वाशिंग्टन / बंगळुरू: अमेरिकेच्या राजकारणात नुकताच एक नवा इतिहास रचला गेला आहे. मध्यवर्ती निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवत डेमॉक्रॅटिक पक्षाचे अब्दुल एल-सईद हे अमेरिकेचे पहिले मुस्लिम खासदार (सिनेट सदस्य) ठरले आहेत. मिशिगन राज्यातून विजय मिळवणाऱ्या या नेत्याच्या ऐतिहासिक यशाची चर्चा सध्या जगभरात सुरू आहे. मात्र, या आंतरराष्ट्रीय बातमीचा अत्यंत महत्त्वाचा आणि रंजक धागा भारताशी, विशेषतः कर्नाटकातील एका किनारपट्टीच्या शहराशी जोडलेला आहे. अमेरिकन राजकारणात ठसा उमटवणारे अब्दुल एल-सईद हे कर्नाटकाचे जावई आहेत आणि विशेष म्हणजे कोकणी आहेत.
अब्दुल एल-सईद यांच्या पत्नी डॉ. सारा जुकाकू या मूळच्या कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील भटकळ या शहरातील आहेत. सारा यांचे कुटुंब आणि पूर्वज भारतीय राजकारणात आणि समाजकारणात अत्यंत आदराचे स्थान राखून आहेत. सारा जुकाकू यांचे आजोबा जे. एच. शमसुद्दीन जुकाकू हे तत्कालीन म्हैसूर राज्याचे (सध्याचे कर्नाटक) माजी अर्थ उपमंत्री आणि विधिज्ञ होते. १९५० च्या दशकात त्यांनी बि. डी. जत्ती आणि एस. निजलिंगप्पा यांच्या मंत्रिमंडळात अनुक्रमे अर्थ आणि ऊर्जा उपमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. भटकळ शहरात वीज आणि मूलभूत सुविधा आणण्यात तसेच शिक्षणसंस्था उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. भटकळमधील प्रसिद्ध 'शमसुद्दीन सर्कल' आजही त्यांच्या स्मृती जपून आहे.

शमसुद्दीन यांचे सुपुत्र आणि सारा यांचे वडील डॉ. जुकाकू एस. तय्यब हे मूत्रपिंड विकार तज्ज्ञ (नेफ्रोलॉजिस्ट) आहेत. बंगळुरू मेडिकल कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी सौदी अरेबिया आणि नंतर १९८० च्या दशकात अमेरिकेत स्थलांतर केले. अमेरिकेत लहानाची मोठी झालेली सारा जुकाकू हिने वडिलांच्या इच्छेनुसार आपल्या भारतीय मुळांशी नाते घट्ट ठेवले. पुढे मिशिगन विद्यापीठात शिक्षण घेत असताना सारा आणि अब्दुल एल-सईद यांची भेट झाली. मुस्लिम स्टुडंट्स असोसिएशनमध्ये एकत्र काम करताना दोघांमधील मैत्री वाढली आणि २००६ मध्ये ते विवाहबद्ध झाले. सारा यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून कोलंबिया विद्यापीठातून वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. सध्या त्या मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

अब्दुल एल-सईद यांनी अनेक सार्वजनिक व्यासपीठांवरून आपल्या पत्नीच्या भारतीय वारशाचा आणि 'देसी' संस्कृतीचा नेहमीच अभिमानाने उल्लेख केला आहे. दक्षिण भारतीय कौटुंबिक वातावरणात गेल्या दोन दशकांपासून राहत असल्याने आपल्याला इडली, डोसा आणि भारतीय परंपरांची उत्तम ओळख झाल्याचे ते मिश्किलपणे सांगतात. "मी अरबी असलो तरी २० वर्षे दक्षिण भारतीय कुटुंबात राहिल्यामुळे आता अर्धा भारतीयच झालो आहे," अशा शब्दांत ते आपल्या सासरच्या मंडळींबद्दल प्रेम व्यक्त करतात. अमेरिकन सिनेटमधील त्यांच्या या प्रवेशामुळे भटकळ शहरासह संपूर्ण कर्नाटकात आनंदाचे वातावरण पसरले आहे.


