मडगाव : नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गोवा अन्न व औषध प्रशासनाने मडगाव आणि वेर्णा येथे केलेल्या कारवाईत सुमारे ६. ८५ लाख रुपये किमतीचे तब्बल २ हजार ४५० किलो असुरक्षित चिकन जप्त करून नष्ट केले. ( In Margao and Verna 6.85 lakh rupees unsafe chicken seized). योग्य तापमानात वाहतूक न करणे तसेच साठवणुकीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे तपासणीत आढळून आले.
१० नोव्हेंबर रोजी रात्री अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दक्षिण गोव्याच्या नियुक्त अधिकारी संज्योत कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मडगाव रेल्वे स्थानकाबाहेर तपासणी मोहीम राबवली. यावेळी एका रिक्षा वाहनाची तपासणी केली असता, त्यात चिकनची पाकिटे असलेले १० बॉक्स आढळले. एकूण ७०० किलो चिकनची किंमत १ लाख ३६ हजार ५०० रुपये असल्याचे स्पष्ट झाले.
सदर चिकन ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास दिल्लीहून रेल्वेने पाठवण्यात आले होते. ते १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मडगाव रेल्वे स्थानकावर पोहोचले. या संपूर्ण प्रवासादरम्यान सुमारे ३६ तास चिकनची वाहतूक थर्मोकोलच्या पेट्यांमधून करण्यात आली. मात्र, पाकिटांवरील लेबलवर नमूद केल्यानुसार आवश्यक तापमान राखण्यात आले नव्हते. त्यामुळे हे चिकन मानवी सेवनासाठी असुरक्षित ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने कारवाई केली.
संबंधित व्यावसायिकाकडून चिकन नष्ट करण्याबाबत हमीपत्र घेण्यात आले. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा संपूर्ण साठा नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. या तपासणी मोहिमेत नियुक्त अधिकारी संज्योत कुडाळकर, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी माधव आणि प्रिया, अन्न सुरक्षा अधिकारी अमरदीप आणि अभिषेक तसेच प्रशासनाचे कर्मचारी गौरेश आणि ड्युमिन सहभागी झाले होते.
वेर्ण्यातही १,७५० किलो चिकन नष्ट
वेर्णा येथील एका शीतगृहाची तपासणी केली असता तेथे साठवलेल्या १ हजार ७५० किलो चिकनवर आवश्यक लेबलिंग नसल्याचे आणि खरेदीसंदर्भातील अधिकृत कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यामुळे हा सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचा साठाही अन्न व औषध प्रशासनाने नष्ट केला.
मडगाव आणि वेर्णा येथील दोन्ही कारवायांमध्ये मिळून एकूण २ हजार ४५० किलो चिकन नष्ट करण्यात आले. अन्नपदार्थांची वाहतूक, साठवणूक आणि विक्री करताना नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध अशा तपासणी मोहिमा पुढेही सुरू राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


