मडगाव : केळशी येथे छापा टाकून कोलवा पोलिसांनी अमलीपदार्थविरोधी मोठी कारवाई केली. यात संशयित इसाक परेरा (वय २९, रा. दवर्ली) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ३.६५० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
केळशी परिसरात अमलीपदार्थांची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती कोलवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी भाटीवाडा-केळशी परिसरात सापळा रचला. या कारवाईत पोलिसांनी संशयित इसाक परेरा (वय २९, रा. लकाकी, दवर्ली-दिकरपाल, नावेली) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता ३.६५० किलो गांजा आढळून आला. बाजाराभावानुसार या गांज्याची किंमत सुमारे ३ लाख ६ हजार ५०० रुपये इतकी आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणातील गांजा विक्रीसाठीच आणल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी गांजा जप्त करून आरोपीला रितसर अटक केली. ही धडक कारवाई कोलवा पोलीस निरीक्षक विधेश शिरोडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. हा गांजा नेमका कोणाला विकण्यासाठी आणला होता, याचा पुढील तपास कोलवा पोलीस करत आहेत.


