युतीचा निर्णय भाजप हायकमांड अन् मगोच घेणार; दीपक ढवळीकर यांचे मंत्री शिरोडकरांना प्रत्युत्तर

जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी युतीबाबत केलेल्या विधानानंतर मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी युतीचा निर्णय हायकमांड घेईल असे ठामपणे स्पष्ट केले. तसेच २०२७ साठी मांद्रे मतदारसंघातून जीत आरोलकरांनाच उमेदवारी मिळेल असे ते म्हणाले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
50 mins ago
युतीचा निर्णय भाजप हायकमांड अन् मगोच घेणार; दीपक ढवळीकर यांचे मंत्री शिरोडकरांना प्रत्युत्तर

पणजी: आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीला अजून कालावधी बाकी असतानाच गोव्याच्या राजकीय पटलावर युती आणि उमेदवारीवरून वादाची पहिली ठिणगी पडली आहे. प्रूडंट मिडियाच्या 'हेड-ऑन' कार्यक्रमात एका प्रश्नाचे उत्तर देताना जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी 'सध्या भाजपला महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीशी युतीची अजिबात गरज नाही' असे वक्तव्य केल्यामुळे युतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिरोडकर यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, यावर मगोपाचे पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भूमिका घेत भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला आरसा दाखवला आहे.

मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या युतीविरोधी वक्तव्याचा समाचार घेताना मगोप अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही एका स्थानिक नेत्याच्या वैयक्तिक मताने युतीचे भवितव्य अथवा राजकीय समीकरणे ठरत नसतात, असा टोला त्यांनी लगावला. पक्षाची ताकद आणि आगामी रणनीती स्पष्ट करताना ढवळीकर यांनी आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मांद्रे मतदारसंघातून मगोपाचे विद्यमान आमदार जीत आरोलकर यांनाच पुन्हा एकदा तिकीट दिले जाईल, अशी घोषणा केली. मांद्रे हा मगोचा पारंपरिक आणि भक्कम बालेकिल्ला असून, पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते आमदार आरोलकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून जीत आरोलकर हेच पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

युतीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावर बोलताना पक्षाचे ज्येष्ठ नेते सुदीन ढवळीकर यांनीही आपली भूमिका मांडली. भविष्यात भाजपसोबत युती पुढे चालू ठेवायची की नाही, याचा अंतिम निर्णय केवळ भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि स्वतः मगो मिळून घेईल. मगो हा राज्यातील एक स्वतंत्र, जुना आणि स्वाभिमानी राजकीय पक्ष आहे. त्यामुळे स्वबळावर आणि स्वतःच्या अटींवर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार पक्षाला आहे. स्थानिक पातळीवरील मंत्र्यांनी युतीबाबत भाष्य करणे अनाठायी असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

मगोने नेहमीच गोव्यात स्थिर सरकार आणि जनहिताच्या मुद्द्यांना प्राधान्य देत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन जनतेला एक उत्तम प्रशासकीय पर्याय उपलब्ध करून दिला आहे असे दीपक म्हणाले.  मात्र, भविष्यात समोरच्या बाजूने काय भूमिका घेतली जाते, यावरच मगोपाची पुढील राजकीय रणनीती अवलंबून असेल असेही ते म्हणाले. दीपक आणि सुदीन ढवळीकर यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गोव्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक नेत्यांच्या विधानांवर आता भाजपचे केंद्रीय नेतृत्व काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा
सर्व पहा