत्यांना गोव्यात आणून काँग्रेसने आपल्या यात्रेत जीव ओतण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला यात्रेची बदनामी करण्याचे प्रयत्न काहींनी केले, परंतु शेवटी शेवटी यात्रेचा बराच प्रभाव काही भागांत दिसून आला. काणकोण, सासष्टी, केपे आणि मुरगाव यांसारख्या भागांत यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. पक्षाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सर्वच ठिकाणी दिसत होते. संबंधित भागातील लोकांचा सहभाग कमी आणि दुसऱ्या ठिकाणांहून आलेले लोक जास्त, असे यात्रेचे एकूण चित्र होते. तरीही, निवडणुकीपूर्वी लोकांपर्यंत काँग्रेस तेवढ्याच ताकदीने निवडणुकीत उतरणार आहे असा जो संदेश पोहोचण्याची गरज होती, त्यात काहीसे यश काँग्रेसला नक्कीच मिळाले आहे. आता पुढची कसोटी उमेदवार शोधण्याची असेल आणि त्यानंतर बंडखोरांना रोखायची.

सध्या राहुल गांधी यांच्या या दौऱ्याचा काँग्रेसला खरोखरच फायदा झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. काँग्रेसच्या विरोधकांनी या सभेचा व भेटीचा आपापल्या परीने अर्थ काढून त्यावर टीका सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या विरोधकांमध्ये कालपर्यंत काँग्रेसच्या आशीर्वादने मोठे झालेले बहुतेक जण होते. विशेष. येत्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदर्शन कसे असेल त्याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात असताना, काँग्रेसने लोकांना जागे करण्यासाठी केलेली धडपड म्हणजेच ही यात्रा होती, असा एक अर्थ काढता येतो. निवडणूक समोर असताना काँग्रेसने गोव्यात मोठे बदल करून पदाधिकाऱ्यांची निम्मी फौजच गमावली होती; तिथे काँग्रेसकडून सर्वात मोठी चूक झाली. मात्र, आता ‘गोवा राखण यात्रा’ काढून त्या चुकीवर मात करत काँग्रेस गांभीर्याने निवडणुकीकडे पाहत आहे, असा संदेश त्यांनी दिला आहे. अनेक मतदारसंघांत जिंकण्याची शक्यता कमी असतानाही तिथल्या बलाढ्य नेत्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने कंबर कसलेली आहे. तरीही काही मतदारसंघांत हाती काही लागणार नाही याची जाणीव पक्षाला आहे. म्हणूनच, निवडणुकीत त्यांचे उमेदवार कोण असणार हे चित्र स्पष्ट झाले की काँग्रेसला किती यश येऊ शकते याचा अंदाज येईल; कारण दुसऱ्या बाजूने काँग्रेसला आम आदमी पक्ष हा भाजपविरोधी पर्याय म्हणून आव्हान देत आहे. गोवा फॉरवर्डला सोबत घ्यायचे की नाही तेही काँग्रेसने ठरवलेले नाही. सध्या तरी आरजीपीच काँग्रेससोबत दिसत आहे. त्यातच, राहुल गांधी यांच्या सभेला म्हणावी तशी गर्दी नव्हती; त्यामुळे एका अर्थाने पक्षाने राहुल गांधी यांचा हिरमोडच केला. सध्या देशात ‘एसआयआर’विरोधात असलेले वातावरण पाहता राहुल गांधी यांच्या सभेला अलोट गर्दी व्हायला हवी होती, परंतु तसे झाले नाही. विरोधी पक्षांमधील मतभेद आणि काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद या दोन कारणांमुळे राहुल गांधी यांच्या सभेला गर्दी झाली नसावी. कारण, जी जागा निवडली होती तिथे जेमतेम दोन हजार लोकच बसू शकतात. असे असतानाही, राहुल गांधी यांनी गोव्यात येऊन काँग्रेसजनांना निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी लागणारे बळ निश्चितच दिले आहे. गोव्यातील जमीन विक्रीचा विषय असो, देशातील मतचोरीचा विषय असो किंवा शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचे असलेले विदारक चित्र असो या सर्वांवरच राहुल गांधी यांनी गोमंतकीयांचे लक्ष वेधले आहे. गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट लोकांमध्ये जावे, असे आवाहन त्यांनी केले आहे; ज्याकडे काँग्रेसने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. वाढती बेरोजगारी आणि युवकांमधील असंतोष यावर त्यांनी भाष्य केले असले, तरी काँग्रेस राहुल गांधी यांच्या सभेसाठी युवकांना आकर्षित करण्यात थोडी अपयशी ठरली, हे नाकारता येणार नाही. गोव्यातील काँग्रेससमोर अशी अनेक आव्हाने आहेत; परंतु शेवटी एकट्या काँग्रेसला ही लढाई झेपेल असे दिसत नाही. त्यासाठी आप, गोवा फॉरवर्ड, आरजीपी आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर या सर्वांची मदत घ्यावी लागेल आणि ती मदत मागण्याचा मोठेपणाही काँग्रेसने दाखवायला हवा. राहुल गांधी यांनी स्थानिक नेतृत्वाला यासंदर्भात कानमंत्र दिलाच असेल.