कोलकाता : कोलकात्यात बुधवारी पहाटे एका हॉटेलला भीषण आग लागून नऊ बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा पुरुष, दोन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. हे सर्वजण वैद्यकीय उपचारांसाठी कोलकात्यात आले होते. या दुर्घटनेत अन्य सहा जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (9 Bangladeshi nationals killed as fire tears through Kolkata hotel, several injured).
पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्यादरम्यान हॉटेलमधून सुमारे ६० जणांना बाहेर काढण्यात आले.
आगीत मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्याने काही जणांना श्वास घेण्यास त्रास होऊन ते बेशुद्ध पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. सहा जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.
हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
घटनास्थळावरील दृश्यांमध्ये हॉटेल असलेली इमारत जुनी आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात असल्याचे दिसून आले. या इमारतीत अनेक हॉटेल्स सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे.
सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष?
अग्निशमन विभागाचे मंत्री कौशिक चौधरी यांनी घटनास्थळी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. इमारत व्यवस्थापनाकडून मूलभूत अग्निसुरक्षा आणि बांधकाम नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. हॉटेलच्या कामकाजात अनेक अनियमितता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, प्रशासनाकडून घटनास्थळाची पाहणी करून आग नेमकी कशी लागली आणि सुरक्षाव्यवस्थेत कोणत्या त्रुटी होत्या, याचा सखोल तपास करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी घटनास्थळी भेट देण्याची शक्यता आहे.


