गरीब प्रवाशांच्या जीवाशी खेळ : ४८ आसनांच्या बसमध्ये कोंबले १४० प्रवासी

म्हापसा येथून नेपाळला चाललेली बस जप्त; प्रवाशांचे हाल : केवळ ४८ आसनक्षमता असलेल्या एका खासगी बसमध्ये चक्क 140 प्रवाशांना मेंढरांसारखे कोंबून नेणाऱ्या आंतरराज्य बसला म्हापसा वाहतूक पोलिसांनी (Mapusa traffic Police) बोडगेश्वर मंदिराजवळ (Near Shri Dev Bodgeshwar Sansthan Mapusa) ताब्यात घेतले.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
59 mins ago
गरीब प्रवाशांच्या जीवाशी खेळ : ४८ आसनांच्या बसमध्ये कोंबले १४० प्रवासी

म्हापसा : दिवाळी सणासाठी गावी निघालेल्या गरीब कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा संतापजनक प्रकार म्हापशात उघडकीस आला आहे. केवळ ४८ आसनक्षमता असलेल्या एका खासगी बसमध्ये चक्क  १४०  प्रवाशांना मेंढरांसारखे कोंबून नेणाऱ्या आंतरराज्य बसला म्हापसा वाहतूक पोलिसांनी (Mapusa traffic Police) बोडगेश्वर मंदिराजवळ (Near Shri Dev Bodgeshwar Sansthan Mapusa)  ताब्यात घेतले.

या कारवाईने आंतरराज्य प्रवासी वाहतुकीतील गंभीर निष्काळजीपणा, तपासणी नाक्यांवरील भ्रष्टाचार आणि प्रवासी सुरक्षिततेचा बोजवारा चव्हाट्यावर आणला आहे.

गोव्यात विविध ठिकाणी काम करणारे नेपाळ (Goa to Nepal) व उत्तर प्रदेशमधील कामगार दिवाळी साजरी करण्यासाठी सध्या आपल्या मूळ गावी जात आहेत. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन प्रवाशांच्या जागेवर अक्षरशः ७ ते ८ जणांना बसवण्यात आले होते. या धोकादायक प्रवासासाठी प्रत्येक प्रवाशाकडून तब्बल ४ हजार रुपये तिकीट उकळण्यात आले होते. एवढ्या दूरच्या प्रवासाला निघालेल्या या बसमध्ये कोणतेही सुरक्षा नियम पाळण्यात आले नव्हते.

मध्य प्रदेशातील नोंदणी असलेली ही ‘सीटर-कम-स्लीपर’ बस गेल्या चार वर्षांपासून या मार्गावर बेधडकपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आंतरराज्य तपासणी नाक्यांवर बस अडवली गेली तरी ३० ते ४० हजार रुपयांचा दंड भरून ती सहज पुढे सोडली जात असल्याचे चालकाने कबूल केले. “दंड भरून आम्ही व्यवसाय सुरू ठेवतो,” असा दावा चालकाने केल्याने तपासणी नाके, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. दंड भरून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याची मुभा कोण देते? यात स्थानिक यंत्रणांची मिलीभगत आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

प्रवाशांचे हाल

म्हापसा वाहतूक पोलिसांनी कारवाई करत बस येथील नवीन केटीसी बसस्थानकावर नेऊन ठेवली. चालकाला न्यायालयात हजर राहण्यासाठी चलन जारी केले. या कारवाईनंतर प्रवाशांचे अतोनात हाल झाले. कारवाई होताच बसचालक प्रवाशांना वाऱ्यावर सोडून पसार झाला. मध्यरात्रीच्या वेळी महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह १४० प्रवासी कोणतीही निवारा किंवा पर्यायी वाहनाची सोय नसल्याने उघड्यावर अडकून पडले. प्रवाशांना ना तिकिटाचे पैसे परत मिळाले, ना पुढच्या प्रवासाची सोय झाली. वाहनावर दंडात्मक कारवाई करून कारवाई थांबते की या निष्पाप प्रवाशांच्या सुरक्षेची आणि पर्यायी प्रवासाची जबाबदारीही संबंधित यंत्रणा घेणार? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.. 

हेही वाचा
सर्व पहा