फोंडा : कुंडई औद्योगिक वसाहतीत (Kundaim Industrial Estate in Ponda Taluka) व्होल्व्हो कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या भंगारअड्ड्याला भीषण आग लागण्याची घटना घडली. आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भंगारअड्ड्यातून धूर येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर फोंडा अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. आग लागताच मोठे धुराचे लोट सर्वत्र पसरले. त्यामुळे परिसर धुुराने भरून गेला. त्यानंतर भंगारअड्ड्यातील ज्वलनशील सामानाने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. भंगार अड्ड्यातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मिळालेल्या माहितीनुसार भंगारअड्ड्यात मोठ्याप्रमाणात ज्वलनशील साहित्य होते. त्यामुळे आग जास्त भडकल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या घटनेत किती नुकसान झाले,याची पडताळणी आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवल्यावर अग्निशमन दल करणार आहे.आग नियंत्रणात आणण्यासाठी जुने गोवा, फोंडा आणि कुंडई येथील अग्निशामक दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत १० अग्निशामक बंब तैनात केले.
सतर्कता बाळगण्याचे आवाहन
दरम्यान, गेल्या काही दिवसांत आगीच्या घटना वाढल्या आहेत. वास्कोतील येथील संडे बाजाराला लागलेल्या आगीत तर व्यापारी वर्गाला मोठा फटका बसला. कोट्यवधी रुपयांच्या साहित्याची हानी झाली आहे. त्यामुळे दिवाळी तोंडावर आली असताना व्यावसायिकांना जबर फटका बसला. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत अन्यत्रही काही आगीच्या घटना घडल्या. त्यामुळे सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


