देवळात पूर्वी पूजेचा अधिकार होता गावडा, वेळीप, जल्मींकडे : तवडकर

ब्राह्मणांप्रमाणेच देवळात पूर्वी पूजा करण्याचा अधिकार गावडा, वेळीप आणि जल्मी‍ यांना होता. कालांतराने ही परंपरा कोणीतरी काबीज केली. मात्र, आजही गावडा, वेळीप आणि जल्मी हे मूळ घटक असल्याशिवाय देवस्थानातील काही विधी पूर्ण होत नाहीत. काही देवळांमध्ये आजही त्यांच्याकडून देवाला प्रसाद लावण्याची परंपरा आहे, असे प्रतिपादन आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी केले.


12 hours ago
देवळात पूर्वी पूजेचा अधिकार होता गावडा, वेळीप, जल्मींकडे : तवडकर

डॉ. काशिनाथ जल्मी कोकणी आदिवासी अध्यासनाचे उद्घाटन करताना मंत्री रमेश तवडकर. सोबत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. हरिलाल मेनन, प्रा. सुंदर धुरी, प्रा. सौमेंद्र पटनायक, डॉ. प्रकाश पर्येकर व इतर.
..
गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : ब्राह्मणांप्रमाणेच देवळात पूर्वी पूजा करण्याचा अधिकार गावडा, वेळीप आणि जल्मी‍ यांना होता. कालांतराने ही परंपरा कोणीतरी काबीज केली. मात्र, आजही गावडा, वेळीप आणि जल्मी हे मूळ घटक असल्याशिवाय देवस्थानातील काही विधी पूर्ण होत नाहीत. काही देवळांमध्ये आजही त्यांच्याकडून देवाला प्रसाद लावण्याची परंपरा आहे, असे प्रतिपादन आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी केले.
गोवा विद्यापीठात डॉ. काशिनाथ जल्मी कोकणी आदिवासी अध्यासनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री तवडकर बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. हरिलाल मेनन, निबंधक प्रा. सुंदर धुरी, प्रा. सौमेंद्र पटनायक, डॉ. प्रकाश पर्येकर आदी उपस्थित होते. मंत्री तवडकर पुढे म्हणाले की, गोव्याची भूमी गावडा या आदिवासी समाजाने वसवली. आदिवासी समुदायाचा संबंध जल, जमीन आणि जंगलाशी जोडलेला आहे. या समुदायाचे अस्तित्व याच भूमीशी जोडलेले आहे. विकासाच्या पारंपरिक संकल्पनांशी त्यांचा फारसा संबंध नसला, तरी स्वतःचे अस्तित्व आणि जग निर्माण करण्याची क्षमता या आदिवासी भूमिपुत्रांमध्ये होती.
चिकन, मटण आणि मद्य यापासून काहीसे दूर राहून देवाची पूजा करण्याचा अधिकार पूर्वी आदिवासींना होता. ब्राह्मणांप्रमाणेच देवाची पूजा करण्याचा अधिकार त्या-त्या गावातील गावडा, जल्मी, गावकार आणि वेळीप यांना होता. पूर्वी काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात वेळीप पूजा करत होते. कालांतराने ही परंपरा कोणीतरी काबीज केली. मात्र, आजही मूळ गावडा, वेळीप आणि जल्मी यांच्याशिवाय या प्राचीन देवस्थानांतील काही विधी पूर्ण होत नाहीत. देवाला देवळात प्रसाद लावण्याची प्रथाही आजही त्यांच्याकडे कायम आहे. देवाशी संपर्क साधून त्याच्याशी संवाद साधण्याची भाषेची शक्ती त्या देवळातील गावडा, जल्मी आणि वेळीप यांच्याकडे होती. त्यांच्याकडून देवाला प्रसाद लावण्याची परंपरा आजही सुरू आहे, असे मंत्री तवडकर यांनी सांगितले.
डॉ. काशिनाथ जल्मी हे विद्वान व्यक्तिमत्त्व
डॉ. काशिनाथ जल्मी हे गोमंतक गौड मराठा समाजातील पहिले डॉक्टर आणि गोव्यातील विद्वान व्यक्तिमत्त्व होते. व्यवसायाने डॉक्टर असले तरी त्यांना कायद्याचे ज्ञान आणि त्याचा मोठा अभ्यास होता. ते ज्या पद्धतीने विधानसभेत बोलायचे, ते पाहता जल्मी कोणता विषय मांडणार, याकडे गोव्याचे लक्ष लागून राहायचे. त्यांची भाषणे ऐकण्यासाठी उत्सुकता असायची. त्यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर आम्ही त्याला तत्काळ मान्यता दिली आणि या अध्यासनाची सुरुवात केली, असेही मंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा