गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
गोवा सरकारने महसूल विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सचिवालयाबाहेरील कार्यालयांमधील गट ‘क’ कर्मचाऱ्यांसाठी सामायिक संवर्ग (कॉमन केडर) स्थापन केला आहे. उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्हाधिकारी कार्यालयांसह भूमापन व भूमिअभिलेख संचालनालयातील कर्मचाऱ्यांचा यात समावेश असेल.
या सामायिक संवर्गात अव्वल कारकून, मंडळ निरीक्षक, तलाठी, मुख्य लिपिक, वरिष्ठ व कनिष्ठ लघुलेखक, पर्यवेक्षक, मुख्य भूमापक, क्षेत्रीय भूमापक, अनुरेखक श्रेणी-१ व २, उच्च व निम्न श्रेणी लिपिक, कर्मचारी नोंदपाल, वाहनचालक, बेलिफ आणि बहुकार्य कर्मचारी (एमटीएस) यांचा समावेश आहे. याशिवाय सरकारकडून अधिसूचित करण्यात येणाऱ्या अन्य गट ‘क’ पदांचाही समावेश केला जाणार आहे.
या निर्णयामुळे विविध पदांवरील कर्मचाऱ्यांची एकत्रित ज्येष्ठता यादी तयार करण्यात येणार असून, त्यानुसार नियुक्ती, बदली आणि पदोन्नतीचे नियमन संबंधित सेवाभरती नियमांनुसार केले जाणार आहे. राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून हा निर्णय लागू होणार आहे.


