‘स्वयंपूर्ण भाजप’चा ध्यास

डिलायला लोबो यांच्या भाजपप्रवेशामुळे दुखावलेले दयानंद मांद्रेकर यांना भाजप पुन्हा उमेदवारी देऊ शकतो. पक्ष सोडून गेलेले किरण कांदोळकर यांच्यासारखे काही नेते भाजपला फायद्याचे ठरू शकतात, याची जाणीव भाजपला आहे. त्यामुळे फक्त पार्सेकर, उत्पलच नव्हे तर बरेच नेते भाजपमध्ये पुढील काळात प्रवेश करू शकतात. काँग्रेससमोर पर्याय राहू नयेत यासाठीच भाजप वेगवेगळी खेळी खेळत आहे.

Story: संपादकीय |
20 hours ago
‘स्वयंपूर्ण भाजप’चा ध्यास

विधानसभा निवडणूक जवळ येत असल्यामुळे रोजच काही ना काही राजकीय घडामोडी होत आहेत किंवा कोणाला प्रवेश द्यायचा, कोणाची मदत घ्यायची या दृष्टीने राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसच्या ‘गोवा राखण यात्रे’नंतर भाजपकडून ‘सरकार तुमच्या दारी’ हा सरकारी कार्यक्रम सुरू आहे. दुसऱ्या बाजूने भाजपमध्ये अनेक जुन्या नेत्यांना परत प्रवेश देण्यापासून ते पक्षाची विचारधारा पटणाऱ्यांना भाजपात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपचे प्रभारी गोव्यात तळ ठोकून आहेत. येत्या एक-दोन दिवसांत भाजपचे केंद्रीय अध्यक्षही गोवा भेटीवर येत आहेत. यात्रा काढून झाल्यानंतर २०२७ मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी सोशल मीडियावर स्वप्ने रंगवणाऱ्या काँग्रेसपेक्षा भाजप निवडणूक तयारीत बराच पुढे आहे. भाजपने उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात करतानाच ज्यांचा निवडणुकीत फायदा होईल, अशा नेत्यांना पक्षात परत आणण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे विशेष परिश्रम घेताना दिसत आहेत. कारण दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच निवडणूक आहे. २०१२ पासून भाजप सत्ता टिकवून आहे, त्यामुळे २०२७ मध्ये पुन्हा भाजप सत्तेत येणे हे दामू नाईक यांच्यासाठी फार महत्त्वाचे झाले आहे. भाजपकडून गेल्या पाच-दहा वर्षांत काही नेते बरेच दूर गेले आहेत. पण त्यांच्या दूर जाण्याने तसा काही फरक पडलेला नाही. त्यांच्या जागी नवे नेते तयार झाले आहेत. फरक फक्त इतकाच की ते जुने नेते भाजपच्या केडरमधून तयार झाले होते, तर जे नवे आलेले आहेत ते काँग्रेसमधून आयात केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या भरवशावर न राहता जुन्या नेत्यांना सोबत घेणे भाजपला जास्त फायद्याचे वाटते.

सध्या माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना भाजपात फेरप्रवेश देण्याचे निश्चित झाले आहे. पार्सेकर हे मांद्रेमधून उमेदवारीसाठीचे दावेदार आहेत. त्यांना उमेदवारी दिली नाही, तरीही त्यांचा भाजपला कसा फायदा होईल त्याचा विचार भाजप करत असेल. त्यामुळेच पार्सेकर यांना पुन्हा पक्षात घेण्याचे ठरलेले असावे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपमध्ये रीतसर प्रवेश देण्यात येणार आहे. मनोहर पर्रीकर भाजपच्या उभारणीत आघाडीवर होते, मात्र त्यांनी आपल्या मुलांना राजकारणापासून दूर ठेवले होते. त्यांच्या जाण्यानंतर उत्पल यांनी राजकारणात उडी घेतली, मात्र त्यांनी कुठल्या राजकीय पक्षात प्रवेश केला नव्हता. सध्या त्यांची भाजपसोबत चर्चा सुरू आहे. पुढील काही दिवसांत तेही भाजपवासी होऊ शकतात. उत्पल यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर बऱ्याचवेळा टीका केली. पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांच्यावर ते नेहमी टीका करायचे. गोव्यातील भाजप सरकारवरही ते वारंवार बोलायचे, मात्र आता भाजपने त्यांनाच पक्षात प्रवेश देण्याचे ठरवले आहे. उत्पल हेही स्वतः केलेली टीका विसरून आता भाजपवासी होणार आहेत. कारण त्यांच्या घरातच भाजपचे नेतृत्व होते. २०१७ च्या निवडणुकीपर्यंत मनोहर पर्रीकर हेच भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होते. मध्यंतरी ते दिल्लीत गेले, मात्र नंतरच्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा गोव्यात आले. मधल्या काळात पार्सेकर यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली, पण ते स्वतःच २०१७ मध्ये पराभूत झाले. कमी जागा मिळूनही, २०१७ मध्ये पर्रीकर यांच्यामुळेच भाजप पुन्हा सत्ता स्थापन करू शकला. त्यांच्या निधनानंतर २०१९ मध्ये डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आतापर्यंत उत्पल पर्रीकर यांनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केले. मात्र आता निवडणूक जवळ येत असल्यामुळे विरोधकांच्या तुलनेत भाजप सर्व बाजूंनी मजबूत करण्याचे पक्षाने ठरवले आहे. भाजपचे निरीक्षक व प्रभारी गोव्यात येऊन पक्षाच्या कामाचा आढावा घेत आहेत. या वेळी पक्षवाढ आणि पक्ष बळकटीकरणाचे पर्याय चाचपले जात आहेत. तसेच, सरकारविरोधी असंतोषावर मात करण्यासाठी जुन्या व समविचारी नेत्यांचा आधार घेणे भाजपला जास्त महत्त्वाचे वाटत आहे. अजूनही काही नेत्यांना भाजप पक्षात परत बोलावत आहे. डिलायला लोबो यांच्या भाजपप्रवेशामुळे दुखावलेले भाजपचे नेते दयानंद मांद्रेकर यांना भाजप पुन्हा उमेदवारी देऊ शकतो. पक्ष सोडून गेलेले किरण कांदोळकर यांच्यासारखे काही नेते भाजपला फायद्याचे ठरू शकतात, याची जाणीव भाजपला आहे. त्यामुळे फक्त पार्सेकर, उत्पलच नव्हे तर बरेच नेते भाजपमध्ये पुढील काळात प्रवेश करू शकतात. काँग्रेससमोर पर्याय राहू नयेत यासाठीच भाजप वेगवेगळी खेळी खेळत आहे.