पणजी : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी कॉर्पोरेट कंपन्यांनी सीएसआर अंतर्गत आर्थिक मदत देऊन साहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. या योजनेची माहिती देणाऱ्या १५४२४ नंबरवर उपचारांबरोबर आरोग्य तसेच उपचारांबाबत सल्लाही मिळणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेअंतर्गत उपचारासाठीचा पहिला धनादेश वितरित करण्यात आला. योजनेअंतर्गत पहिली शस्त्रक्रीया मणिपाल हॉस्पिटल, दोनापावल येथे करण्यात आली. यानिमित्त बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले. या योजनेअंतर्गत उपचाराच्या ३० टक्के वा अधिकाधिक २ लाख रूपयांपर्यंत मदत देण्याची तरतूद आहे.
दुर्धर आजारावरील उपचारासाठी रूग्णांना मदत मिळावी म्हणून बऱ्याच योजना आहेत. मेडीक्लेम, दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना (डीडीएसएसवाय) अशा योजना आहेत. डीडीएसएसवाय योजना सुरू होऊन दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मेडीक्लेम योजनेसाठीचे सोपस्कार किचकट आहेत.
उपचाराचा खर्च बराच वाढला तर आता दीनदयाळ योजनेबरोबर मुख्यमंत्री साहायता योजना रूग्णांच्या कामी येईल. या योजनेसाठी मुख्यमंत्री साहायता निधीतून पैसे दिले जातात. सीएसआर उपक्रमाअंतर्गत कॉर्पोरेट कंपन्यांनी सहाय्य केले तर योजना अधिक लाभदायी ठरणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या योजनेची माहिती १५४२४ या नंबरवर उपलब्ध असते. सध्या सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंतच या नंबरवर प्रतिसाद मिळतो. थोड्याच दिवसांनी ही सेवा २४ तास उपलब्ध होईल. तसेच योजनेच्या माहिती बरोबर आरोग्य तसेच उपचाराबाबत रूग्णांना मार्गदर्शन सुद्धा दिले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.


