दिवाळी सणाच्या अगदी तोंडावर देशातील सर्वात मोठ्या डेअरी ब्रँड असलेल्या अमूलने आपल्या तूप आणि बटरच्या किमतीत वाढ करत सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा नवा झटका दिला आहे. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाद्वारे (GCMMF) उत्पादित केल्या जाणाऱ्या या रोजच्या वापराच्या वस्तूंवर अचानक करण्यात आलेल्या दरवाढीमुळे सामान्य कुटुंबाच्या सणासुदीच्या बजेटवर अतिरिक्त ताण पडणार आहे.
| अमूल उत्पादन | पूर्वीची किंमत (₹) | नवी किंमत (₹) | एकूण वाढ (₹) |
| तूप (१ किलो कार्टन) | ₹६३०.०० | ₹६८०.०० | ₹५०.०० |
| शुद्ध तूप (५०० ग्रॅम पाऊच) | ₹३२५.०० | ₹३४५.०० | ₹२०.०० |
| लोणी/बटर (१०० ग्रॅम पॅक) | ₹६३.०० | ₹६६.०० | ₹३.०० |
| लोणी/बटर (५०० ग्रॅम पॅक) | ₹३१०.०० | ₹३२५.०० | ₹१५.०० |

तुपाच्या किमती
अमूल तुपाच्या एका किलोच्या बॉक्सची किंमत पूर्वीच्या ६३० रुपयांवरून आता ६८० रुपये झाली आहे, म्हणजेच ५० रुपयांची वाढ झाली आहे. ५०० ग्रॅम शुद्ध तुपाच्या पाऊचची किंमत ३२५ रुपयांवरून ३४५ रुपये झाली आहे.

बटरच्या किमती
बटरच्या किमती ही वाढल्या आहेत. १०० ग्रॅमच्या पॅकेटची किंमत पूर्वीच्या ६३ रुपयांवरून आता ६६ रुपये झाली आहे. ५०० ग्रॅम लोण्याच्या पॅकेटच्या किमतीत १५ रुपयांची वाढ झाली असून, ते आता ३२५ रुपयांना उपलब्ध आहे. अमूलच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर गाईचे तूप ७४० रुपये प्रति लिटर, सागर तूप ७१० रुपये प्रति लिटर आणि म्हशीचे तूप ७२० रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. शुद्ध तूप आणि कॉम्बो पॅकेट्ससारखे अनेक प्रकार ऑनलाइन उपलब्धच नाहीत.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जीएसटीचे दर बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणल्यानंतर अमूलने सातशेहून अधिक उत्पादनांचे भाव कमी केले होते, ज्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, ताज्या दरवाढीमुळे त्या मागील सवलतीचा प्रभाव काफी हदपर्यंत कमी झाला असून, सणासुदीच्या काळात मिठाई आणि गोड पदार्थांच्या तयारीसाठी खर्च वाढणार आहे.

या दरवाढीमागे बाजारातील वाढलेली मागणी आणि पुरवठ्यातील ताण हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. अलीकडेच महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये स्थानिक एफडीए प्रशासनाकडून बनावट व भेसळयुक्त तुपाविरोधात कठोर मोहीम राबवण्यात आली, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट तूप जप्त करण्यात आले. या धडक कारवाईनंतर नागरिकांचा कल स्थानिक ब्रँड्सऐवजी अमूलसारख्या विश्वासू आणि प्रस्थापित ब्रँडकडे मोठ्या प्रमाणावर वळला आहे.

एरवी वर्षभरातील एकूण तुपाच्या खपापैकी तब्बल पंचेचाळीस टक्के वापर हा केवळ फेस्टिव्हल सीझनमध्ये होत असतो, त्यातच बनावट उत्पादनांमुले निर्माण झालेल्या अविश्वासामुळे अमूलच्या उत्पादनांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. परिणामी, पुरवठा साखळीवर ताण निर्माण होऊन अगदी श्रीनगर, जालंधर, जयपूर,अहमदाबाद, मुंबई, गोव्यासह देशातील विविध भागांत तुपाचा तुटवडा जाणवू लागला असून, विशेषतः गायीच्या तुपाची उपलब्धता मर्यादित झाली आहे. त्यातल्या त्यात सणासुदीच्या काळात वाढलेल्या उच्च मागणीमुळे ग्राहकांना दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. जीसीएमएमएफने (GCMMF) अद्याप या प्रकरणी अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही.


