पणजी : वास्को शहरात २८ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा घडलेल्या भीषण आग दुर्घटनेमुळे आधीच संकटात सापडलेल्या सर्वसामान्य व गरीब दुकानदारांना पालिका प्रशासनाकडून वेठीस धरण्याचे प्रकार समोर आल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. संडे मार्केटमधील आगीत संसार आणि व्यवसाय उद्ध्वस्त झालेल्या दुकानदारांना अवघ्या २४ तासांत दुकाने खाली करण्याच्या नोटिसा बजावल्याप्रकरणी वास्कोचे आमदार कृष्णा 'दाजी' साळकर यांनी मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक यांच्या भूमिकेवर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
संडे मार्केट दुर्घटनेत आपण दोन प्रकारच्या लोकांचा वावर पाहिला; एक ते जे रात्रीच्या वेळी घटनास्थळी धावून जाऊन मदतीसाठी पुढे सरसावले आणि दुसरे ते, जे पीडितांना केवळ त्रास देण्यासाठी अवघ्या २४ तासांत दुकाने खाली करण्याच्या नोटीस बजावतात. आगीच्या दुर्घटनेमुळे आधीच उद्ध्वस्त झालेल्या लोकांना मुख्याधिकारी नोटीस देऊन केवळ त्यांचा अहंकार शांत करत आहेत. असे वर्तन आम्ही अजिबात खपवून घेणार नाही आणि ज्यांना काम करण्यास सांगितल्यावर त्यांचा अहंकार दुखावला जातो अशा लोकांची येथे आम्हाला गरज नाही. मला हा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारात मांडावा लागला आणि मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर मी दुकानदारांना खात्री दिली की बजावलेल्या नोटिसांवर कोणतीही कारवाई होणार नाही.
— वास्कोचे आमदार कृष्णा 'दाजी' साळकर

आगीच्या दुर्घटनेच्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या गरिबांवर अशा प्रकारे नोटीसचा बडगा उगारणे अमानुष असून, केवळ स्वतःचा अहंकार शांत करण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप आमदार साळकर यांनी केला. ज्या अधिकाऱ्यांना जनतेच्या हिताचे काम सांगितल्यावर त्यांचा अहंकार दुखावला जातो, अशा अधिकाऱ्यांची या शहराला कोणतीही गरज नाही, असा सज्जड दमही त्यांनी यावेळी भरला.

या संपूर्ण प्रकरणामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती पाहता, प्रशासकीय स्तरावर तातडीने पावले उचलण्यात आली आहेत. वास्कोतील आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांना थेट कार्मिक खात्यात हजेरी लावण्याचे सक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यांच्या या वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला होता. आमदार साळकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या दरबारात हा विषय लावून धरला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्व बाधित दुकानदारांना पूर्णपणे आश्वस्त केले असून, बजावलेल्या नोटिसांवर कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही दिली आहे. या आश्वासनामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर उघड्यावर पडलेल्या दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, प्रशासकीय यंत्रणेने तातडीने सूत्रे हलवत मडगावचे मुख्याधिकारी मधू नार्वेकर यांच्याकडे मुरगाव पालिकेचा अतिरिक्त ताबा सोपवला आहे. वास्कोतील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर असताना, आगीच्या या दुर्घटनेने प्रशासनातील अनास्था पुन्हा एकदा उघडी पाडली आहे. लोकप्रतिनिधींनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर झालेला जलद निर्णय यामुळे सध्या वास्कोतील व्यापारी वर्गाने सुटकेचा श्वास सोडला असून, नवीन प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जनहितार्थ योग्य निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


