फोंडा : कुर्टी, फोंडा येथील सहकारी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर नोजल वाहनातून न काढताच कार चालकाने वाहन सुरू करून पुढे नेल्याने पेट्रोल ‘डिस्पेन्सिंग’ यंत्राला मोठे नुकसान झाले. या घटनेत सुमारे ९,६०३ लिटर पेट्रोलची गळती होऊन तब्बल ९ लाख ९८ हजार २३१ रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार फोंडा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. त्यावरून पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
यासंदर्भात कौशल सहकारी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, १६ जुलै २०२२६ रोजी सहकारी पेट्रोल पंपावर मारुती रिट्झ कार पेट्रोल भरण्यासाठी चालकाने आणली. वाहनात पेट्रोल भरले जात असताना पेट्रोल भरण्याची नोजल वाहनाच्या इंधन टाकीत जोडलेले असल्याची खात्री न करता चालकाने अचानक कार सुरू करून ती पुढे नेली.
यामुळे नोजल वाहनाला जोडलेलीच राहिली आणि त्याच्या जोराने पेट्रोल ‘डिस्पेन्सिंग युनिट’ उखडले गेले. तसेच भूमिगत पाइपलाईनला जोडलेल्या यंत्रणेचे नुकसान झाल्याने मोठ्या प्रमाणात पेट्रोलची गळती झाली. या घटनेत सुमारे ९,६०३ लिटर पेट्रोल वाया गेले असून त्याची किंमत ९,९८,२३१ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
कार चालकाने बेजबाबदारपणे व निष्काळजीपणे वाहन चालवून मानवी जीवित तसेच पेट्रोल पंपावर उपस्थित व्यक्तींच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास फोंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक आशिष वेळीप करीत आहेत.


