पावसाळा संपल्याने आता हिवाळा सुरू होणार असला, तरी तापमान वाढीमुळे ऑक्टोबरच्या उकाड्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पणजीसह इतर भागांतील तापमान ऑक्टोबरमध्येच ३२ अंशांच्या पुढे जात आहे. यामुळे यंदाचा उन्हाळा हा फारच तापदायक असण्याचे संकेत मिळत आहेत. यंदा गोव्याकडे पावसाने पाठ फिरवली. गेल्या काही वर्षांत राज्यात सरासरीपेक्षा अधिक वृष्टी होत होती. यामुळे पाण्याबाबत चिंता करण्यासारखे कारण नव्हते. तरीही मे महिन्यात बऱ्याच ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध होत नव्हते. यंदाची स्थिती मात्र वेगळी आहे. यंदा पावसाने इंचांची शंभरीही गाठलेली नाही. यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली, तर आश्चर्य वाटायला नको.
“राज्यात पाण्याची अजिबात टंचाई निर्माण होणार नाही. काळजी करण्यासारखी स्थिती नाही,” असे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर छातीठोकपणे सांगत आहेत. सध्या तरी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. मात्र येत्या वर्षी पावसाला उशीर झाला तर काय? दरवर्षी पावसाळ्यात धरणे भरून पाणी वहायचे. पाण्याची पातळी वाढल्याने अंजुणे धरणाचे चारही दरवाजे उघडावे लागायचे. यंदा मात्र अंजुणे धरणाचे दरवाजे उघडण्याची पाळी आली नाही. तसेच बाजारपेठेत पाणी शिरणे, पावसामुळे वीज पुरवठा खंडित होणे, असे प्रकारही घडले नाहीत. याचे कारण यंदा दरवर्षापेक्षा पावसाचे प्रमाणच कमी होते.
अति पावसामुळे जशा समस्या निर्माण होतात तशाच कमी पावसामुळे सुद्धा समस्या निर्माण होतात. यंदा पाऊस उशिरा आल्याने शेतीची कामे उशिरा सुरू झाली. यात श्रावण महिन्यानंतर तर पावसाचे प्रमाण बरेच रोडावले. यामुळे डोंगराळ भागातील शेती करपली. पावसामुळे शेतीचे काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतीनंतर आता पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होण्याचा संभव आहे. उपाययोजना करण्यासाठी सरकारने कृती दलाची स्थापना केली आहे. यापूर्वी पाण्याच्या स्थितीवर नजर ठेवण्यासाठी सरकारने कधीच कृती दल स्थापन केले नव्हते. संभाव्य पाणीटंचाईला तोंड देणे शक्य व्हावे, यासाठीच कृती दल स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ‘प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्यूर’, अशी इंग्रजीत म्हण आहे. यानुसार कृती दल स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे, असेच म्हणावे लागेल. पाण्याची उपलब्धता आणि गरज याचा विचार करून पाण्याबाबत धोरण आखावे लागेल. “पाण्याच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात येतील”, असे पेयजल खात्याच्या मंत्र्यांनी जाहीर केले आहे. पिण्याच्या पाण्याचा सर्रासपणे बाग शिंपण्यासाठी व वाहने धुण्यासाठी वापर होतो. माणसापेक्षा बागेला व वाहनांना जास्त पाणी लागते.
यावर निर्बंध यायला हवेत. पाण्याचा विचार केला, तर इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील स्थिती फार सुसह्य आहे. प्रत्येकाने आवश्यक तेवढेच पाणी वापरायला हवे, तसेच जलवाहिन्या फुटण्याचे प्रकारही वरचेवर सुरूच असतात. यावर उपाययोजना करणे ही खात्याची जबाबदारी आहे. आतापासून पाण्याचा जपून वापर झाला, तर सर्वांना आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध होणे अशक्य नाही.


