पणजी :राज्यात मतदार आणि आमदार चोरी झाल्याचा आरोप करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी कोणत्याही ठिकाणी, अगदी दिल्लीच्या रामलीला मैदानावरही चर्चा करण्यास आपण तयार आहोत, असे खुले आव्हान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. तसेच, रोजगार व अर्थव्यवस्थेसाठी खनिज व्यवसाय आवश्यक असून, राज्यात तो संतुलित पद्धतीने पुन्हा सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शाश्वत विकासावर (सस्टेनेबल डेव्हलपमेंट) आधारित एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांना आव्हान दिले. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष जे मतदार व आमदार चोरीचे आरोप करत आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही. ज्यांच्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट होता, त्यांची नावे मतदार यादीतून वगळणे ही एक स्वाभाविक आणि निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे. संबंधित व्यक्तींनी त्यासाठी आवश्यक फॉर्म ६ देखील सादर केलेला नाही, असे सावंत म्हणाले.
आमदार स्वेच्छेने भाजपमध्ये
गोव्यात आमदारांची कोणतीही चोरी झालेली नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाला कंटाळून काही आमदार स्वतःहून आमच्याकडे आले आणि आम्हाला पक्षात घ्या, अशी विनंती केली. त्यानुसार आम्ही त्यांना पक्षात घेतले. ते पूर्णपणे आपल्या इच्छेने भाजपमध्ये आले असल्याने याला ‘चोरी’ म्हणता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
२०३७ पर्यंत ‘विकसित गोवा’चे स्वप्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न आहे, तर आपले ‘विकसित गोवा २०३७’चे स्वप्न आहे. जनतेचा भक्कम पाठिंबा आणि आमच्या विकासकामांच्या जोरावर आगामी निवडणुकीतही भाजपचेच सरकार येईल आणि राज्यात पुन्हा एकदा ‘डबल इंजिन’ सरकार सत्तेत बसेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
आपल्या कार्यकाळात गोव्यात जितका विकास झाला, तितका यापूर्वी कधीही झाला नव्हता. रस्ते, पूल यांसारख्या पायाभूत सुविधांसह रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक विकासही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. आम्ही हॉस्पिटॅलिटी, पर्यटन, फार्मा, शिपबिल्डिंग आणि आयटी क्षेत्रांवर विशेष भर दिला आहे. ‘व्हायब्रंट गोवा’ समिटमध्ये ५० हून अधिक देशांतील उद्योगांनी सहभाग नोंदवला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात खनिज व्यवसाय पुन्हा सुरू होऊ लागला आहे. आतापर्यंत १८ लीजचा लिलाव पूर्ण झाला असून, ५ ते ६ ठिकाणी कामही सुरू झाले आहे. भविष्यात संतुलित पद्धतीने हा उद्योग वाढवला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
गोवा हे पूर्वी केवळ ‘हॉलिडे डेस्टिनेशन’ मानले जायचे आणि व्यवसायाबाबत फारसे गांभीर्य नव्हते. पण, आता ‘बीच टू बिझनेस’ असे सकारात्मक परिवर्तन राज्यात होत आहे. नीती आयोगाच्या निकषांवर गोव्याचा क्रमांक यापूर्वी सातवा होता, तो आता तिसऱ्या स्थानावर आला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आवर्जून सांगितले.


