पणजी: ऑनलाइन फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत असतानाच गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) (Goa Medical College (GMC) Hospital) अपॉईंटमेंट बुक करण्याच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची १ लाख ९४ हजार रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी महाराष्ट्रातील अमरावती येथून सुमित राजेश इंगोले या २५ वर्षीय संशयिताला अटक केली आहे.
या प्रकरणी पर्वरी येथील एका ज्येष्ठ नागरिकाने ४ ऑक्टोबरला पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार जीएमसीमध्ये ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करण्याचा प्रयत्न करत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी असल्याचे सांगत संशयिताने त्यांना एक एपीके (APK) फाईल पाठवली.
तक्रारदाराने ही फाईल डाउनलोड करताच त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ९४ हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणातून या सायबर फसवणुकीतील संशयित अमरावती जिल्ह्यातून कार्यरत असल्याचे समोर आले.
त्यानंतर पर्वरी पोलीस स्थानकाचे पीएसआय सीताराम मळीक आणि कॉन्स्टेबल हेमंत गावकर व भिकाजी परब यांच्या पथकाने अमरावती गाठले. अमरावती जिल्हा पोलिसांच्या मदतीने संशयिताची ओळख पटवण्यात आली. सखोल चौकशीनंतर सुमित राजेश इंगोले (रा. मसणगंज, अमरावती शहर, महाराष्ट्र) याला ताब्यात घेऊन गोव्यात आणण्यात आले व अटक करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास पीएसआय सचिन शिरोडकर करीत आहेत. पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण, एसडीपीओ एसपी विश्वेश कर्पे आणि उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


