गद्दारांना मतदान करू नका, काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल : खर्गे

काँग्रेस मेळाव्यात घणाघात : भाजपला जाब विचारण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th August, 10:18 pm
गद्दारांना मतदान करू नका, काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल : खर्गे

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासह गोवा मुक्ती लढ्यातही काँग्रेसचे मोठे योगदान असल्याचा दावा करत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. गोव्यात आजवरचे सर्वांत भ्रष्ट सरकार सत्तेवर असून, सरकारमधील १२ पैकी १० मंत्र्यांनी काँग्रेसमधून पक्षांतर केले असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपमध्ये गेलेल्या ‘गद्दारांना’ मतदान करू नका, असे आवाहन करत गोवा वाचवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट राखल्यास राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार येईल, असा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला.

वेर्णा येथे आयोजित काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधिमंडळ पक्षनेते युरी आलेमाव, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार कार्लुस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्ता, दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, कर्नाटकचे मंत्री नरेंद्र स्वामी, माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो तसेच बूथस्तरीय कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी भाजपला जाब विचारावा

काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता शांत बसून चालणार नाही. केवळ नेत्यांनी भाषणे करून उपयोग नसून भाजपला जाब विचारण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय होणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवली तर भाजपचा टिकाव लागणार नाही, असा दावा खर्गे यांनी केला.

दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि चेन्नई येथून लोक गोव्यात येऊन जमिनी खरेदी करतात आणि मौजमजा करतात, असा आरोप करत गोव्यात येऊन अशा प्रकारे मौजमजा करणाऱ्यांना हुसकावून लावण्याचे आवाहनही खर्गे यांनी केले.

आरएसएसवर सडकून टीका

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचे मोठे योगदान असल्याचे सांगत खर्गे यांनी गोवा काँग्रेसची स्थापना १९२८ मध्ये झाल्याचा उल्लेख केला. गोवा मुक्ती लढ्यातही काँग्रेसने योगदान दिले, मात्र आरएसएसचे स्वातंत्र्यलढ्यात कोणतेही योगदान नव्हते, असा आरोप त्यांनी केला. आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी माफी मागून इंग्रजांची गुलामी स्वीकारली होती, असा दावाही खर्गे यांनी केला.

काळे झेंडे दाखवणाऱ्यांना खर्गेंचा टोला

खर्गे यांच्या कार्यक्रमांना विरोध करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी टोला लगावला. “मी पांढरी टोपी घातली आहे. या टोपीचा रंग बदलता येतो. आरएसएसची टोपी काळी आहे. तिचा रंग बदलता येत नाही. त्यामुळे ती ओढून काढण्याची गरज आहे,” अशी टीका त्यांनी केली.

विरोधकांच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न

काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष असल्याने पक्षात मतभेद असणे स्वाभाविक आहे. भाजपला गोव्यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळत नाहीत. उर्वरित ६७ टक्के मतांमध्ये फूट पाडून सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केला.

गिरीश चोडणकर यांचा दावा“राज्यात विविध ठिकाणी खर्गेंच्या कार्यक्रमांना परवानगी मिळू नये यासाठी भाजपने ४ कोटी रुपये खर्च करून जागा अडवल्या. ९० टक्के लोक भाजप सरकारला कंटाळले असून, ८० टक्के लोक भाजप सरकारच्या विरोधात मतदान करण्यास तयार आहेत.”

— गिरीश चोडणकर, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष
काँग्रेस गोवा विकू देणार नाही

जमिनीच्या रूपांतरणासह राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप विधिमंडळ पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस गोवा विकू देणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार कार्लुस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्ता आणि गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनीही भाषणे केली.

हेही वाचा
सर्व पहा