दिवाळीचे खाद्यपदार्थ, मिठाईवर एफडीएची नजर

बार्देश तालुक्यात सहाजणांची तपासणी; दोन आस्थापनांवर कारवाई : दिवाळीनिमित्त तयार करण्यात आलेली मिठाई, खाद्य पदार्थांवर एफडीएची नजर आहे. बार्देश तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने ( Directorate of Food and Drugs Administration (FDA) Goa) राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत खाद्यपदार्थांची अस्वच्छ ठिकाणी साठवणूक केल्याचे आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
39 mins ago
दिवाळीचे खाद्यपदार्थ, मिठाईवर एफडीएची नजर

म्हापसा : दिवाळीनिमित्त तयार करण्यात आलेली मिठाई, खाद्य पदार्थांवर एफडीएची नजर आहे. बार्देश तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने ( Directorate of Food and Drugs Administration (FDA) Goa) राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत खाद्यपदार्थांची अस्वच्छ ठिकाणी साठवणूक केल्याचे आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या मोहिमेदरम्यान एकूण सहा खाद्यव्यवसायांची तपासणी करण्यात आली. अस्वच्छ स्थितीत व्यवसाय चालवणाऱ्या दोन आस्थापनांना तातडीने कामकाज बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.

एफडीएच्या पथकाने बार्देश तालुक्यात फरसाण उत्पादक, ऑनलाइन खाद्यपदार्थ वितरण केंद्रे, मिठाई दुकाने तसेच चिकन कत्तल केंद्रांची तपासणी केली. या तपासणीत मुदत संपलेले, योग्य लेबल नसलेले आणि अस्वच्छ स्थितीत साठवून ठेवलेले खाद्यपदार्थ आढळून आले.

कारवाईदरम्यान ११० किलो फरसाण (किंमत १८ हजार ७०० रुपये) तसेच १६० किलो भाजलेले काबुली चणे आणि १० किलो अन्य खाद्यसाठा (किंमत १५ हजार रुपये) नष्ट करण्यात आला. हे खाद्यपदार्थ मुदत संपलेले, योग्य लेबलिंग नसलेले आणि अस्वच्छ परिस्थितीत साठवलेले असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

संबंधित दोन आस्थापनांना आढळलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत आपले कामकाज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि ग्राहकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या व्यावसायिकांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

दरम्यान, अशा प्रकारची तपासणी मोहीम राज्यातील विविध भागांत पुढेही सुरू राहणार आहे. सर्व खाद्यव्यवसाय चालकांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा त्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

ही मोहीम संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. पथकात अन्नसुरक्षा अधिकारी अमित मांद्रेकर, डार्लेन दिवकर तसेच कर्मचारी संदीप शेळके यांचा समावेश होता.

हेही वाचा
सर्व पहा