वास्को : हार्बर रोड-सडा, वास्को (Harbour road, Sada, Vasco) येथे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना काँक्रीट मिक्सर क्रशरची धडक बसून श्रीदेवी रेड्डी (४४ वर्षे) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Harbour road Sada Vasco woman dies after concrete mixer collision). आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अपघातानंतर क्रशर चालक पळून गेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महिला कस्टम हाऊस येथे काम करीत होती. काम करून महिला घरी जात असताना हा अपघात घडला. धडक बसताच महिला रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. अपघात घडल्याचे दिसताच घटनास्थळी असलेल्यांनी रुग्णवाहिका बोलावून चिखली येथील हॉस्पिटलात दाखल केले. अपघातानंतर चालक पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. आणि चालकाचा शोध घेणे सुरू केले. संबंधित कंत्राटदाराने चालकाला स्वाधिन करण्याचे आश्वासन पोलिसांना दिले आहे. त्याचे आधारकार्डही पोलिसांना मिळाले आहे. यासंदर्भात वास्को पोलीस (Vasco Police) अधिक तपास करीत आहेत.


