कुठल्याही व्यक्तीला आपल्याला मिळालेले अधिकार म्हणजे आपल्याला हवे तसे वागण्याचा परवाना आहे असे वाटू लागते, तेव्हा लवकरच त्याचे परिणामही दिसू लागतात. वाचाळवीर होऊन मिळेल त्याची थट्टा करणे, आपण सर्व शक्तिमान आहोत असा समज करून घेणे, समोरच्याला कमी लेखणे आणि एखाद्याच्या कमकुवतपणाचा फायदा उठवून त्याच्यावर कुरघोडी करणे, अशा गोष्टी करणाऱ्यांना त्यांच्या चुकांची परतफेडही मिळते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या अशाच परतफेडीच्या टप्प्यातून जात आहेत. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांचे निकाल त्यांच्या विरोधात गेल्यामुळे ट्रम्प यांनी चालवलेला स्वैराचार काही प्रमाणात नियंत्रणात येईल. इतकेच नाही, तर २०२८ च्या निवडणुकीचे सूतोवाचही या मध्यावधी निवडणुकीने केले आहे, असे म्हणता येईल. भलेही ट्रम्प यांनी स्वतः या निवडणुकीचा निकाल म्हणजे माझा पराभव नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण हेच ट्रम्प दोन दिवसांपूर्वी मध्यावधी निवडणुकांचा निकाल अनपेक्षित असेल असे अतिआत्मविश्वासाने म्हणत होते. आपल्याला सगळ्यातले सगळे कळते असे म्हणणाऱ्या आणि समजणाऱ्या नेत्याचा हा नैतिक पराभव आहे. सध्याचे जे निकाल आहेत, त्यात ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे. डेमोक्रॅट्सने सिनेट आणि हाऊसमध्ये विजय मिळवून ट्रम्प यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला आहे. ट्रम्प जानेवारी २०१७ ते जानेवारी २०२१ या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यानंतर २०२१ ते २०२५ जानेवारीपर्यंत ज्यो बायडेन राष्ट्राध्यक्ष होते. २०२४ च्या निवडणुकीत कमला हॅरिस यांना ट्रम्पच्या विरोधात उभे केले गेले, मात्र त्या निवडणुकीत ट्रम्प यांनी हॅरिस यांना पराभूत केले. जानेवारी २०२५ ते आतापर्यंत ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर अनेक गोष्टी केल्या, ज्या जनमताचा अनादर करणाऱ्या होत्या. अमेरिका आणि इस्रायलने इराणशी युद्ध करून जगावर त्याचे परिणाम भोगण्याची वेळ आणली. या धोरणामुळे आणि वाढत असलेल्या इंधनाच्या दरांमुळे अमेरिकेत ट्रम्प यांची लोकप्रियता घसरत चालली असताना, मध्यावधी निवडणुकांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. डेमोक्रॅटिक पक्षाने दोन्ही सभागृहांत बहुमत मिळवल्यामुळे ट्रम्प यांना हा जबर धक्का आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिले असले, तरी मनमानी करण्याचा परवाना दिलेला नाही, असेच या निवडणुकीतील निकाल सुचवतात. मध्यावधी निवडणुकांकडे जगाचे लक्ष होते. यात विजय होणार असा ट्रम्प यांचा सुरुवातीला दावा होता, पण नंतर पराभवाची लक्षणे दिसत असल्यामुळे आपण विशेष अधिकार आणि ‘वेटो’चा वापर करणार, असा संदेश त्यांनी दिला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावर 'वेटो' लिहिलेल्या टोपीचा फोटो पोस्ट केला होता. म्हणजे संसदेत बहुमत मिळवूनही डेमोक्रॅटिक पक्षाच्या विधेयकांना राष्ट्राध्यक्ष म्हणून रोखू शकतो, असे त्यांनी संकेत दिले होते. त्याशिवाय आपण या निवडणुकीत उतरलो असतो, तर प्रचंड बहुमताने विजयी झालो असतो, असा दावा करण्यासही ते मागे हटलेले नाहीत. ट्रम्प यांना मध्यावधी निवडणुकांमध्ये आपली दाणादाण उडणार याची कल्पना होती, पण गेले काही दिवस त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी प्रयत्न केले. हे सारे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. ट्रम्प यांना २०२४ मध्ये ज्या राज्यांमध्ये समर्थन मिळाले होते, त्या राज्यांमध्येही पराभव पत्करावा लागल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व वाढणे हा त्यांच्यासाठी मोठा चिंतेचा विषय ठरला आहे. शिवाय जगासमोर नाचक्की झाली ती वेगळी!
ट्रम्प पुन्हा जिंकल्यापासून हुकूमशहा पद्धतीने वागत होते. त्यांच्या या वागणुकीला अमेरिकेतील नागरिकांनी नाकारल्याचे स्पष्ट दिसत आहे. भारतासारखा देशच महागाईमध्ये भरडला जातोय असे नाही, अमेरिकेतील जनतेलाही त्याची झळ जास्त पोहोचली होती. त्याचेच परिणाम या निवडणुकीत दिसले. तिथल्या मतदारांनी महागाई, इंधन दरवाढ, सरकारची चुकीची धोरणे, युद्धाचे निर्णय आणि त्याचे देशावर झालेले परिणाम अशा वेगवेगळ्या कारणांमुळे सरकारविरोधात असलेली नाराजी या निवडणुकीत उघडपणे व्यक्त केली. ट्रम्प यांच्या कुठल्याच दबावाला किंवा विधानांना तिथल्या जनतेने गांभीर्याने घेतलेले नाही. देशावर असलेले धोके ओळखून तिथल्या मतदारांनी हा कौल दिला आहे. हा निकाल आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची प्रतिक्रिया यातून २०२८ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला विजयाकडे नेण्याचा मार्ग सुकर झाल्याचे दिसते. “लोकांना विभाजित करणारे राजकारण नको आहे, एकजूट करणारे राजकारण लोक स्वीकारतात,” असे ओबामा यांनी म्हटले आहे. अमेरिकेत ते या निवडणुकीत दिसून आले.


