गोव्यात पाच वर्षांत भाजीपाला उत्पादनात १,७९७ टनांनी वाढ

गोव्यात भाजीपाला क्षेत्रातील शेतकरी आणि शेतीसाठी आशादायी चित्र निर्माण झाले आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत भाजीपाला लागवडीखालील क्षेत्रात ७५ हेक्टर, तर उत्पादनात १,७९७ टनांनी वाढ झाली आहे. दरम्यान, गोवा फलोत्पादन विकास महामंडळाला गावठी भाजीपाला पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत २०.४२ टक्के, तर त्यांनी पुरवठा केलेल्या उत्पादनात १७.२७ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे,


12 hours ago
गोव्यात पाच वर्षांत भाजीपाला उत्पादनात १,७९७ टनांनी वाढ

गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : गोव्यात भाजीपाला क्षेत्रातील शेतकरी आणि शेतीसाठी आशादायी चित्र निर्माण झाले आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत भाजीपाला लागवडीखालील क्षेत्रात ७५ हेक्टर, तर उत्पादनात १,७९७ टनांनी वाढ झाली आहे. दरम्यान, गोवा फलोत्पादन विकास महामंडळाला गावठी भाजीपाला पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत २०.४२ टक्के, तर त्यांनी पुरवठा केलेल्या उत्पादनात १७.२७ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे, अशी माहिती कृषी संचालनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातील शेतकरी कारले, भेंडी, कोकणदुधी, वांगी, मिरची, चिटकी, कोथिंबीर, तवशी, दुधी भोपळा, मुळा, तांबडी भाजी, घोसाळी, मका, वाल, पालक, मेथी, शेपू, पडवळ, नारळ, गड्डे, चिबूड आणि वालपापडी यांसारखी विविध पावसाळी तसेच उन्हाळी पिके घेतात. २०२४-२५ मध्ये गोव्यात ८,८६३ हेक्टर शेतजमिनीवर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली होती. त्यातून शेतकऱ्यांनी १.११ लाख टन उत्पादन घेतले. २०२५-२६ मध्ये लागवडीखालील क्षेत्र वाढून ८,९३८ हेक्टर झाले, तर उत्पादन १.१२६ लाख टनांवर पोहोचले.
२०२४-२५ मध्ये पावसाळी हंगामात ३,१६५ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड झाली आणि ३६,७८१ टन उत्पादन मिळाले. उन्हाळी हंगामात ५,६९८ हेक्टरवर लागवड होऊन ७४,११२ टन उत्पादन झाले. २०२५-२६ मध्ये पावसाळ्यात ३,१९९ हेक्टरवर लागवड होऊन ३७,३७१ टन उत्पादन झाले, तर उन्हाळ्यात ५,७३९ हेक्टरवर लागवड करून ७५,२५६ टन उत्पादन मिळाले.
दरम्यान, गोवा फलोत्पादन विकास महामंडळाच्या ‘अश्युअर्ड मार्केट’ योजनेला स्थानिक शेतकऱ्यांचा प्रतिसाद सातत्याने वाढत आहे. २०२१-२२ मध्ये १,१०२ शेतकरी भाजीपाला पुरवठा करत होते. २०२५-२६ मध्ये ही संख्या १,५३३ वर पोहोचली. २०२१-२२ मध्ये ९२० मेट्रिक टन गावठी भाजीपाल्याचा पुरवठा होत होता. आता तो १,९४९ मेट्रिक टनांवर पोहोचला आहे. त्याच काळात शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला ३.२३ लाख रुपयांवरून ७.४८ लाख रुपयांपर्यंत वाढला आहे. २०२१-२२ मध्ये महामंडळाची १५ विक्री केंद्रे होती. २०२५-२६ मध्ये त्यांची संख्या १७ झाली आहे.


‘अश्युअर्ड मार्केट’मुळे शेतकऱ्यांना आधार
आम्ही ‘अश्युअर्ड मार्केट’ योजना सुरू केली असून, ठरवलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना मोबदला देत आहोत. उदाहरणार्थ, गोव्यात महामंडळ भेंडी ५० रुपये किलो दराने खरेदी करते, तर बेळगावमध्ये ती १० रुपयांत खरेदी केली जाते. शेतकऱ्यांकडून येणारा भाजीपाला खरेदी करण्यासाठी आम्ही तयार आहोत. गावठी भाजीपाला खरेदीचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. २०२२ मध्ये गोव्यातील शेतकऱ्यांकडून ३ कोटी रुपयांचा भाजीपाला खरेदी केला जात होता. आता हे प्रमाण ८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, अशी माहिती कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली. 

हेही वाचा
सर्व पहा