६० टक्के आमदारांकडून घरे, मोटारींसाठी सवलतीत सरकारी कर्ज

४० पैकी २४ आमदारांचा समावेश : पाच वर्षांत ७.८० कोटी रुपयांचे घेतले कर्ज

Story: समीप नार्वेकर। गोवन वार्ता |
17th August, 10:20 pm
६० टक्के आमदारांकडून घरे, मोटारींसाठी सवलतीत सरकारी कर्ज

गोव्यातील सुमारे ६० टक्के आमदारांनी मोटार आणि घर खरेदीसाठी सवलतीच्या दरात एकूण ७.८० कोटी रुपयांचे सरकारी कर्ज घेतले आहे. गोव्यातील ४० पैकी २४ आमदारांनी गेल्या पाच वर्षांत या विशेष कर्ज योजनेचा लाभ घेतला आहे. मोटार खरेदीसाठी सर्वाधिक ४० लाख रुपयांचे कर्ज काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी घेतले आहे. तर आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर आणि बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी मोटार खरेदीसाठी प्रत्येकी दोन वेळा कर्ज घेतले आहे.

गोवा विधिमंडळ सचिवालयाच्या माहितीनुसार, निवडून आलेल्या आमदारांसाठी कमी व्याजदरासह विशेष सवलतीच्या अटींवर मोटार आणि घर खरेदीसाठी सरकारी कर्ज योजना राबवली जाते. २०२२ मध्ये निवडून आलेल्या २४ आमदारांनी गेल्या पाच वर्षांत मोटार खरेदीसाठी ४.९५ कोटी रुपये, तर घर बांधण्यासाठी २.८५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.

कर्ज घेणाऱ्या २४ आमदारांपैकी निम्मे आमदार दोन किंवा त्याहून अधिक वेळा निवडून आलेले आहेत. तर उर्वरित १२ आमदार पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेले आहेत. लोकप्रतिनिधींना उपलब्ध असलेल्या या विशेष कर्ज सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.

७.८० कोटींचे सरकारी कर्ज४० पैकी २४ आमदारांनी गेल्या पाच वर्षांत मोटार आणि घरासाठी सरकारी कर्ज घेतले आहे. मोटार कर्जासाठी ४.९५ कोटी, तर गृहकर्जासाठी २.८५ कोटी रुपये वितरित झाले आहेत.
मोटारींसाठी सर्वाधिक कर्ज

मोटार खरेदीसाठी काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सर्वाधिक ४० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांनी पहिल्या आणि दुसऱ्या वेळी प्रत्येकी १३.६९ लाख रुपयांचे कर्ज घेतले. बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनीही पहिल्या आणि दुसऱ्या वेळी प्रत्येकी १५ लाख रुपयांचे मोटार कर्ज घेतले आहे.

घर आणि मोटार या दोन्हीसाठी चौघांनी घेतले कर्ज

२४ कर्जदार आमदारांपैकी चार आमदारांनी घर आणि मोटार या दोन्ही कारणांसाठी कर्ज घेतले आहे. यामध्ये कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनी सर्वाधिक ६८.७६ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यानंतर सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी ६५ लाख रुपये, मंत्री रमेश तवडकर यांनी ६३.६९ लाख रुपये, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ४५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.

उर्वरित २० आमदारांपैकी तीन आमदारांनी घरासाठी, तर १७ आमदारांनी मोटार खरेदीसाठी कर्ज घेतले आहे. त्यामुळे या योजनेत मोटार खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचा वाटा गृहकर्जाच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येते.

आमदार आणि मंत्र्यांनी घेतलेले कर्ज
आमदार / मंत्रीमोटार कर्जगृहकर्ज
कार्लुस फेरेरा४० लाख--
क्रुझ सिल्वा१५ लाख--
दिगंबर कामत२९.९० लाख--
गणेश गावकर--५० लाख
डॉ. प्रमोद सावंत१५ लाख३० लाख
नीळकंठ हर्ळणकर२७.५० लाख--
राजेश फळदेसाई१५ लाख--
सुभाष शिरोडकर३४.६९ लाख--
वीरेश बोरकर१५ लाख५० लाख
वेन्झी व्हिएगस३० लाख--
प्रवीण आर्लेकर१५ लाख--
जीत आरोलकर१५ लाख--
सुदीन ढवळीकर४० लाख--
विजय सरदेसाई१५ लाख--
जोशुआ डिसोझा१५ लाख--
रमेश तवडकर२७.३८ लाख५० लाख
दिव्या राणे३१.१६ लाख--
आलेक्स सिक्वेरा३१.४४ लाख--
संकल्प आमोणकर३१.९९ लाख--
मॉवीन गुदीन्हो३० लाख--
सुभाष फळदेसाई२५ लाख--
केदार नाईक३३.१० लाख--
हेही वाचा
सर्व पहा