म्हापसा : टाकीकडे-करासवाडा, म्हापसा येथील जीर्ण झालेला बसथांबा कोसळला. काल रविवारी मध्यरात्री मुसळधार पडलेल्या अवकाळी पावसामुळे ही घटना घडली. मात्र, बस थांबा ज्या पद्धतीने पडला आहे ते पाहिल्यास कुणीतरी मुद्दामहून पाडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बसथांबा कोसळला की पाडला अशी चर्चा सुरू झाली आहे.
या बस थांब्याचा रहिवासी आणि औद्योगिक वसाहतीमधील प्रवासी कामगार वर्ग वापर करत होते. सुदैवाने ही घटना रात्रीची घडल्याने मोठी दुर्घटना टळली. रविवारी १ रोजी मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळला. पावसामुळे देखभालीअभावी जीर्ण झालेला बसथांबा पडल्याचे दिसत आहे.
पडला की पाडला ?
दरम्यान, हा बसथांबा जमिनीवर पाडल्याप्रमाणे जागीच कोसळला आहे. त्यामुळे हा पावसामुळे कोसळला की कुणीतरी पावसाच्या आडून पाडला, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.


