थकबाकी आणि पीएफच्या मागणीसाठी कदंब कर्मचारी १२ नोव्हेंबरला संपावर

थकबाकी, पीएफ आणि ईटीएम मशीन सक्तीच्या विरोधात कदंब कर्मचाऱ्यांनी १२ नोव्हेंबर रोजी एक दिवसाच्या संपाचा इशारा दिला असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
3 hours ago
थकबाकी आणि पीएफच्या मागणीसाठी कदंब कर्मचारी १२ नोव्हेंबरला संपावर

पणजी: कदंब वाहतूक महामंडळाच्या ड्रायव्हर आणि संलग्न कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १२ नोव्हेंबर रोजी एक दिवस संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संपावर ठाम राहण्याचा निर्णय संघटनेने घेतला असून, या संदर्भात संपाची नोटीस सरकारला दिली आहे, अशी माहिती आयटकचे (AITUC) ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिली.

कर्मचाऱ्यांच्या सुमारे २२ मागण्या असून, त्यात ३४ महिन्यांची थकबाकी आणि १६ वर्षांची भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) थकबाकी देण्याचा मुद्दा मुख्य आहे. तसेच, कंडक्टर आणि ड्रायव्हरांना त्रासदायक ठरणारी नवीन मशीन लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संघटनेचा मशीन वापरण्यास विरोध नाही, परंतु त्यामुळे कामगारांना त्रास होता कामा नये. कंडक्टरांना वेठीस धरणे किंवा त्यांच्यावर अन्याय करणे मान्य केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कदंब कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकीय संचालक, वाहतूक मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना नवीन ईटीएम (ETM) मशीन वापरण्याचा निर्णय मान्य नसल्याचे कळवले आहे. परंतु सरकारकडून या विषयावर अजूनही कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नाही. मशीन वापरण्याची सक्ती केल्यास हिशेबात तफावत निर्माण होऊन कर्मचाऱ्यांना थकबाकीदार (डिफॉल्टर) ठरवण्याची शक्यता आहे, अशी भीती फोन्सेका यांनी व्यक्त केली.

संघटनेने २००७ चे परिपत्रक जे रद्द करण्यात आले होते, ते पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच, इलेक्ट्रिक बस ड्रायव्हरांना सुमारे ३६,००० रुपये पगार द्यावा आणि त्यांना अतिरिक्त सवलती द्याव्यात. ड्रायव्हर जबाबदारीने आणि कष्टाने काम करतात, त्यामुळे त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, असे फोन्सेका यांनी सांगितले.

कदंबच्या बस सेवेची स्थिती सुधारण्यासाठी ३०० डिझेल बसेस सेवेत दाखल करण्याची मागणी संघटनेने केली आहे. सुमारे २५० बसेस भंगारात काढल्यामुळे प्रवाशांना हाल सोसावे लागत आहेत. दरवर्षी १५ ते १६ बसेस सेवेत दाखल व्हायला हव्या होत्या, त्या बसेस आलेल्या नाहीत, असा दावा फोन्सेका यांनी केला.

या मागण्यांसोबतच कर्मचाऱ्यांना राहण्याची जागा, अंतर्गत बढती, पिण्याच्या पाण्याची सोय आणि शौचालयांची समस्या दूर करण्याची मागणी केली आहे. बसस्थानकांवर ड्रायव्हरांना विश्रांती किंवा झोपण्यासाठी योग्य सोय नाही. तसेच पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र शौचालयांची गरज आहे, असा आरोप फोन्सेका यांनी केला.

“आमच्या सर्व मागण्या सरकारला कळवल्या आहेत. परंतु त्यावर योग्य निर्णय घेतला नाही, तर १२ नोव्हेंबर रोजी कदंब ड्रायव्हर आणि संलग्न कर्मचारी संघटना एक दिवसाच्या संपावर जातील,” असा इशारा फोन्सेका यांनी दिला आहे.